टेरवची भवानी माता

टेरवची भवानी माता

संपूर्ण कोकणातील देखण्या देवी मंदिराबद्दल मी आज लिहीणार आहे. खरतर कोकणातील प्रत्येक मंदिराची एक वेगळी शैली असते.. कौलारु मंदिर, देखणी ग्रामदेवतेची मूर्ती असं काहीसं पारंपारिक चित्र कोकणातील प्रत्येक मंदिराबद्दल प्रत्येकाच्या मनात असते. पण मी आज जे लिहीणार आहे ते नव्याने बांधलले पुर्ण काँक्रीटचे संगमरवरी पण तरीही लाल तांबड्या मातीतील खरे वैभव असणारे चिपळुणजवऴच्या टेरवचे श्री वाघजाई भवानी माता मंदिर..

Image may contain: one or more people and indoor
या मंदिराची बांधणी पाहिली की तुम्ही म्हणाल हे कुठल्या शहरातलं भव्य मंदिर आहे.. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की अस्सल कोकणच्या लाल तांबड्या मातीतील वास्तुशिल्पाचा हा नमुना आहे. पुर्वी टेरव ग्रामस्थांचं हे भवानी आणि वाघजाई मंदिर हे देवरहाटीत होते. अवघ्या गावाने संकल्प सोडला आणि उभ राहिलं संपुर्ण कोकणातल एक भव्य देखणं वास्तु शिल्प.. मंदिराचे बांधकाम नवे असले तरी परशुराम भुमितील या भवानी मातेचा इतिहास चक्क तुळजापुरच्या भवानीशी नाते सांगणारा आहे.
टेरव गावातील कदम शिंदे घराण्यांचा हा इतिहास आणि संपुर्ण गावाची या मंदिरावरची श्रद्धा सांगताना गावक-यांचा उर भरुन येतो. शुभ्र पांढ-या रंगाचे हे मंदिराच्या आकाशाच्या निळाईवर तुमच्या नेत्रात अमाप अध्यात्मश्रीमंती देऊन जाते. सुमारे दोन हजार भाविक एकाचवेळी बसतील अशा विशाल सभामंडपाचे हे दाक्षिणात्य पद्धतीचे मंदिर आहे. मंदिराच्या चारही गाभा-यावर दाक्षिणात्य घाटाचे गोलाकार कळस आहेत. मंदिराला दोन महादवारे आहेत. या मंदिराच्या संपुर्ण बांधकामावर नजर टाकली तर नक्षीदार कोरीव काम, वीणाधारी स्त्री, मृदुंगधारी वादक, नृत्य अप्सरा, ध्यानस्थ देवी, गवाक्षावर मोर, कपोत, हंस, विष्णुच्या दशावतारी चित्रांची कोरीव शिल्पे या सगळ्या गोष्टी मन लुब्ध करुन घेतात..
या सगळ्यात जेव्हा तेव्हा मंदिरातील भवानी मातेचं दर्शन घेता तेव्हा प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा ही ओळ मनात रुंजी घालत राहते. तुळजाभवानीची हि मुर्ती काळ्या निलम पाषाणातील असुन उडपी येथून बनवून घेण्यात आली आहे. हाती आयुध असलेली महिषासुराचा वध करणारी मातेची ही मुर्ती मन प्रसन्न करणारी आहे. मंदिर परिसरात वाघजाई सोबत अन्यही देवतांच्या मुर्ती आहेत पण या सगळ्यात मंदिरातील नवदुर्गा तुमची अध्य़ात्म परिक्रमेची नवरात्र संपुर्ण सुफळ करतात
मंदिर आणि मंदिराच्या परिसरात झुळझुळ वाहणारी हवा, सात पुष्पवाटीका, अर्धवर्तुळाकार उद्यान, देवराईची हिरवाई तुमच मन प्रसन्न करेल. ग्रामदेवतेच मंदिर आणि पंचक्रोशीतल्या गावक-यांचा पालखीसोहळा या निमित्तानं हे मंदिर गजबजुन जाते…
श्री कुलस्वामिनी वाघजाई तुळजाभवानी मंदिर हे आधुनिक असलं तरी साडेतीनशे वर्षाचा इतिहास ल्यालेलं आहे. शिवकालाचा इतिहास सांगताना इथल्या गावक-यांचे मातेचे आणि मातीचं नातं सांगताना सश्रद्ध होत राहतात.. आभाळाची निळाई, निसर्गाची हिरवाई आणि श्रद्धेची अपुर्वाई लाभलेलं टेरव हे मंदिर तुम्हाला पाहताक्षणी नाविन्याला श्रद्धा आणि परंपरेची जोड लाभते तेव्हा आपणच किती श्रीमंत वारसा घेऊन जगतोय याचं भान देऊन जातं..
चिपळुणात कधी आलात तरी गोव्याकडे जाताना अवघ्या सात किलोमीटरला डावीकडे वळून साधारणपणे सहा किलोमीटर आत आल्यावर टेरवचे मंदिर नजरेस पडेल. माझी एक पैज नक्की आहे, या सोबतच्या छायाचित्रापेक्षाही भवानीची मूर्ती कितीतरी पटीने तेजस्वी आहे. फोटोत न सामावणारे तेज पहायचे असेल तर नक्की पहा चिपळूणच्या टेरवचे श्री वाघजाई भवानी माता मंदिर

 

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress