भेटी लागे शिवा !

Shree Dev Rameshwar Kandalgaon Sindhudurg
Spread the love

प्रफुल्ल देसाई ,मालवण
मोबा ९४२२५८४७५९

इसवी सन सोळाशेचा तो काळ ! कोकण किनरपट्टीवर पोर्तुगीज, डच, फिरंगे यांनी उच्छाद मांडत या भागातील रयतेला जीव नकोसा करून सोडले होते. या भागातील जनतेच्या पैशाची लूट तर हे लोक करायचेच पण हे कमी म्हणून की काय? इथल्या आया बहिनींची अब्रू लुटायचे. अशावेळी इथल्या रयतेला रक्षणकर्त्याची गरज होती आणि म्हणूनच ही गरज ओळखून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कोकण किनारपट्टीवर दाखल झाले ते साल होते १६६४ ! पोर्तुगीज, डच , फिरंगे यांना शह द्यायचा असेल तर या भागात आरमार हवे हा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रातील कुरटे बेटावर किल्ले उभारणीचा संकल्प सोडला. २३ नोव्हेंबर १६६४ याच दिवशी छत्रपतीनी कुरटे बेटावरील ४८ एकर जमिनीवर किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीस सुरुवात केली. एकीकडे किल्ले सिंधुदुर्गचे बांधकाम दिमाखात सुरू असतानाच पश्चिमेकडचा तट काही केल्या उभा राहत नव्हता. सारे हैराण झाले होते. महाराजांपर्यंत ही वार्ता पोहोचली आणि एक दिवस छत्रपतींना दृष्टांत झाला, मालवण पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कांदळगाव ग्रामी राईमध्ये असलेल्या (झाडीझुडुपात) शिवलिंगावर घुमटी बांधल्यावर काम निर्विघ्न पार पडेल, असे संकेत महाराजांना मिळाले होते. त्यानुसार छत्रपती कांदळगावच्या श्री देव रामेश्वराच्या भेटीस गेले. त्या ठिकाणी श्री देव रामेश्वरांची – पूजाअर्चा करुन छत्रपतींनी तेथे असलेल्या शिवपिंडीवर एक छोटीशी घुमटी बांधली आणि आपली आठवण म्हणून त्या घुमटीसमोर वडाचे एक छोटेसे रोपटे लावले. याच भेटी दरम्यान छत्रपतींनी दर तीन वर्षांनी श्री देव रामेश्वराला आपले शक्तीमान चैतन्य किल्ले सिंधुदुर्गावर भेटीसाठी यावे अशी विनंती केली. श्री देव रामेश्वरानेही आनंदाने ती विनंती मान्य केली. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्गचा पश्चिमेकडचा तट पूर्णत्वास जावून हिंदवी स्वराज्याची सागरी राजधानी किल्ले सिंधुदुर्ग उभा राहिला. तिथपासून होय… साडेतीनशे वर्ष लोटली … छत्रपती शिवराय आणि श्री देव रामेश्वर यांच्या या दोन शिवांच्या भेटीचा सिलसिला जो सुरु झाला आहे तो आजपर्यंत तसाच सुरु आहे.

प्रियजनांच्या भेटीचा आनंद हा अवर्णनीय असतो असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगावचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर यांच्या दर तीन वर्षांनी होणाऱ्या भेटीचा हा अनुपम सोहळा डोळ्याचे पारणे फिटणारा असाच होतो. इतिहास काळापासून श्री देव रामेश्वर व छत्रपतींची ही भेट सुरु आहे. मध्यंतरीच्या काळात म्हणजेच २६ वर्षे काही अडचणींमुळे ही प्रथा बंद होती. २००५ साली ही प्रथा पुन्हा सुरु करण्यात आली. या भेटीत केवळ कांदळगावची रयत नव्हे तर मालवणसह जिल्ह्यातील रयत सहभागी होऊन या भेटीचा अनुपम सोहळा डोळ्यात साठवून ठेवते.

सर्वसाधारणपणे महिना भर अगोदर श्री देव रामेश्वर आणि छत्रपती महाराज यांच्या या भेटीचा कार्यक्रम जाहीर होतो. आठवडाभर अगोदर कांदळगावात मंदिर परिसरात संपूर्ण विद्युत रोषणाई केली जाते. तर कांदळगावचा रामेश्वर ज्या मार्गाने छत्रपतींच्या भेटीस जाणार आहे त्या मार्गावर कमानी, गुढ्या उभारल्या जातात. स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर लावले जातात. रस्त्यावर रांगोळ्या काढल्या जातात. ज्या दिवशी या भेटीचा कार्यक्रम होणार असतो त्या दिवशी पहाटेपासूनच कांदळगावच्या मंदिर परिसरात ग्रामस्थांची लगबग सुरु होते.

सुर्य जसजसा वर चढू लागतो तसतसा कांदळगावचा परिसर हजारो भाविकांच्या उपस्थितीने गजबजून जातो. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामेश्वराला मानकरी कौल लावून परवानगी घेतात आणि श्री देव रामेश्वर देव देवतांच्या तरंगासह पालखीत बसून छत्रपतींच्या भेटीसाठी आपले राऊळ सोडतो.

ढोल-ताशांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत रामेश्वर हा किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी रवाना होतो, उपस्थितांमध्ये उत्साहाची एकच लाट पसरते. कांदळगावातून आपल्या रयतेसमवेत निघालेला रामेश्वर ओझरमार्गे कोळंब येथे मालवणच्या वेशीवर आल्यानंतर मालवणमधील व्यापारी व नागरीक देव रामेश्वराचे स्वागत करतात. याचवेळी श्री देव रामेश्वराचा भाऊ गांगो हा कोळंबचे देवस्थान खापरेश्वराची भेट घेतो. आणि तदनंतर अपूर्व उत्साहात मालवणच्या मार्गक्रमणेसाठी पालखीत बसून श्री देव रामेश्वर पुढे चाल धरतो.

धुरीवाडा, फोवकांडा पिंपळ मार्गे बंदर जेटीवर श्री देव आल्यानंतर तेथील होडी चालक मालक श्री देव रामेश्वराचे स्वागत करतात. त्यानंतर जोशी मांड येथे श्री देव रामेश्वर पारंपारिक पद्धतीने श्री देव महापुरुषाची भेट घेतो आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा एकदा श्री देव रामेश्वर हा आपल्या लवाजम्यासह रयतेस सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीतून जाण्यासाठी प्रस्थान करतो. किल्ले सिंधुदुर्गवर श्री देव रामेश्वराचे आगमन झाल्यानंतर किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच कोंबडा व बकरा सोडण्यात येतो. हा धार्मिक विधी पार पडल्यानंतर श्री देव रामेश्वर हा शिवराजेश्वर मंदिर प्रवेश करतो आणि याचवेळी श्री देव रामेश्वर आणि छत्रपती यांची भेट होते. यावेळी श्री देव रामेश्वर आणि छत्रपती यांचा जयजयकार केला जातो. या जयजयकार रितीरिवाजानुसार श्री रामेश्वर हा छत्रपती जिरेटोप पागोटे, कंठहार प्रदान करतो तर छत्रपती हे श्री देव रामेश्वराला श्रीफळ व जोड पागोटे देतात. हा ऐतिहासिक नजराणा भेटीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री देव रामेश्वर आपल्या तरंगासह भवानी मातेचे दर्शन घेतो. हा अनुपम सोहळा पार पडल्यानंतर श्री देव रामेश्वर पुन्हा परतीच्या प्रवासास निघतो. या परतीच्या प्रवासात पद्मगाद श्री देव दांडेश्वर याठिकाणी भेट देतो. तदनंतर सायंकाळच्या सुमारास श्री देव रामेश्वर हा मालवण मेढा राजकोट येथील कुशेवाडा व मौनीनाथ मंदिर येथे वास्तव्याला येतो. दुसऱ्या दिवशी श्री देव रामेश्वर हा कांदळगावाकडे आपल्या राऊळात जाण्यासाठी निघतो. दोन अडीज तासाच्या परतीच्या प्रवासात आशीर्वाद देत श्री देव रामेश्वर आपल्या राऊळात विराजमान होतो. तो पुन्हा तीन वर्षांच्या भेटीची आस घेऊनच…!

Sindhudurg Tourism Update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *