श्री चामुंडेश्वरी माता

आंदूर्लेची श्री चामुंडेश्वरी माता

कोकण हा ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने मंत्रभूमी झालेला हा पुण्यपावन प्रांत आहे. आणि सिंधुदुर्ग म्हणजे देवभूमी आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवींची रूपे लोकांसमोर मांडताना मुळात ही दैवी संपत्ती लोकांसमोर मांडताना आपलं काहीच रिते झाल्याचं वाटत नाही उलट आपण असे काहीतरी देतोय की ज्याने आपण पूर्णत्वास जातोय ही भावना खूप सुखद आहे. मुळात मी काही अवघा महाराष्ट्र फिरलोय अशातला भाग नाही पण जे वाचलंय, जे पाहिलंय ते सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मी सिंधुदुर्गातला जरी असलो तरी माझा दावा आहे की माझ्यासारखेच जवळ जवळ 98 टक्के लोक असतील की ज्यानी संपूर्ण सिंधुदुर्गातील मंदिरे अजूनही पहिली नसतीलच.. हे सगळं लिहिण्याचे कारण म्हणजे आज ज्या देवीबद्दल, ज्या मंदिराबद्दल लिहितोय त्या मूर्तीचे रूप प्रचंड वेगळे आहे आणि हो,हे देखणेपण अजूनही प्रसिद्धीपासून कोसो दूर आहे. महाराष्ट्रातील कदाचित एकमेवाद्वितीय बैठकीची असणारी आंदूर्लेची चामुंडेश्वरी आई!

आंदूर्ले गावाचे पूर्वीचे नाव अडुळ होते, आणि याचा उल्लेख नवनाथ भक्तीसार मध्येही आढळतो.कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी हा परिसर ग्रामदैवतानी प्रचंड समृद्ध आहे. त्याच वैभवातील माणिक शोभावे असे हे मंदिर आहे. मंदिराचे स्थापत्य हे दाक्षिणात्य शैलीतील असलं तरी पारंपारिकपणा मात्र ठसठशीत दिसतो.चामुंडेश्वरी मातेची तुम्ही आजवर पाहिलेली चित्रे आणि याठिकाणी असलेली मूर्ती ही विलक्षण वेगळी आहे. मंदिर नवीन दिसत असले तरी मंदिरातील मूर्ती सुमारे १९२९ साली साकारली गेली. खरतर या मूर्तीचे रूप पाहिल्यावर जो प्रश्न तुम्हाला पडतो त्याच प्रश्नात खूप मोठा इतिहास लपलाय. कुणकावळे गावच्या मेस्त्री नावाच्या कारागिराने शक्तीचे हे कधीही न पाहिलेले रूप साकारले आणि त्यास स्वताच एक संजीवन अवस्था प्राप्त झाली, आणि या रूपाचे शोध अजूनही काळाच्या पडद्याआड राहिले.
मी नेहमी सांगतो भाविक बनणे म्हणजे केवळ फुलांची पूजा आणि खणा नारळाची ओटी नाही. तर मूर्तीसमोर उभं राहून ते चैतन्य अंगीकारणे. या सर्व विस्मयकारी गोष्टींची अनुभूती या मंदिरात येते.
आई चामुंडेंश्वरी ची मूर्तीचे वेगळेपण हे तुम्हाला स्पष्टपणे जाणवते. मूर्तीची बैठक ही वेगळीच आहे. प्रभावळीवर चंड मुंड या दोन्ही असुरगणाची मस्तके कोरलेली आहेत. युद्धाच्या पावित्र्यात एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल घेतलेली अशी द्विभुज मूर्ती आहे. मूर्तीवर सूर्योदयाची किरणे पडताना ती आपादमस्तक पडावी अशी रचना असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिरात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, देवीची दिवसाला तीन रूपे दिसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. सकाळी बाल्यावस्था, मध्यान्ही युवावस्था, आणि दिवस मावळतीस क्रोधायमान रूप अशा रुपात चामुंडामातेचे रूप दिसते. आणखी एक महत्वाचे मूर्ती जर उजवीकडून पहिली तर हसल्यासारखी आणि डावीकडून पाहिलं तर कोधायमान दिसते. अर्थात ही मिटल्या डोळ्यांची श्रद्धा आणि उघड्या डोळ्यांसाठी मूर्तीशास्त्राचा अनोखा नमुना आहे. शेवटी दोघांपैकी एका ठिकाणी कुठतरी नतमस्तक व्हावेच लागेल हे ही तेवढंच खरे. 
कोकणातील देवीचे हे रूप खरंच विस्मयकारी आहे. पाटील, पाटकर यांच्या सह अनेक कुटुंब परिवाराचे हे कुलदैवत आहे. आंदुर्लेचे ग्रामदैवत आंदुर्लाइची महती आणि मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. देवीचे एक विलोभनीय रूप या मंदिरात पहायला मिळते. ही माहिती मिळवताना अनेक महत्त्वाच्या नोंदी सापडल्या . म्हापण, परुळे, पाट कोचरा परिसरातील भाविक या नवरात्रीत नवदुर्गांचे दर्शन घेतात.भावई मंदिर-कोचरा, माउली मंदिर-पाट, आंदुर्लाई मंदिर -आंदुर्ले , चामुंडेश्वरी मंदिर-आंदुर्ले,शांतादुर्गा मंदिर – म्हापण, ताराबाई मंदिर – केळुस, सड्यावरची माऊली – चेंदवण, वराठी मंदिर – परुळे,सातेरी मंदिर -कोचरा अशा नवदेवींच्या दर्शनाला जातात.
खरतर आदिशक्तीच्या अनेक रुपांबद्दल जाणून घेतात चामुंडेश्वरी देवीचे हे रूप कल्पनेपल्याडचे आहे. आणि कदाचित या रूपालाच दैवी शक्ती म्हणतात.. कोकणात गेलात तर आवर्जून जा, दर्शनक्षणांची नवरात्र करायला !!!

💐 आई चामुंडेश्वरी देवी नमोस्तु$ते 💐🙏

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress