श्री दुर्गादेवी माता

कुणकावळ्याची श्री दुर्गादेवी माता

नवरात्रात नऊ देवी लिहायचा संकल्प सोडलाय, पण आज मला नेमकं कुठल्या देवीबद्दल लिहू त्याचे कामाच्या गडबडीत इनपुट मिळालेच नाही. कुठली लिहू कुठली लिहू असे आठवत असताना आता मरेथॉन मधून गाडी काढली आणि आता भारतमाताच्या वळणावर बसून हा लेख लिहितोय.

खरतर देवीचे प्रत्येक रूप हे अगम्य असते. आणि मी एकमेव माणूस आहे जो स्वतः सांगतो मी अंधश्रद्धाळू आहे. मला कोण काय बोलतो याचा फरक पडत नाही मी कुठल्याही देवाला पाया पडतो आणि देव हा पण दगडातच असतो.. हा पण तुम्ही त्याला तुमच्या पूजा थाळी आणि साडी ओटी मध्ये शोधणार असाल तर मात्र त्याच्या थोडा दूर आहे.. मूर्ती शास्त्र समजून घ्या आणि मग पहा श्रद्धेचा अनुभव किती जिवंत असतो..

कोकण पट्टीतील देवीची काही मूर्ती एवढ्या विलक्षण आहेत की त्याच्याबद्दल लिहिणं म्हणजे क्षणांचे शब्द होणे आणि शब्दांच्या आरत्या होणे. मला आवडलेली देवीची मूर्ती म्हणजे मालवण तालुक्यातील कुणकवळेची दुर्गामाता. एवढ्या सुंदर ताकदीचे कोरीवकाम की फक्त पाहत रहावं आणि अखंड शिळेतील चैतन्य म्हणजे काय याचा शोध तुम्हाला तुमच्या शोधात नेतो.

आख्यायिकेनुसार पांडवांनी स्थापलेली ही मूर्ती अशी हिची ओळख आहे. तुम्ही जेवढं इतिहासाच्या पानावरुन मागे जाल तेवढं पुराण कथेवर अलगद उतराल एवढं सगळं विलक्षण महात्म्य या शक्तीपीठात आहे. मी जो काही मूर्ती शास्त्राचा अभ्यास करतो त्या सगळ्या कसोट्या वापरल्या तरी त्या पुस्तकातील शास्त्र वाचनात कमी पडेल एवढं रेखीवपण इथे कोरल गेलंय.

आज मुंबईचे गणपती पाहताना मूर्ती राहूदे बाजूला अगोदर प्रभावळ पाहतात. तुम्ही जर खरंच प्रभावळ प्रेमी असाल तर या गाभाऱ्यात एकदा डी एस एल आर कॅमेरा न आणता उभे राहा मग कळेल एवढ्या जवळ राहून एक्स्पोजर किती वाईड होतो ते.. अखंड पाषाणात कोरली गेलेली मूर्ती आजही चमत्कार आहे. उजव्या हातात तलवार चक्र आणि डाव्या हातात त्रिशूल आणि हातातला तो परळ.. या सगळ्याला एक अर्थ आहे आणि ज्याला समजलं त्यालाच हे सगळं उमगलं म्हणून मी म्हणतो की मी देव फक्त दगडात शोधतो..

मी मामा सुधीर वराडकर यांच्या कडुन खूप वेळा देवीबद्दल ऐकलंय. पूर्वी म्हणे गावात सर्पबाधा झाली की देवीच्या या परळ पात्रातील फक्त पाणी ते सगळं विष उतरावयाचे.. अशा खूप गोष्टी आहेत ज्या समजल्या की शक्तीपीठ आणि ग्राम दैवतांची श्रीमंती आपल्याला समजत जाते. ठसठशीत दिसणाऱ्या खडावा, पायाशी असणाऱ्या दोन दासी, अंगावरील दाग दागिन्यांचे असणारे वैभव हे सोन्यातच असूच शकत नाही..

आणखी एक गोष्ट सांगतो, जगाचे भाकीत सांगणारा ब्रम्हदेव देवीच्या मंदिरा मागे डोंगरावर भिंती नसलेल्या कौलारू मंदिरात एकटाच उभा आहे.. त्याची मूर्ती म्हणजे अनेक प्रश्न आणि असंख्य उत्तरांचा खेळ आहे..

हा सगळा मंदिर परिसर केव्हाही पाहिलात तरी सुंदर दिसतोच पण पावसात तर अतिसुंदर दिसतो.. भातमळे, त्यात मेरेच्या बाजूला वाहत जाणारे पाणी मागे हिरवा गर्द डोंगर.. अगदी प्री एलिमेंटरी च्या परीक्षेला रंगवले गेलेलं निसर्गचित्रच ! Rishi Shrikant Desai 's Profile Photo

खूप काही लिहिण्यासारखे आहे, फक्त तुम्ही एकदा पाहून तरी या !! वेळ मिळेल आणि तिला हवं तेव्हा तिच्या श्रद्धेच्या आणि आशीर्वादाच्या गोष्टी नक्की लिहीन.. सध्या मात्र बसलोय तिच्याच गाभाऱ्यात खांबाला टेकून.. तिच्या उजव्या कौलाची वाट बघत !!
Rishi Shrikant Desai

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress