मिर्लेश्वर भगवती मंदिर

मालवण आनंदव्हाळचे मिर्लेश्वर भगवती मंदिर

या एका सिरीजच्या निमित्ताने माझा निदान देव या संकल्पनेवर घट्ट विश्वास बसू लागलाय. खरतर ऑफीसच्या धबडग्यात देव मोहीम जरा संध्याकाळपर्यंत लांबते. त्याबद्दल जास्त विचार करायला वेळ मिळत नाही. पण लिहीताना जे काही आदिशक्ती रुप दाखवते त्याला केवळ नतमस्तक व्हावे लागते.

मालवणकडे जाताना चौक्यापासून आनंदव्हाळ कडे निघालात की आजगावकर बंगल्याच्या अगोदर एक अष्टकोनी प्राथमिक शाळा आहे. ती बघतो आणि जवळ जवळ सगळेच पुढे जातात. पण त्याच्या बाजूला एका लाल तांबड्या मातीतील कच्चा रस्ता आहे.. त्याच वाटेने पुढे गेलात की आनंदव्हाळची मठकरवाडी पर्यंत पोहोचाल. त्याच मठकरवाडीत एक छोटसं मंदिर आहे. त्याच मंदिराची आजची ही भक्ती परिक्रमा..

मालवण तालुक्यातील बुधवळे या गावी मिर्लेश्वर भगवती या शिव पार्वती रुपाचे एक देखणं मंदिर आहे. त्याच गावातील काही माणसे साधारण दहा पिढ्य़ापुर्वी मालवणातील आनंदव्हाळ या गावी येऊन स्थायिक झाले. त्यावेळी देवाचे स्थान म्हणून काही शिला आणल्या गेल्या. पण कालातंराने देवीचे ते रुप आपल्याजवळी ही असावे म्हणून या इथेही बुधवळ्यातील तेच प्रतिरुप साकारण्याचा निर्णय घेतला. आणि भगवतीचे मंदिर साकारले गेले. देवीच्या भगवती रुपाला त्या मंदिराप्रमाणेच मिर्लेश्वर भगवती म्हणूनच हाक मारण्यात येते.

खरतर ही देवीची ही मूर्ती जरी अगदी अलीकडची असली तरी हेच रुप बुधवळ्यातही आहे. भगवती नाव जरी असले तरी महिषासूर मर्दिनीच्या रुपातील देवीचे हे रुप आहे. साधारणपण प्रतापगडची भवानी किंवा तुळजा भवानीच्या रुपाशी काही अंशी साधर्म्य असणारे हे रुप आहे. हा लेख वाचत असताना आता परत एकदा सोबतचा फोटो पहा आणि पुन्हा लेख वाचायला सुरुवात करा.

मुळात महिषासुरमर्दिनी हे रुप देवीच्या शिल्पकारांना सर्वात जास्त खुणावले गेलेले आहे. दुष्टांचे निर्दालन करणारे हे रुपं विविध आयुधानी सज्ज असे पुजनीय असेच आहे. एका हातात खडग, एका हातात ढाल , एका हातातील त्रिशूळदंड महिषासुरांच्या पोटात घुसवलेला आणि एका हाताने महिषासूराचे आवळलेले तोंड.. हे रुप अतिशय मनमोहक अशासाठी आहे की, या सगळ्यातही देवी मुखाची प्रसन्नता विलक्षण तेजोमय़ आहे. पृथ्वीखंडाला त्राहीमाम करणाऱ्या महिषासुर राक्षसाचे निर्दालन म्हणजे देवीसाठी खुप सहजसाध्य गोष्ट असे भाव म्हणजे देवीचा आदिशक्तीत्व उलगडून दाखवतात.. आणखी एक गोष्ट म्हणजे, काहीशी होयसळ शैलीत मूर्ती रेखाटावी एवढी प्रसन्नता आणि अलंकाराचे वैविध्य या देवीकडे पाहिल्यावर जाणवते.

आता नाव भगवती आणि महिषासुर मर्दिनी रुप कसे या प्रश्नाचे उत्तर माझ्या मते इथे देवीचे जसं पार्वती असणं हे आहेच पण त्याचबरोबर असणारे दुर्गा रुप या निमित्ताने स्वतंत्र उलगडत जाते.. शक्ती उपासना ही महाराष्ट्रात भौगोलिक मर्यादानुसार जरी बदलत गेली असली तरीचे पुजन मात्र तेवढ्याच तन्मयतेने होते. आणि या सर्वात आयुध ही संकेत चिन्ह बनतायत. मला वाटत हे सगळं अभ्यासायला पाहिजे. बुधवळ्याला जाऊन मिर्लेश्वर भगवती आणि भगवतीचे रुप पार्वतीपणा पेक्षाही महिषासुरात का प्रकटले याचे उत्तर नक्कीच संदर्भासहीत असेल. ते उत्तरही मिळाल्यावर नक्की लिहीन..

तेव्हा मला खात्री आहे, मंदिरमूर्ती पाहिली नसेल तर नक्की पाहणारच म्हणा. आणि हो, आत जायला वेळ नाही मिळाला तर यापुढे बाईकवरुन जाताना एक बारीकसा हॉर्न त्या शाळेकडे गेल्यावर तरी नक्की वाजवाल.. कारण मंदिर आणि आई तिथेच आहे ठाम.. आपणच फक्त खूप वेगात आहोत ना.. आपल्याकडे कुठे आहे एवढा वेळ ?

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress