भगवंतगड

भगवंतगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यात किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या प्रमुख दोन जलदुर्गांसह गडकिल्ल्यांची साखळीच पसरली आहे. ३२ हून अधिक गड, कोट जिल्ह्यात ठिकठिकाणी आपली साक्ष दर्शवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अमुल्य ठेवा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने झाडी, झुडपे पडझड झालेल्या अवस्थेत काही किल्ले जणू शेवटची घटका मोजत आहेत. त्यापैकीच एक असा मालवण आचरा मार्गावरील चिंदर गावात असलेल्या व गडनदीच्या पात्रालगत वसलेला भगवंतगड होय.

दरम्यान, या किल्ल्याचीही अशीच दुरवस्था झाली असून शासनाचे उंबरे झिजवून अद्याप कोणताही निधी दुरीस्तीसाठी व सुशोभिकरणासाठी निधी प्राप्त झाला नाही. याही पलीकडे दुर्दैवाची बाब म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या सिंधुदुर्गात पर्यटन विकासासाठी शंभरहून गावे निवडण्यात आली. मात्र या गावांच्या यादीत चिंदर भगवंतगडचा उल्लेखच नसल्याने ग्रामस्थही संतप्त झाले आहेत. सिंधुदुर्गाच्या पर्यटन विकासासाठी महाराष्ट्रातील नवे भाजपा शिवसेना सरकार प्रयत्नशील असताना सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या पर्यटन राज्यमंत्री किल्ले भगवंतगडसह अन्य दुर्लक्षित गडकिल्ल्यांना संजीवनी देण्यसाठी पुढाकार घ्यावा. तसेच पर्यटनमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही सिंधुदुर्गातील गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीसह पर्यटन विकासासाठी विशेष लक्ष द्यावे अशीही मागणी चिंदर ग्रामस्थांसह जिल्हा वासियांकडून केली जात आहे.

सुमारे शंभर एकर क्षेत्र परिसरात हा किल्ला वसला आहे. पूर्वी भगवंतगड चिंदर म्हणून एकत्रित ओळख असलेला हा गाव वजा किल्ला आता गावाच्या नावातूनही दूर फेकला आहे. मालवणातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या गडनदी याच किल्ल्याच्या पायथ्यावरून वाहते. महाराजांनी वसवलेला हा शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आज जणू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या किल्ल्यावरून व गडनदीच्या तळाखाली जाणारा भुयारी मार्ग मसुरे भरततगड किल्ल्याला जाऊन मिळतो असे येथील ग्रामस्थ आजही छातीठोक पणे सांगतात. मात्र या भुयारी मार्गावर अनेकठिकाणी पडझड झाल्याने मार्ग बंद आहे. भगवंतगड किल्ल्याचा प्रमुख वापर त्या काळी. शस्त्र ठेवण्याची जागा शस्त्रागार म्हणून व्हायचा. त्याठिकाणी असलेले बांधकामाचे पुरावे त्याची सत्यता दर्शवत आहे. गावचे जेष्ठ ग्रामस्थ बाळा चिंदरकर, सरपंच माया सावंत, माजी सभापती धोंडी चिंदरकर, संतोष गावकर राजू वराडकर, मनोज हडकर, रविंद्र घागरे, यासह अन्य  ग्रामस्थ या किल्ल्याचा व गावाचा पर्यटन गावाच्या यादीत समावेश न झाल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. तर शासनाकडे उंबरे झिजवूनही अनेक वर्षे काहीच उपयोग झाला नाही. आता भाजपच्या पर्यटन मंत्र्यांनी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशीही मागणी होत आहे.

या भगवंतगड किल्ल्यावर सिद्धेश्वर मंदिर आहे . याठिकाणी चिंदर गावचा रामेश्वर डाळपस्वारी उत्सव होतो. मात्र चढणीचा अर्ध्या किमीचा मार्ग धोकादायक व झाडी वाढलेला आहे. याठिकाणी पुरातत्व विभागाने मार्ग तयार करावा. किल्ल्याची पडझड झालेला भाग दुरुस्त करावा. चिंदर लगतची गावे यांना जोडणारा भगवंतगड बांदिवडे हा खारबंधारा पूल नव्याने उभारणी व्हावा. प्रशस्त खाडीपत्रात बोटिंग सुविधा उपलब्ध व्हावी. किल्ल्यावरून खाडीपात्र व परिसरातील निसर्गरम्य नजारा पाहता यावा असे पर्यटन स्थळ विकसित करून पर्यटन गावात चिंदर भगवंतगडचा समावेश करावा व किल्ल्याला नवसंजीवनी द्यावी अशी मागणी चिंदर ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

                                                                                       ……………………. झुंझार पेडणेकर

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress