श्री देव आकारी ब्राह्मणदेव मंदिर, चिंदर

🌸|| श्री देव आकारी ब्राह्मणदेव मंदिर ||🌸
चिंदर – गावठणवाडी

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

शिवकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या आपल्या कोकणात बऱ्याच ठिकाणी सुरेख मंदिरांच्या भक्तीसंप्रदायाचा अन नितांतसुंदर निसर्गाचा अभूतपूर्व असा संगम झालेला आढळून येतो. अशाच एका सुंदर संगमाची प्रचिती आपल्या चिंदर गावात आपल्याला पाहायला मिळते.
कणकवली-आचरा राज्य मार्गावरून आचर्याच्या दिशेने आपली एसटी निघाली की त्रिंबक गावच्या बाजारानंतर डाव्या हाताला ‘चिंदर’ असा थांबा दिसतो. तिथे उतरले की ‘नवनाथ मठ(चिंदर गावठणवाडी)’ तसेच ‘रामानंद सरस्वती स्वामी समाधी- भवानी शंकर मंदिर’ असा दिशादर्शक फलक नजरेस पडतो. त्या दिशेला आपली पाऊले अथवा गाडी वळवायची आणि चिंदर गावात प्रवेश करायचा.तिथून पुढे साधारण पाच मिनिटांच्या अंतरावर दिसतो तो म्हणजे एक नेत्रसुखद अनुभवच!!! ते म्हणजे एका रम्य मनमोहक तळ्याकाठी असलेले श्री शंभू महादेवाचे स्वयंभू असे जागृत स्थान !!!
चिंदर गावातील गावठणवाडीत ‘श्री आकारी ब्राह्मणदेव मंदिर’ हे महादेवाचे जागृत देवस्थान वसलेले आहे.हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत भरगच्च वृक्षराजीत अंथरलेल्या एका चिमुकल्या रस्त्याच्या वळणावर हे पुरातन मंदिर उभे आहे. मंदिराचा पसारा तेवढा छोटेखानी असला तरी सभोवतालच्या निसर्गचित्राच्या कॅनव्हासवर हे लाल कौलारू टुमदार असे मंदिर खूपच देखणे दिसते.प्रवेशदाराशीच भव्य नक्षीदार कमान आपले स्वागत करते.कोकणातील पुरातन मंदिररचनेत शोभून दिसणारी अशी लाल कौलारू छताची मंदिराची रचना आहे.मंदिराच्या आतील सभामंडपही साध्या परंतु सुबक अशा खांबांनी सजलेला आहे.तिथून पुढे गाभाऱ्यात गेले की श्री स्वयंभू महादेवाचे साजिरे रूप फुलाहारांच्या प्रभावळीत शोभून दिसते.आसपासच्या शुभ्र धवल संगमरवरी रचनेत मध्यभागी वसलेले काळ्याकभिन्न रूपातील श्री ब्राह्मण देव आपले मनोचित्त वेधून घेतात.महादेवाचे दर्शन झाले तरी मंदिरात पाऊले मग थोडी रेंगाळतातच.थोडा वेळ तरी त्या शिवशंकराच्या सानिध्यात बसून समाधिस्थ व्हावेसे वाटते.अगदी प्रसन्न…निरामय अन मंद धुपबत्तीच्या दरवळणार्या सुवासात आपले चित्त श्रींच्या चरणी कधी लीन होते ते कळतच नाही.मंदिररचना अतिशय साधी असली तरी नुकत्याच केलेल्या पिवळ्या-लाल-पोपटी अशा रंगसंगती मध्ये अत्यंत आकर्षक दिसते.
मंदिरातून निघता निघत नसली तरी पुढच्या प्रवासाला पाऊले मार्गी लागताच बाहेर एक वेगळाच निसर्ग आपल्याला साद घालत असतो. मंदिराच्या बाजूलाच एक पुरातन असे तळे(तलाव) आहे. बरीच वर्षे लुप्तअवस्थेत असलेल्या या तळ्याचे काही वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने बांधकाम झाले आहे.तळ्याकाठी आपली पाऊले रेंगाळली की मग आसपास च्या विलक्षण सृष्टीदैवत्वाची आपल्यावर भुरळ पडते. निळ्याशार आभाळाखाली…हिरव्याकंच डोंगररांगांच्या कुशीत…नितळ निळ्या डोहात उमललेली गुलाबी कमलपुष्पे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतात.थोडे दुरून पाहिल्यास या नयनरम्य तलावाच्या पार्श्वभूमीवर झाडा-झुडुपांची हिरवी शाल पांघरून बसलेले हे इटुकले टुमदार मंदिर आपल्याला मालवण जवळील सुप्रसिद्ध धामापूर भगवती मंदिराची आठवण करून देते.चिंदर गावातील हे देखणे परंतु काहीसे दुर्लक्षित असे पर्यटन स्थळ आपल्या कोकण दौऱ्यात प्रत्येकाने आवर्जून भेट देण्यासारखे आहे.
कधीतरी मावळतीला सायकलवर टांग मारावी अन या इथे महादेवाचे दर्शन घ्यायला निघावे.तिथून जवळच एका वडाच्या पारावर आपली समाधी लागली की मग त्या ब्राह्मण देवाच्या सानिध्यात निळ्या डोहात चाललेला पांढर्या ढगांचा पाठशिवणीचा खेळ तासनतास बघत राहावे… थोड्या वेळाने मग सोन-पिवळ्या रंगांच्या उधळणीत त्या पाणवठ्याचे क्षणोक्षणी बदलणारे रूप न्याहाळत….सरत्या दिनकराच्या साक्षीने…अथांग आभाळाच्या दिशेने झेप घेतलेल्या विहंगांच्या किलबिलाटात स्वतःलाच शोधत बसावे…
…यातच आयुष्याची खरी मजा आहे!!!
Copyright ©निसर्गरम्य चिंदर

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress