Kunkeshwar

श्री क्षेत्र कुणकेश्वर…. कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र…अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी… कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर… देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्‍याशी असणार्‍या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्‍या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.

या मंदिरासंबधी दोन दंतकथा सांगीतल्या जातात.

१) एका गरीब ब्राम्हणाची गाय दुध कमी देउ लागली. तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले. कुणकेश्वर येथील शंभु महादेवाची पिंडी स्वयंभु असून पूर्वी ती कनक वृक्षांच्या घनदाट अरण्याने वेढलेली होती. ब्राम्हणाची गाय आपल्या मालकाला दूध न देता  एका विवक्षित जागी जाउन ती गाय पान्हा सोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्या गाईला बेदम जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला.पण गाय निसटून पळाली व त्या प्रहाराचा पाषाणावर आघात झाला आणि त्यातून भ़ळाभ़ळा रक्त येउ लागले. ते पाहून आश्चर्याने भयचकीत झालेल्या ब्राम्हणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली. हे स्वयंभू शिवलिंग असल्याची खात्री झाली. त्यानंतर तो ब्राम्हण त्या पाषाणाला शरण गेला व तेव्हापासून तो नित्यनियमाने या पाषाणाची पूजाअर्चा व दिवाबत्ती करू लागला आजही या शिवलिंगावर या घावाची खुण दाखविली जाते.

२) एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळात सापडला. आगतिक बनलेला व्यापारी परमेश्वराची करूणा भाकू लागला. तेवढयात त्याला पूर्वेकडे शांतपणे तेवणार्‍या दिव्याचा प्रकाश दिसला. दिलासा देणार्‍या त्या नंदादीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसा खर्चुन जीर्णोद्धार करीन असं त्यानं मनोमन ठरवलं. किनार्‍यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला. हिंदूंच हे छोटं मंदिर होतं या शिवायलायाचा त्याने जीर्णोद्धार केला. तीन वर्षे आणि द्रव्य खर्चून त्यानं हे काम पुरं केलं देवाच्याच पायाशी जागा मिळावी म्हणून त्यानं शिखरावर चढून खाली उडी मारली व प्राणत्याग केला. त्याचं स्मारक कुणकेश्वराच्या उत्तरेस आहे.

हिच दंतकथा कुणकेश्वरचा इतिहास म्हणून अलिकडच्या काळापर्यत सांगितली जात होती. परंतु जसजशी कुणकेश्वरची प्रसिद्धी वाढत गेली तशी

 अभ्यासकांची दृष्टी

 येथे पडली. प्राचीन काळी जेव्हा मुसलमानी सत्ता हिंदुंना मुळासकट उचकटण्याचा प्रयत्न करित होत्या त्या काळी एक मुस्लीम व्यक्तीकडुन हिंदु मंदिर कसे काय उभारण्यात आले. त्यामुळे हि दंतकथा अभ्यासकांना खटकण्यासारखीच होती. त्यामुळे कुणकेश्वरच्या इतिहासाचा अधिक चौकसपणे अभ्यास होऊ लागला.

१९६० च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकीत्सक दृष्टीने पाहणी केली. आणि थडगे म्हणून दाखवली जाणारी इमारत हि, हिंदु मंदिराची असुन आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे साधार पुराव्यानिशी दाखवून दिले. अशाप्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासातील सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली. त्यानंतर कोंकणातील गावह्राटी पुस्तकाचे लेखक श्याम धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक रणजित हिर्लेकर या अभ्यासकांनी ही याविषयी संशोधन केले असुन, “कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापार्‍याने बांधले नसुन हे मंदिर कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांसारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे. आणि थडगे समजले जाणारी वास्तू हि एक बाटवलेले शिवमंदिर आहे.” असा निष्कर्श सर्वांनी मांडला आहे. अरब व्यापार्‍याची कथा हि वारंवार आक्रमण

करणार्‍या मुसलमानी सरदारांच्या डोळयात धूळ फेकण्यासाठीच केलेली एक व्यूहरचना होती. मंदिराच्या रक्षणासाठीच मुस्लिम व्यापाराने हे मंदिर बांधल्याचे कथानक मुद्दामच पसरविण्यात आले. पण तीच दंतकथा होऊन आपल्या पुढे उभी आहे. पनवेलजवळच्या कणकेश्वर मंदिराच्या बांधकामाविषयी देखील कुणकेश्वर मंदिरासारखीच अरबी व्यापार्‍याची कथा सांगीतली जाते. तसेच राजापुरच्या अंजनेश्वर मंदिराच्या बांधकामाविषयी देखील हिच कथा सांगितली जाते. अनेक ठिकाणी मंदिरांच्या रक्षणासाठी अशी थडगी उभारली गेली आहेत. रामेश्वर मंदिराच्या सभामंडपालगत दिपमाळेच्या रांगेत असेच एके बनावट थडगे आहे. ही सर्व सुलतानी तडाख्यातून मंदिरे वाचविण्यासाठी केलेली एक व्यूहरचना होती.

कथा कुणकेश्वर मंदिराच्या विध्वंसाची व जिर्णोद्धाराची

या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम वेळोवेळी हिंदू राजांच्या काळात झालेले आहे. पण जुन्या कागदपत्रांच्या सहाय्याने निश्चित होणारा मंदिराचा जिर्णोद्धार हा शिवकाळातील आहे.

छत्रपती शिवरायांच्या काळात सुलतानी आक्रमणांचा उपद्रव पोचलेल्या असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार झालेला आहे. सुलतानी आक्रमणाने पिचलेल्या भारतात शिवरायांच्या पराक्रमाने पुन्हा एक परिवर्तनाची लाट आली. आणि मग आपल्या परमप्रिय दैवतांची पुनर्स्थापना करण्याची ओढ या मातीतील माणसाला होऊ लागली. कुणकेश्वर मंदिराचा झालेला जिर्णोद्धारही याच काळातील आहे. हा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा. आजपासून जवळजवळ ३00 वर्षाँपूर्वीचा. शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचे सांगितले जाते. कुणकेश्वर मंदिर हे काहीसे एका बाजुला असल्यामुळे व अतिशय दुर्गम असणार्‍या या भूप्रदेशामुळे सुलतानी आक्रमकांच्या आसुरी तांडवापासून काहीसे सुरक्षित राहीले. तरी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर व औरंगजेब दक्षिणेत उतरल्यानंतर या मंदिराला उपसर्ग पोहोचला होता असे इतिहास सांगतो.

त्याकाळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणार्‍या नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता. नारो निळकंठांची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती. औरंगजेबाचा पुत्र शहाआलम हा घाट उतरुन या तळकोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे एक डोळ्यांत भरणारे मोठे तिर्थक्षेत्र होते. त्यामुळे कुणकेश्वर मंदिराला शहाआलम त्रास देईल अशी भिती नारो निळकंठांना वाटू लागली. त्यावेळी नारो पंडितांनी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी नक्कीच काहीतरी योजना केली असणार. त्यांनी जी उपाययोजना केली तीच ही अरबी व्यापाय्राची दंतकथा होय.! असे मत श्री शाम धुरी यांनी मांडले आहे.

नारो निळकंठ यांचे समाधी स्थान
नारोपंतांनी आपल्या आराध्य दैवताच्या रक्षणासाठी उपाययोजना सुरु केली.मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच पहिल्याच दृष्टीक्षेपात दिसणार्‍या छोटया मंदिरातील मूर्ती हलवून तेथे मातीने लिंपून थडग्याच्या आकाराचा आभास निर्माण केला. या मंदिराच्या कळसाचे कोरीव बांधकाम तासून काढून व डागडुजी करुन त्याचा आकार घुमटासारखा केला. नंतर त्यांनी कुणकेश्वर मंदिर अरबी व्यापार्‍याने बांधल्याची हूल उठवली. त्याचबरोबर आपल्या तटपुंज्या लढावू माणसांना सोबत घेऊन नारो निळकंठ अमात्य हे मंदिर परिसरात तळ देऊन बसले. परंतु तरिही शहाआलमची नजर कुणकेश्वर मंदिरावर पडली. त्याने कुणकेश्वर मंदिरावर जोरदार हल्ला चढविला. मंदिराभोवतीच्या तटबंदीच्या आधारे आपल्या तोकडया बळानिशी मराठयांनी कडवा प्रतिकार केला. पण शहा आलमचा तडाखा भारी पडला. मराठयांची हार होत असलेली पाहून मंदिराच्या कळसातील गुप्त जागेत तळ देऊन बसलेल्या नारोपंतांनी अखेरीस स्वतः तलवार उपसली व मंदिराच्या शिखरावरुन हरहर महादेव अशी रणगर्जना करीत आक्रमकांच्या तोँडावरच उडी घेतली. या रोमांचकारी घटने मराठयांना चेव चढला. त्यांनी मोगल सैन्यावर जोरदार हल्ला चढविला. मराठयांचा तो रौद्रावतार पाहून मोगलांनी माघार घेतली. पण तोपर्यँत मंदिर परिसराचे बरेच नुकसान झालेले होते. झाल्या प्रकाराने नारोपंतांना जबर मानसिक धक्का बसला. या धक्यातून ते सावरले नाहीत. पुढे कुणकेश्वर येथेच त्यांचे निधन झाले. मंदिराच्या दक्षिण बाजुला जेथे त्यांनी उडी घेतली होती तेथेच त्यांचे समाधीचे तुळशी वृंदावन बांधण्यात आलेले आहे. कुणकेश्वरच्या पालखीच्या वेळी म्हटली जाणारी आरती ही अमात्य नारोपंतानीच लिहीलेली आहे. या आरतीतही नारोपंडितांच्या उडीचा स्पष्ट उल्लेख आहे.

११ जुलै १८५० मध्ये मेज ली ग्रँट जेकब या मुंबईच्या पॉलिटिक्ल सुपरिटेंडेटने मोठया परीश्रमाने एक ताम्रपट शोधला. नागदेवाचा ताम्रपट म्हणून हा विख्यात आहे. सन १४३६ या संस्कृत ताम्रपटात इंदूल (आताचे हिंदळे) गावच्या राजाने देवशर्मा या विद्वान ब्राम्हणाचा सन्मान केला. त्या पुण्यकर्मामुळे या राजाचे ऐश्वर्य तर वाढलेच, पण त्यास पुत्रप्राप्तीही झाली.या रहाळाचा स्वामी असणार्‍या कुणकेश्वराच्या प्रसादामुळेच हे सारे त्या ताम्रपटात नमूद केले आहे. कुणकेश्वर गाव पूर्वी या देवास इनाम होते. इंग्रजी अमदानीत ते रद्द होउन, वार्षिक रोख रक्कम सरकारकडून नेमण्यात आली आहे. more…..

 

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress