पेंडूर देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा

डॉक्टर सोमनाथ परब पेंडूर

श्री देव वेताळ

पेंडूर तालुका मालवण मधील मोठे गाव निसर्गरम्य सुंदर गाव. एका बाजूला वेताळगड, लागूनच हनुमान चा डोंगर, सिद्धेश्वर मंदिर डोंगर, आपधारणा टेकडी या निसर्गरम्य डोंगरांच्या मध्ये वसलेले असे पेंडुर गाव. लागूनच भव्य अशी कर्ली खाडी व पर्यटन प्रसिद्ध धामापूर तलाव. गावातच असलेली जीर्ण व भग्न अवस्थेतील जैन धर्मीय लेणी, प्रसिद्ध श्री देव वेताळ, देवी सातेरी देवी,देव रवळनाथ पावनाई,श्री देव लिंगेश्वर इत्यादी प्राचीन मंदिरे. पेंडुर तलावाकाठी असलेले श्रीदेवी तिळंबादेवी मंदिर, परबवाडी येथील महापुरुष मंदिर, परब वंशाचे मस्ने वंश मंदिर, तसेच भोसले वंश मंदिर,खरारे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पराड येथील दुर्गा माता मंदिर, भटवाडी व सोनारवाडी येथील ब्राह्मण देवालये, रायवाडी येथील म्हाळसादेवी मंदिर अशी विविधतेने नटलेली व प्राचीन परंपरा जपलेली आमची मंदिरे. तसेच पेंडूरचे निसर्गरम्य तलाव, आपधारणा टेकडी येथील पांडवकालीन ठेवा असलेल्या खाणाखुणा, प्रसिद्ध असा वेताळ गड हे आमच्या पेंडुर चे वैशिष्ट्य. अशा या पेंडुर गावात दर तीन वर्षांनी भरणारा मांड उत्सव 14 दिवस व 13 रात्री अखंड चालू असतो. आणि असा दीर्घकाल चालणारा जत्रा उत्सव जवळपास आमच्या जिल्ह्यात तर नाहीच नाही पण महाराष्ट्र राज्यात किंवा भारत देशामध्ये भरत असेल असे मला तरी माहित नाही.

अतिशयोक्ती होणार नाही असे वाटते. ज्या पौष महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणतीही जत्रा भरत नाही किंवा कोणतेही धार्मिक कार्यक्रम होत नाही तेव्हा पेंडूर मध्ये सतत 14 दिवस जत्रोत्सव भरतो. व सर्व धार्मिक विधी मंदिराकडे होतात. लोक या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. दर तीन वर्षांनी पौष महिन्यात साधारणपणे डिसेंबर अखेर ते जानेवारी मध्ये असा हा उत्सव साजरा होतो. तुम्ही कुठेही पाहुण्यांकडे जा किंवा कोणालाही तुमच्या गावाचे नाव जर पेंडूर सांगितलं तर लोक हमखास सांगतात मांड तुमच्याच गावात भरतो ना? आम्ही दरवेळेस जाऊन येतो.

            इतकी मोठ्या प्रमाणात सर्व लोकांमध्ये या देवीचा मांड या उत्सवाची ख्याती पसरलेली आहे.पूर्वीच्या काळी मांडाची तारीख ठरविली कि पत्राद्वारे पाहुण्यांना किंवा बाहेर गावी राहणाऱ्यांना कळविले जायचे. पण आताच्या सोशल मीडियाच्या जमान्यात फेसबुक किंवा व्हाट्सअप च्या द्वारे माहिती लोकांपर्यंत क्षणात पोहोचते. Youtube च्या विडिओ द्वारे देखील प्रसिद्धी होते.या 14 दिवसात आमच्या गावचा कोणताही रहिवासी इतर गावात मुक्काम करणार नाही. तो कितीही उशीर झाला तरी गावाकडे आपोआप ओढला जातो. कोणालाही कुठेही राहायची इच्छा होणार नाही.
ज्याप्रमाणे देव भक्ताच्या भेटीला आसुसलेला असतो तसेच गावचा रहिवासी तो गावात असू दे किंवा मुंबई पुणे किंवा परदेशात राहत असू दे तो 14 दिवसात एक दिवस तरी देवाच्या भेटीला येणारच. कितीही खर्च झाले किंवा महागाई कितीही वाढली तरी लोक देवाच्या भेटीला येणारच. माहेरवाशीन देखील या काळात आपल्या देवाच्या भेटीला यायला उत्सुक असतात. शेवट शेवट गावातील एकही घर असे भेटणार नाही की कोणाच्या घरात मुंबईकर किंवा पै पाहुणे आले नाहीत. सर्वत्र लोकांची गर्दीच गर्दी दिसणार. गावातील सर्व लोकही दारीं आलेल्या पाहुण्यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने व न कंटाळता करतात. या उत्सव काळात लोक कुठून कुठून पाहुण्यांची ओळख काढून येतात तेव्हा आपल्या देव व देवीच्या ख्यातीची प्रचिती येते व मन भरून येते.दारीं आलेला पाहुणा देवाच्या रूपात आपल्या दारीं येतो हे सर्व पेंडुर वासियांना मान्य आहे म्हणून त्याची सेवा हीच ईश्वर सेवा मानून लोक त्याचे मानाने स्वागत करतात.नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची बंद घरे देखील पाहुण्यांच्या स्वागताने भरलेली दिसतात. जसा बारा वर्षांनी कुंभमेळा मोठया गर्दीत साजरा होतो, त्याप्रमाणे पेंडूरमध्ये दर तीन वर्षांनी श्रीदेवी वेताळ व देवी सातेरी, देवी जुगाई च्या कृपेने कुंभमेळा भरतो. श्री देव वेताळ त्याची बहीण श्रीदेवी जुगाईला माहेरपणासाठी वाजत गाजत श्री देव वेताळ मंदिरात घेऊन येतो व तिथे तिची खणा नारळाने ओटी भरून तिला 14 दिवसात आपल्या मंदिरात लोकांच्या दर्शनासाठी थांबवतो. 14 दिवसांनी तिची विधिवत सेवा करून तिला तिच्या घरी सुखरूप सोडतो. असे हे बहिण भावाचे नाते दृढ करतो. 14 दिवस पेंडूरमध्ये प्रति पंढरपूरच निर्माण झालेले असते भक्तांचा मेळा जमलेला असतो. आम्ही लहानपणी सिनेमात पाहिले होते की जत्रेत दोन जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी हरवतात व पुढे चित्रपटाची कथा तीन तास चालते पण आमच्या मांड उत्सवामध्ये कोण हरवत नाही तर ” यहा पर बिछडे हुए लोग मिलते है “. चतुर्थी काळात किंवा इतर वेळी तुमचे नातेवाईक मित्र गावी येऊन जातात पण भेट होत नाही. पण मांडाच्या निमित्ताने खूप सारे शाळा सोबती नातेवाईक इतर पै पाहुणे सहज भेटतात. गळा भेट होते, आताच्या जमान्यात सेल्फी द्वारे फोटो काढले जातात. आमच्या शालेय जीवनात शाळा मंदिराला लागूनच असल्याने आमचे मन शाळेपेक्षा जत्रेत फिरून यायचे.शेवटचे तीन ते चार दिवस शाळेला सुट्टी मिळायची किंवा सकाळी दोन तास शाळा असायची . जत्रेत हर प्रकारची दुकाने असल्याने कोणी पाहुण्यांनी किंवा घरातून दिलेल्या पैशातून खाऊ खाण्यापेक्षा टिकाऊ वस्तू आठवण म्हणून विकत घेतली जायची.

 

मंदिर जीर्णोद्धार झाल्यापासून लक्षदीपोत्सव हा आकर्षक कार्यक्रम म्हणजे मांड उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. या दिवशी मंदिरात व मंदिर परिसरातील रिकाम्या जागी दीप पेटविले जातात आकर्षक अशी फटाक्यांची सुंदर आतशबाजी केली जाते.
उत्सव काळात संपूर्ण पेंडूर गाव हा भक्तिमय झालेला असतो. गावातील युवक स्वयंस्फूर्ती ने सर्व प्रकारचे नियोजन करण्यात अग्रेसर असतात.देवस्थान कमिटी दिवस रात्र मेहनत घेत असते.कोणतेही काम करायला कोण नाही म्हणत नाही. विविध राजकीय पक्षांचे पुढारी नेते जिल्ह्यातील मातब्बर व्यक्ती या उत्सवाला आवर्जून भेट देतात. जत्रेच्या निमित्ताने पेंडुर कट्टा येथील व्यापारी, रिक्षा व्यावसायिक, खाजगी वाहतूक व्यवसायिक, ट्रॅव्हल्स व्यावसायिक हे व्यापारामुळे खुश असतात. तसेच जत्रेतील ही विविध दुकानदार व्यापारामुळे खुश असतात.
जत्रा काळात एक दिवस आड वेताळ मंदिरातील दिंडी सातेरी मंदिरात जाते तर दुसऱ्या दिवशी सातेरी मंदिरातील दिंडी वेताळ देवाच्या भेटीला येते. त्यानंतर लोकांची गाऱ्हाणी ऐकून त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. ज्यांना ज्यांना त्याचा अनुभव येतो ते ते लोक पुन्हा दुसऱ्या मांडाला येऊन आपल्या नवसाची फेड करून जातात व इतरांनाही ही माहिती देतात. याला तुम्ही श्रद्धा म्हणाल किंवा अंधश्रद्धा पण तुम्ही या उत्सव काळात मनापासून केलेली मागणी किंवा प्रकट केलेली इच्छा पूर्ण होते म्हणून लोकांची पाऊले आपोआप वेताळ व सातेरी चरणी धाव येतात. तुम्ही मनापासून लोकांचे भले होण्यासाठी प्रयत्न केले तर तुम्हाला संकटकाळी योग्य मार्ग सापडतो किंवा कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला अज्ञात शक्ती मदत करते व तुमच्या नियोजित कामात ऊर्जा निर्माण देऊन जाते. याची अनुभूती मी घेतलेली आहे. मग येताय ना अशी अद्भुत अनुभूती घ्यायला व इतरांना अनुभूती द्यायला.श्री देव वेताळ, देवी सातेरी, देवी जुगाई आपले सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. यंदा देवस्थान कमिटीने गेले एक दीड महिना राबून मंदिर व परिसरात आकर्षक अशी सजावट व रोषणाई केलेली आहे कि जी यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. यंदा वाहतुकीला हि कुठे अडथळे येणार नाही यासाठी देखील योग्य असे नियोजन केलेले आहे. देवस्थान कमिटी व त्यांना आर्थिक हातभार लावणाऱ्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला तर मग वाट कोणाची बघताय, येवा पेंडुर च्या मांडाक, पेंडुर आपलोच आसा

Visits:389
Total: 21365
Translate »
Pendur village Sindhudurg