श्री काळम्माईदेवी मंदिर

गावकरवाड्यातील श्री काळम्माईदेवी मंदिर

No automatic alt text available.ग्रामदैवत आणि शक्तीपीठांच्या जागरांच्या या सोहळ्यात कुलदैवतांचे अनोखं स्थान आहे. आणि हे वेगळेपण भक्तांच्या श्रद्धेतून आणि दैवतांच्या स्थानांतून जागृत होत राहते. मालवण शहर हे श्रीदेव रामेश्वर, श्री देव नारायण आणि श्री देवी सातेरी यांच्या कृपाशिर्वादाच्या छत्रछायेखाली सुखनैव नांदते आहे. आणि या सगळ्यात मानकरी असणाऱ्या गावकर कुटुंबाचे आणि मालवणचे केवळ जमिनीशी नाही तर इतल्या मातीशी घट्ट नाते आहे. मालवणचे ‘मालवणपण’ जपणाऱ्या व्यक्तिंमध्ये वसंतराव गावकर या नावाचा केवळ मानकरी म्हणून नाही तर संस्कृतीचा मानद अधिपती म्हणून उल्लेख करणे गरजेचे आहे. अर्थात या सगळ्या या गोष्टी पुढे लेखात मी उदघृत करणारच आहे पण आज नवरात्रीनिमित्त मी लिहीतोय मालवणच्या गावकरांचे कुलदैवत असणाऱ्या श्री काळम्माईदेवीच्या मंदिराबद्दल..

हि गोष्ट सुरु होते त्या काळात जेव्हा मालवणच्या सिमा गिरोबा, ओवळीयाचे झाड, रांजेश्वर, आणि खापरेश्वराच्या हद्दीपर्यंत मालवण बांधल गेलं तेव्हापासून.. त्याच्याही अगोदर तीन जणांचे येणं इथल्या संस्कृतीच्या पाऊलवाटा रेखाटत गेलं. आणि या वाळूतून पावलांचा माग उलटा काढायला गेलो की तुम्हो पोहचाल थेट सह्याद्रीच्या पर्वत रांगात.. आजचे शक्तीपीठ असणारे काळम्मादेवी ही मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीच्या सरवदे गावातील. एका पौराणिक कथेनुसार क्रोधायमन होऊन दुर अनवट जंगल स्थानावर वसलेली हे शक्तीपीठ आहे. वाकीघोल हेळेवाडीचा काळम्मादेवीचा धबधबा आणि काळम्मा धऱणाची जलदात्री असे हे देवीचे रुप आहे. तर याच देवीचे भक्त असणारे शिवपुर्वकाळापासून सरदार असणारे गावकर घराणे सुभा जिकंत मालवणात आले आणि मग ही वस्ती आकार घेत गेली. अर्थात ही गोष्ट आजची नाही फार पुर्वीची आहे. क्षात्रकुलोत्पन या शब्दाचा अभिमान असताना या सगळ्या गोष्टी जर सुरुवातीपासून समजल्या तर इतिहासाची धार या लालतांबड्या मातीचा मळवट बनते. अजुनही काळम्माईदेवी कडे जायची वाट ही प्रचंड अनवट आहे. एवढी अनवट की पश्चिम महाराष्ट्रातीलही अनेक भक्त तिथे अजुनही दर्शनाला गेले नाहीत. अर्थात हे स्थान एवढे पुरातन आहे की एमपीएससीच्या प्रश्नात ताम्रपाषाण युगाचे संदर्भ आहे की सावरदे आठवावेचे लागते.

रामेश्वर आणि सातेरीचे मानकरी असणाऱ्या गावकऱ्यांनी मग कुलदैवतांचे रुप मालवणात वसवण्याचा निर्णय घेतला. आणि मग काळम्माईचे मंदिर साकारले. गावकर कुटुंबियांना कुलदैवताच्या पुजेअर्चेचा भाग्यसोहळा मिळाला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालवणच्या या मंदिराला केवळ गावकरवाड्यातील भाविकच नव्हे तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, उर्वरित महाराष्ट्र, मुंबई कर्नाटक येथून काळम्माईदेवीचे भक्त ज्यांना ज्यांना सावरदे येथे जायला जमत नाही ती भाविक मंडळी वायरीत दर्शनाला येतात. आणि माझी खात्री आहे की , ज्यांना आज कळेल की काळम्माई देवीचे मंदिर मालवणात आहे ते उद्यापासून नक्की रिघ लावतील.

नवरात्रीच्या सोहळ्यात देवीचा जागर अखंड सुरु असतो. या मुर्तीच्या देवीसमोर केवळ उभे जरी राहिलात तरी देवीचा मुखवटा पाहिला तरी प्रसन्न वदने प्रसन्न होशी नीजदासा या शब्दाची यथार्तता तुमची तुम्हाला अध्यात्मश्रीमंतीची जाणीव करुन देईल. खरतर हा वाळूच्या कणाकणात रेखाटलेला आपला इतिहास आहे. हा निदान वाळूच्या धुळाक्षरांनी तरी कुणीतरी रेखाटायला हवा.. श्रीकांत देसाई आणि वसंतरावांचे मालवणच्या इतिहासांमुळे एक नाते आहे. आज आम्ही कुणाकडून इतिहास शोधायचा हा प्रश्न आहे. मी सकाळी फक्त या मंदिराचा टिझर टाकला तर उत्तर फक्त पाच सहा मंदिराभोवती फिरत राहीली.. मला उदय गावकरने प्रचंड मदत केली. त्याच्या माहितीवरुन निदान हे सगळं लिहीण जमलय. काळम्माआई हे केवळ गावकरांचे कुलदैवत नाहीय मालवणच्या प्रत्येक नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. मलाही जरीमरीपासून सातेरीपर्यंत सगळं लिहायचय पण हे मंदिर म्हणजे आरंभाचा प्रारंभ आहे म्हणून आवर्जुन लिहीलय.

श्रध्देची ही अनाम गाथा पश्चिम महाराष्ट्रालाही आज मालवणकडे खेचतेय. दुर डोंगरात असणारे जगदजननीचे हे रुप नारळा पोफळीचे अबदागीर उभे असलेल लवण प्रदेशात प्रसन्न मुद्रेने उभी आहे. तुम्हीही कधी मालवणात आलात तर गावकरवाड्यातील काळम्माईदेवीच्या या मंदिराला नक्की भेट द्या ..

( मला कुणाच्या भक्तीच्या मर्यांदाना जोखायचे नाहीय. मी काही माझ्या वडिलांएवढा इतिहास अभ्यासक नाही. फक्त एक मंदिर मिळालं की त्याच्यामागे भूत बनून लागतो. माहिती मिळवतो आणि फेसबुकवर टाकतो. म्हणून शेंदुर फसलेल्या प्रत्येक दगडात मला देव दिसतो.
फक्त मनापासून एवढच कळकळीने सांगायचे आहे, मला इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे विषवृक्षाची छाया नाटक सारखं आठवतय. इतिहास जेवढा जमेल तेवढा लिहा, जमेल तेवढा सांगा.. पुर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी एक सुंदर प्रथा होती. पहिल्या दिवशी सगळ्या मंदिराचे आम्ही दर्शन घ्यायचो. आता रामेश्वर ते भरड दत्तमंदिर एवढ्यावरच आपण उरलोय. हे सगळं पुन्हा सुरु करुया…आपलं चॅलेंज आहे, पुन्हा माथ्याला आणि गळ्याला ग्रामदैवतांच्या अगरबत्तीची विभूती लागेल ना त्या दिवसापासून गळ्याला फासाचा स्पर्शही होणार नाही. )

ऋषी श्रीकांत देसाई, मालवण

© 2019: Sindhudurg | Travel Theme by: D5 Creation | Powered by: WordPress