परुळेचे येसू आक्का मंदिर

परुळेचे येसू आक्का मंदिर

Image may contain: flowerसिंधुदुर्गात शक्तीपीठ या शब्दाची व्याख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जशी जोडलेली आहे तशीच ती झाडापेडातही घट्ट रुतलेली आहे. शेवटी दैवत म्हणजे काय तर ज्या गोष्टींना मन घाबरते तिथे कुणीतरी येऊन सोबत करणे आणि जगण्याचा आशावाद प्रज्वलीत करणे. मी आज लिहितोय ते मंदिर आहे पण ते दैवत नवसाला पावणारे आहे की नाही माहीत नाही पण हाकेला धावत.. तेही तुमच्या सोबत..

परुळेहून मालवणच्या दिशेने निघालात की एक तिठा येतो एक रस्ता कोरजाईला आणि एक रस्ता मालवणला.. मालवण रस्त्यावरचे हे येसू आक्काचे मंदिर . मुळात देवी हाच निकष दैवतपदाला नेणारा असेल तर माणूस पण दैवी पदाला जाऊन पूजणे म्हणजे अगम्य आहे.. येसू अक्का कोण होती, आणि ती देवळांत कशी आली ही कथा मला ठाऊक आहे पण मी लिहिणार नाही कारण प्रत्येकाची गोष्ट प्रत्येकाच्या श्रद्धेने जोडलेली असते.

मला आठवतंय पूर्वी हा देवलीचा पूल नव्हता. तेव्हा तारकर्ली जा तिथून होडी , होडीने कोरजाई आणि मग एस टी ने परुळे हा असा प्रवास असायचा. हा प्रवास मी पण केलाय. तर पूर्वी प्रवासी त्या तिठ्या वर यायचे.. आणि मग मनातलं बोलून प्रवास पुढे सुरू व्हायचा. मग नंतर देवलीचा पूल झाला रहदारी वाढली.. मच्छीवाले मासा भाकरी, बाइक वाले अगरबत्ती, ट्रक वाले नारळ तर कोण कुठे रस्त्यावरून पानविडा ठेवू लागले. मनातल्या इच्छेला येसू आक्का यश म्हणून पूर्णत्वास नेऊ लागली.

मी याच रस्त्यावरून पूर्वी वकील असताना बाईकवरून वेंगुर्ला कोर्टात जायचो. घरी येताना संध्याकाळ व्हायची. साधारण देवळा पर्यंत येईपर्यंत एकटेपणा जाणवायचा नाही पण नंतर मात्र तो काप, तो रस्ता एकटेपणाची जाणीव करून घ्यायचा.. अशावेळी मनातील चीनमिन वाढत जायची त्यावेळी कोण कुठून तरी हमखास बाइक वाला क्रॉस व्हायचा आणि मग तो पुलापर्यंत असायचा..असे खूप वेळा झालंय की नंतर तो दिसेनासा व्हायचा.ज्यांना कोकण कळलंय त्यांना पक्के ठाऊक आहे आमचे देव आमच्यासाठी वाटमार्गी येऊन आधार देऊन निघून जातात..  Image may contain: people standing, sky and outdoor

आता रस्ता खूप बदललाय..विमानतळ झालंय.. मी पण त्या रस्त्यावरून नाही गेलोय खूप दिवस झाले असतील..पण एक मात्र नक्की येसू आक्का आहे.. ती अजूनही आधार देतेय.. इथे मुंबईत असूनही एकटेपणा वाटतो तेव्हा तीच देते जगण्याचे आणि लढण्याचेही बळ !!

– ऋषी श्रीकांत देसाई

 

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress