मला उद्योजक व्हायचंय
0 0
Read Time:15 Minute, 17 Second

अशोक करंबेळकर

“वेदांता फोक्सकाॅन”चं बिऱ्हाड तळेगाव सोडून गुजरातमध्ये थाटणार म्हणून अनेक “मराठी”ना फार वाईट वाटतंय.खरं तर,अशा अवाढव्य उद्योगसमूहांची व्यावसायिक गणितं अनेकदा आकलनापलिकडची असतात. ‘‘दिसतं तसं नसतं’’ हे तोंडपाठ असणारी मराठी माणसंही फक्त दिसणाऱ्या किंवा ऐकीव गोष्टींवरच विश्वास ठेवतात आणि आपली मतं बिनधास्त ठोकूनही देतात. अनेकांना तर महाराष्ट्रातल्या उद्योजक तयार होण्याच्या व्यवस्थेलाच संपवण्याचं षडयंत्र सुरू झालंय असं वाटायला लागलं. मला त्याचंच हसूही येतंय आणि दुसरीकडं वाईटही वाटतंय.

१)• मूळात वेदांता फोक्सकाॅन सारख्या कंपन्यांनी महाराष्ट्राचाच विचार का केला ?
हा खरा कळीचा मुद्दा आहे.
२)• अनेक हुशार आणि विद्वान नेतेसुद्धा गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राला नंबर वन करणार म्हणत आहेत.
ते कशाच्या बळावर ?
याचा विचार केला गेेला पाहिजे.
३)• गुजरात गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राच्या मागे असेलही, पण लघुउद्योजकतेच्या बाबतीत गुजरातमधलं चित्र फार सकारात्मक आहे. स्वयंरोजगाराच्या बाबतीत गुजरातमधला नागरिक आघाडीवर आहे.
नोकरी करून पगार मिळवण्यापेक्षा, व्यवसाय करून नफा मिळवण्याकडं गुजरातमधल्या तरूणांचा कल आहे. गुजरातमधल्या अक्षरश: हजारो तरूणांना “सोशल मिडीयाच्या माध्यमातून” आम्ही अनुभवलंय. तो रस्त्यावर पाण्याचे पाऊच विकेल, पण नोकरी करण्याला प्राधान्य देणार नाही. तो स्वत:चा व्यवसाय उभा करण्याच्या ध्येयानंच झपाटलेला असतो. त्यामुळं, रोजगार या शब्दाचा अर्थ त्यांच्या दृष्टीनं ‘‘रोजच्या रोज नफा कमावणं’’ असा असतो.
महाराष्ट्राचं तसं नाही, हीच खरी गोम आहे.
१)• महाराष्ट्रातल्या कुटुंबांना नोकरीचंच आकर्षण जास्त आहे, हे उघड सत्य आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात उद्योजक गुंतवणूक करण्याला प्राधान्य देऊ इच्छितात. स्वस्त दरात कामगारच मिळणार नसतील तर कुठला उद्योजक गुंतवणूक करेल ?
२)• एका वेदांता मधून एक लाख रोजगार निर्माण होऊन महाराष्ट्राची जितकी आर्थिक प्रगती झाली असती, त्यापेक्षा अधिक प्रगती एक लाख उद्योजक तरूण तयार करून झाली नसती का ?
हा फार महत्वाचा मुद्दा आहे,असं मला वाटतं.
आणि त्याच मुद्द्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसतंय.

एकाद्या निवासी विभागात एकादी गृहिणी घरगुती डबे आणि अन्य पदार्थांच्या ऑर्डर्स घेत असेल; विविध प्रकारच्या चटण्या,मसाले,मेतकूट वगैरे विकत असेल; आणि ती पोटापुरतंच कमवत असली, तरीही तिच्या उद्योजकतेमुळं बाकीच्यांना पोटशूळ उठणं अपरिहार्य ठरतं. इतरांच्या तक्रारी सुरू होतात…..! “तिनं” चकल्या तळल्या की आमच्याकडं वासच येतो, “तिनं” मसाले कुटले की आमच्या बेडरूमपर्यंत वास येतो वगैरे वगैरे.. एकादा तर आपल्या तार्किक बुद्धिमत्तेचा असा काही तर्कटी आविष्कार दाखवत असेल की, ते ऐकताना मतीच गुंग झाली पाहिजे. “तो” जबाबदार रहिवासी म्हणेल, “तिच्याकडं माणसं राहतात तीनच. पण स्वयंपाक किती होतो ? पंधरा-वीस जणांचा. म्हणजे किचनमध्ये भांडी किती पडत असतील ? ती धुण्यासाठी पाणी किती लागत असेल ? म्हणजे हे जे अतिरिक्त पाणी रोज वापरते. त्याचा एक्स्ट्रा मेन्टेनन्स घेतला पाहिजे.” यावर शेवटी बरीच भांडणं होतील, वाद होतील. त्या गृहिणीला तिचा व्यवसाय आटोपता घ्यावा लागेल. “ही” आहे ‘मराठी माणसाची उद्योजकतेविषयीची भावना’..!

१)• कुणी वडा-पावची गाडी लावतो म्हटलं की, त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी, त्याची टर उडवायला आम्ही एका पायावर तयार असतो. २)• कुणी पौरोहित्याचा व्यवसाय सुरू केला की त्याला कुणी मुलगीच देणार नाहीत. ३)• कुणी नवं काही करतो म्हटलं की त्याचा शेलक्या शब्दात पाणउतारा करतील. ४)• एकाद्या मुलानं इंजिनिअरींग पूर्ण केल्यावर “स्वत:ची फॅक्टरी सुरू करेन !” असं फक्त म्हटलं; तरीही त्याचे नातेवाईक त्याच्याशी सहा महिने तरी बोलणं टाकतील.
कारण काय ? तर …..
आपल्याला व्यवसाय धार्जिणा नाही असं त्यांचं ठाम म्हणणं असणार ! आणि कुणीही काही पटवून सांंगायला गेलं की इतका आकांडतांडव करायचा की समोरचा माणूस पाय लावून पळूनच गेला पाहिजे. शेवटी बिचाऱ्याला नोकरीच धरावी लागली पाहिजे. आणि स्वतंत्र व्यवसाय करण्याची त्याची इच्छा कायमची मरून जायलाच पाहिजे.
“ही” आपली उद्योजकतेकडे पाहण्याची आणि उद्योजकतेला बळ देण्याची वृत्ती..!

आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छिणारा एक मोठा उद्योग गुजरातला गेला म्हणून धाय मोकलून रडणं सुरू आहे. पण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या उद्योजकीय मानसिकतेच्या दुष्काळाचं काय ! हा मोठा गंभीर प्रश्न आहे. “आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे याविषयी अतिशय आग्रही असणारा मराठी पालकवर्ग” उद्योजकतेविषयी मात्र सकारात्मक दिसत नाही. एखादा मुलगा डिप्लोमा पूर्ण करून मेकॅनिक म्हणून स्वतंत्र काम करायला लागला की आपल्याला तो गरीबच वाटतो. एखाद्या मुलीनं घरगुती शिकवण्या सुरू केल्या की आपल्याला ती गरीबच वाटते. पण ते स्वतंत्रपणे, स्वबळावर आत्मनिर्भर होण्याचा मार्ग अनुसरत आहेत हे दिसत नाही आणि त्याचं महत्वसुद्धा जाणवत नाही. कारण काय ? तर सामान्यतः महाराष्ट्रीय कुटुंबाला उद्योजकतेची गरजच वाटत नाही.

आपल्या मुलांनी अठरा-वीस तास राबावं, कष्ट करावेत, रक्त गाळावं, तहान-भूक विसरून काम करावं आणि स्वत:चं उद्योगविश्व उभं करावं असले डोहाळे आपल्याकडं आयांना लागतच नाहीत. “राजाभाऊ भेळ” खायला आवडतं, पण आपला मुलगा तेच करतो म्हणाला तर “माझं नशीबच फुटकं” म्हणून ह्याच आया गळा काढतील. एकाद्या विद्यार्थ्याने ‘सॅनिटरी वेअर आणि प्लंबिंग मटेरियल’ च्या व्यवसायात उतरायचं ठरवलं, तर त्याचे आईवडील “संडासची भांडी विकून हा आम्हाला जेवू घालायचं म्हणतोय” असं जगभर सांगत फिरतील. म्हणून त्यानं त्याचं मनोगत सोडलं आणि कुठल्याशा काॅल सेंटरमध्ये पंधरा हजार रूपये पगाराची नोकरी धरली. तर घरी सगळे एकदम ओक्के..!

माझ्या पालकमित्रांनो, महाराष्ट्रात गुंतवणूक केलेल्या कोणत्याही अवाढव्य उद्योगसमूहाच्या फॅक्टरीत आपण जा आणि अधिकारी पदावर किंवा तांत्रिक पदांवर किती मराठी तरूणवर्ग काम करतो हे अवश्य पहा. रिलायन्स, इस्पात सारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतींना भेट द्या आणि पहा. “किती स्थानिकांना आणि भूमिपुत्रांना रोजगार मिळाला आहे” हे आपण प्रत्यक्ष पहा. तुमची घोर निराशा होईल. कारण, तिथं तुम्हाला लक्षणीय प्रमाणात परप्रांतियांचीच संख्या दिसेल. जिथं आमच्याच कोकणात आंबे उतरवायला स्थानिक माणूस मिळत नाही तिथं कितीही मोठा प्रकल्प आणला तरी तरूण वर्गाचा मेट्रो सिटीकडं असणारा ओढा कमी होणार आहे का ?
याचा विचार कुणी करायचा ?

१)• पुण्यातील जनसेवा दुग्ध मंदिर तोट्यात जाऊन बंद पडतं, पण त्याच परिसरात गुप्ता डेअरी कशी दणक्यात चालते ? याची कारणं कुणी आणि कधी शोधायची ?
२)• भर वस्तीत मोक्याच्या ठिकाणी असणारी कुणा भागवतांची जागा कुणी ‘पुरोहित’ किंवा ‘शर्मा’ किंवा ‘पटेल’ घेतात आणि तिथं दुकान काढतात, आणि त्याच भागवतांचे चिरंजीव कुठंतरी मार्केटयार्डात व्यापाऱ्याकडं कारकून म्हणून काम करत असतात, ही दुर्लक्षित करण्यासारखी वस्तुस्थिती नाही.
ऊर्जितावस्था येण्यासाठीची आंतरिक ऊर्मीच नाही तर ती ऊर्जितावस्था येणार कुठून ?

आमची मुलं पास क्लासनं डिग्री घेणार, कुठल्यातरी खाजगी फायनान्स किंवा इन्शुरन्स कंपनीत सेल्स मध्ये काम करणार आणि दर गुरूपुष्यामृताला एक ग्रॅम तरी सोनं घेण्यासाठी लक्ष्मी रोडवर रांगेत उभे राहणार. आमच्या बायका पाच हजाराची पैठणी घेण्यासाठीसुद्धा वर्षभराची भिशी लावणार.
“राजाभाऊ भेळ” आम्हाला महाग वाटते म्हणून आम्ही “साँवरिया भेल-पकोडीवाल्या”कडं जाऊन खाणार…..!
पण, महाराष्ट्रातला उद्योग गुजरातला गेला म्हणून कुणी मिडीयावरून आरडाओरड केली की, तीच बातमी गळा काढून व्हाॅट्स-ॲप वरून हजार ग्रुप्सवर शेअर करणार….आपलं तथाकथित पुरोगामित्व अधोरेखित करणार !
पण, बाजारपेठेत स्वत:ची पेढी, दुकान, उद्योग सुुरू करण्याचं स्वप्न पाहणार नाहीत,स्वत:चं साड्यांचं शोरूम करण्याचं ध्येय ठेवणार नाहीत, स्वत:चं रेस्टाॅरंट काढण्याचं यांना सुचणारही नाही. मग प्रगती कशी होणार ? असं कांही केलंच,तर लगेचच “शेठ” संबोधलं गेलं पाहिजे, नपेक्षा त्याचं सातत्य टिकवणं आम्हाला जमणार नाही; अशी आपली मनोवृत्ती !

मराठी तरूणांना “नोकरदार” करून महाराष्ट्राचा ‘’मॅग्नेटिक महाराष्ट्र’’ होऊ शकणार नाही. एक लाख रोजगार नकोत, एक लाख उद्योजक हवेत, व्यावसायिक हवेत. वेदांता गुजरातला गेली म्हणून शंख करण्यापेक्षा आपापल्या परिसरातल्या महाविद्यालयांमध्ये जा,तरूणांशी बोला,त्यांना विविध सरकारी योजनांची-पॅकेजेसची माहिती द्या, प्रेझेंटेशन्स द्या आणि त्यांना उद्योजकतेकडे वळवा. रात्रभर मिरवणुकीत नाचताना तरूणांना झोप नसतेच ना ?
मग तीच री पुढं ओढून महाराष्ट्र झोपतच नाही असं औद्योगिक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करा. अगदी पाचवी-सहावीपासून मुलांना कमवा-शिका तत्व शिकवा. विविध कार्यक्रमांमध्ये, प्रदर्शनांमध्ये त्यांना लहानमोठे स्टाॅल्स लावायला लावा. दिवाळीत पणत्या, आकाशकंदील घरोघरी जाऊन विकू द्या. घरोघरी जाऊन राख्या विकू द्या.
अगदी सोसायटीतल्या मुलामुलींनी गट तयार करून दर रविवारी सोसायटीच्या दारातच भाजीची विक्री केली तरी चालेल. पण अगदी लहानपणापासून त्यांच्यातली उद्योजकता विकसित कशी होईल यासाठी झटून प्रयत्न करा.

वेदांता महाराष्ट्रातून गेली. तर मिडीयानं फक्त राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेऊन ब्रेकिंग न्यूज लावल्या.
पण किती पत्रकार अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गेले ? किती इंजिनिअर तरूणांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या ? किती विद्यार्थी संघटनांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या ? _ किती प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या ?
किती करिअर काऊन्सेलर्सच्या मुलाखती घेतल्या ?
किती पालकांच्या मुलाखती घेतल्या ?
आपल्याकडे याचं उत्तरच नाहीय..!. कारण. ….
वेदांता आल्याचा खरा फायदा ज्या वर्गाला होणार होता, त्यांना मिडीयानं एक अक्षरसुद्धा विचारलं नाही. ह्याविषयी कोण बोलणार ?

आपल्याकडं उद्योजकतेच्या बाळकडूची डेफिशियन्सी आहे. ती आधी नष्ट केली पाहिजे. त्यासाठी पालकवर्ग जागृत कधी होणार ?

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy