पेंडूर मांड

पेंडूर गावचा पूर्व इतिहास

             सुमारे २००० हजार वर्षांपूर्वीची पेंडूर गावाची आख्यायिका अशी सांगितली जाते की, फार पूर्वी या गावात पेंढरीची झाडे विपुल स्थितीत होती. त्यामुळे या गावाला पेंडूर हे नाव पडले. तर आख्यायिका अशी की या गावात कोंबडा आरवण्यापूर्वी १२ लिंगांची स्थापना घडली असती तर हे गाव पंढरपूर म्हणून उदयास आले असते. परंतु ११ लिंगांची स्थापना झाल्यावर पहाट झाली व कोंबडा आरवला म्हणून पंढरपूर न होता हे गाव प्रति पंढरपूर म्हणून पेंडूर असे नावारूपास आले. अशी या गावातील थोर वयस्कर मंडळींकडून आख्यायिका सांगितली जाते.

          सन १९२५ पर्यंत पेंडूर गाव हा पूर्वी सावंतवाडी संस्थानाच्या महसूल विभागात होता आणि ब्रिटिशांच्या काळात बेळगाव डिस्ट्रिक्ट बोर्डच्या अंतर्गत येत असे. सद्यस्थितीत पेंडूर गाव हा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या महसूल विभागात आहे. मालवण तालुक्यामध्ये असलेल्या गावांपैकी लोक वस्ती अनुसार पेंडूर गाव हे दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. पेंडूर गावच्या सीमारेषा पूर्वेकडे वराड सीमा (धाकुर्ले गाव), पश्चिमेला काळसे धामापूर चा सडा, दक्षिणेकडे खरारेवाडीची वेस तर उत्तरेला गुरामवाड (कुणकवळे गाव) या पेंडूर गावच्या सीमा आहेत. एका आदिवासीने बाण लावून त्याचा बाण जिथे पडेल ती गावची सीमा होय. अशी या गावाची दंतकथा आहे. पेंडूर गाव हे १) खरारेवाडी २) मुगची वाडी ३) वासंग वाडी ४) रायवाडी ५) सोनारवाडी ६) सावंत वाडा ७) परब वाडा ८) मोगरणे ९) भटवाडी १०) देऊळवाडी ११)तळीवाडी १२) खांदवाडी अशा बारा वाड्या मिळून बनलेले गाव आहे. आषाढ महिन्याच्या अमावस्येपूर्वी चार दिवस अगोदर गावाचे रक्षण सीमेवरून पूर्वापार पद्धतीने भात आणि भक्ष जमिनीत पुरून ठेवले जाते जेणेकरून गावावर कोणत्याही प्रकारचे संकट, रोगराई, वादळ यापासून गावाचे रक्षण व्हावे. या सोहळ्याला मांजरी (देसरुड) असे म्हणतात.

            भौगोलिक दृष्ट्या पेंडूर गावच्या दक्षिणेला कर्लीची खाडी आहे तर पश्चिमेला काळसे धामापूर गावचा डोंगराळ भाग, पूर्वेकडील भाग हा शेतमळा आणि उत्तरेकडील भाग म्हणजे पेंडूर व नांदोस या सीमेवरून तालुक्याला जाणारा रस्ता आहे. या गावचे क्षेत्रफळ अदमासे १०० चौ. कि .मी. आहे.
प्रति पंढरपूर ओळखल्या जाणाऱ्या पेंडूर गावात ३६० स्थळांचा अधिपती श्री देव वेताळ, स्वयंभू श्री देवी सातेरी, नवसाला पावणारा श्री देव रवळनाथ, श्री देवी पावणाई, श्री देव लिंगेश्वर, श्री ब्राह्मण देव, जैन कालीन संकीनी डंकीनी, श्री देव मारुती, श्री देव सिद्ध महापुरुष, श्री देवी तिळंबा, असे अनेक देव देवता या गावात वास्तव्यात आहेत. संपूर्ण वर्षभरात या गावात देवदेवतांचे अनेक उत्सव साजरे केले जातात.
गावच्या मध्यवर्ती पाण्याचा मोठा तलाव व तलावाच्या बांधावर श्री देवी तिळंबेचे मंदिर आहे. आणि तलावाच्या ईशान्य आग्नेय दिशेला अपधारणा टेकडी आहे व गावच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री देव वेताळ मंदिर असून हे पेंडूर गावचे मुख्य ग्रामदैवत आहे व शंकराचा पहिला गण मानतात.
श्री देवी सातेरी मंदिर:- या मंदिरामध्ये प्राचीन काळापासूनचे स्वयंभू मोठे वारूळ (पेड) आहे. या वारुळामध्ये भूमी देवता म्हणून पूजली जाते. श्री देवी सातेरी च्या उजव्या बाजूला प्राचीन काळचे जैन धर्मियांची महावीर सांगाडा आणि त्या वेळच्या लेण्या मुर्त्यांचे भग्न अवस्थेतील अवशेष आहेत. हे साधारणतः इ.स.पूर्वी १००० च्या दरम्यान बहमणी आहे. राज्यकर्त्यांच्या नासधुशीचे परिणाम आहेत. या जागेत ग्रामीण भाषेत संकीनी डंकीनी असे संबोधले जाते. गावच्या काही डोंगराळ कपारीत पूर्व काळात लोकवस्ती असावी अशी काही ठिकाणे गावात आहेत.
श्री देव रवळनाथ मंदिर:- हे मंदिर उत्तर दक्षिण दिशेला असलेले हेमाडपंथी मंदिर आहे. श्री देव रवळनाथ ही सूर्य देवता आहे. या मंदिरामध्ये श्री देवी पावणाईचे स्थान आहे आणि शेतमळ्यामध्ये अति प्राचीन श्री देव लिंगेश्वराचे पवित्र मंदिर आहे. यात गणपतीची प्राचीन मूर्ती आहे. या मंदिरात दसऱ्याच्या वेळी देवांची लग्न होतात. अशा प्रकारे पेंडूर गावातील ही पाच मुख्य देवस्थाने आहेत.
देवीच्या मांडाचा कुळाचार
पेंडूर गावातील देवीचा मांड हा उत्सव अवसार रूपी देवाचा हुकूम घेऊन साधारणतः पौष महिन्यामध्ये शुक्लपक्ष द्वादशी नंतर येणारा मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी श्री देव वेताळाच्या मंदिरात देवीचा मांड बसविला जातो. पाच मानकरी,देवस्थान ट्रस्ट आणि बारा देवाचे सेवक एका ठिकाणी बैठक घेऊन पुढील १४ दिवसांच्या कार्यक्रमाची योजना आखतात. योजनेअंतर्गत
१) जत्रेची प्रसिद्धी वर्तमानपत्रात देणे.
२) मंदिराची साफसफाई आणि रंगरंगोटी करणे.
३) जत्रेच्या दुकानांसाठी जागेची आखणी करणे.
४) मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साफसफाईबाबत ग्रामपंचायतीला कळविणे.
ज्या दिवशी मांडाची स्थापना करावयाची असते त्या दिवशी सर्व मानकरी व सर्व देवसेवक आणि गावातील मंडळी दुपारी ३ ते ३.३० वाजता एकत्र येतात. मानकऱ्यांच्या मार्फत बोलणे झाली की श्री देव वेताळाच्या मूर्ती कडे उभे राहून देवाला गाऱ्हाणे घालतात व लगेच देवी आणण्यासाठी श्री देव वेताळाचा कौल घेतला जातो. देवाचा कौल मिळाल्यावर लगेच देवी आणण्यासाठी सर्व ग्रामस्थ निघतात.ग्रामदेवतांची वारी खाली नमूद केल्याप्रमाणे ठराविक समाजाच्या पुरुषाच्या अंगात येते.
अ) श्री देव वेताळ मंदिरातील राठी
१) श्री देव वेताळाचे वारे- घाडी समाजाच्या पुरुषावर येते.
२) श्रीदेवी सातेरीचे वारे- राऊळ समाजाच्या पुरुषावर येते.
३) श्री देवी पावणाईचे वारे- सुतार समाजाच्या पुरुषावर येते.
४) श्री देव रवळनाथाचे वारे- वारीक समाजाच्या पुरुषावर येते.
५) श्री देव लिंगेश्वराचे वारे- श्री देव लिंगेश्वराचे वारे कोणावरही येत नाही.
६) दांडेकराचे वारे- अनुसूचित जातीच्या पुरुषावर येते व दांडेकर देवाला मार्ग दाखवतो आणि सीमेचे रक्षण करतो असे म्हटले जाते.
७) श्री देवी जरीमरीचे वारे- अनुसूचित जातीच्या म्हणजेच पेंडुरकर समाजाच्या महिलेवर येते.
८) बाराचा पूर्वस- हे वारे परब समाजाच्या पुरुषावर येते.
देवी जरीमरी ही अनुसूचित जातीची असल्यामुळे तिच्या ठिकाणी खरारे पेंडूर गावी श्री देव वेताळ, श्री देवी सातेरी, श्री देव रवळनाथ, श्री देवी पावणाई, श्री देव लिंगेश्वर आणि श्री देव दांडेकर ही वारी रूपातील ग्रामदैवत श्री देवी जरीमरीच्या ठिकाणी उपस्थित राहतात. ज्यावेळी श्री देवी जरीमरीचे वारे महिलेच्या अंगात येते तेव्हा वारी रूपातील श्री देव वेताळ त्या देवीच्या हातात फूल देऊन तिला आपली बहीण महेरवाशीण म्हणून घेऊन देवळात सर्व ग्रामदेवतांबरोबर येतात.
देवळात आल्यावर सभागृहात पूर्वतयारी केलेल्या पाटावर स्थापना करून देवीचा मांड भरविला जातो. या स्थापनेपासून पुढील १४ दिवस म्हणजे १३ रात्री आणि १४ दिवस देवीचा मांड उत्सव चालू होतो. मांडाच्या पहिले दोन दिवस रात्रीचे साधारण १० वाजता गावच्या मंडळींच्या उपस्थितीत ग्रामदेवतेची दिंडी निघते. ढोल ताशांच्या व सनईच्या तालावर ज्यावेळेस दिंडी निघते त्यावेळी वर नमूद केल्याप्रमाणे सर्व देवतांची वारी अंगात आलेली असतात. ही दिंडी श्री देव वेताळ मंदिरा सभोवती एक वेळा फिरते. नंतर देवळात येऊन थांबते. या गोष्टीला “जुगापतीचा खेळ” असे संबोधले जाते. अशा प्रकारे १३ रात्री हा जुगापतीचा खेळ रात्री बारा वाजेपर्यंत चालू असतो.
मांडाच्या स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता पाच मानकरी बारा देवसेवक यांच्या मानाच्या ओट्या देवीला भरल्या जातात. त्यावेळी पासून सतत १४ दिवस म्हणजे मांडाच्या समाप्ती पर्यंत उत्सवाला येणारे भाविक श्री देव वेताळ मंदिरातील देवीच्या मांडाकडे खणा नारळाची ओटी भरतात. या उत्सवाला गावातील प्रत्येक घराघरातील थोरामोठ्यापासून लहानापर्यंत तसेच त्या गावाच्या मुली माहेरवाशीण, पै पाहुणे, मित्रमंडळी प्रामुख्याने मुंबईतील मित्रमंडळी आपल्या परिवारासह देवीच्या मांडव उत्सवात सामील होतात.
तिसऱ्या दिवसापासून गावातील लोक आपल्या मनातील अडीअडचणी, संकटे वगैरे गोष्टी अंगात आलेल्या वारीरुपी श्री देव वेताळ, श्रीदेवी सातेरी, श्री देव रवळनाथ, श्री देवी पावणाई आणि श्री देव दांडेकर यांना सांगून सोडवल्या जातात. काही विशिष्ट गोष्टी श्री देव वेताळ मार्फत पुरविल्या जातात. रोज लोकांची अडीअडचणी कामे ग्रामदेवतेकडून सोडवली जातात
चौथ्या दिवसापासून मांडाकडे भरल्या जाणाऱ्या ओट्या ह्या प्रत्येक घरातील तर काही नवसाच्या असतात. तर काही ओट्या पाहुण्या मंडळींच्या असतात.
प्रत्येक रात्री दिंडी श्री देव वेताळ मंदिरापासून श्री देवी सातेरी मंदिरापर्यंत वारी रूपात ग्रामदेवतांबरोबर भरघोस लोकांच्या उपस्थितीत निघते व ही दिंडी पुन्हा श्री देव वेताळ मंदिरात परत येते. श्री देव वेताळ मंदिरातून दिंडी एक दिवस आड श्रीदेवी सातेरी मंदिराकडे जाते.
उत्सवाच्या तेराव्या दिवशी ब्राह्मण भोजनाचा श्री देव वेताळ मंदिरात महाप्रसाद असतो. त्याचप्रमाणे श्री देव वेताळ मंदिरात लक्षदीप उत्सवही साजरा करतात. भाविक मंडळी हा दीप देणगी रुपाने घेऊन श्री देव वेताळ चरणी भक्ती भावाने अर्पण करतात. वेगवेगळ्या कलाकृतीने एकाच वेळी हे दीप मंदिर परिसरात पेटविले जातात. हा सोहळा रात्रीच्या वेळी विलक्षण, सुंदर आणि आनंद देणारा असतो.
तेराव्या दिवशी दुपारी एक परडी सजवून ठेवली जाते. तिचे पूजन करतात. अशा प्रकारे १४ दिवसात श्री देव वेताळ मंदिरात भव्य दिव्य मांड उत्सव भरविला जातो.
चौदाव्या दिवशी दुपारी चार वाजता वेताळ मंदिरातून देवांची वारी आल्यावर उत्सवाची सांगता करण्यासाठी श्रीदेवी जुगाई भरलेल्या मांडातील ओट्या पाच मानकऱ्यांना व बारा देवसेवकांना आपल्या हाताने उचलून देते. अशा प्रकारे देवीच्या मांडाची सांगता होते.

             श्री देव वेताळ मंदिरातील मांडाकडे १४ दिवसात भाविकांनी भरलेल्या ओट्या मानकऱ्यांना व सेवेकऱ्यांना प्रसाद म्हणून वाटल्या जातात. तर काही चांगल्या साड्या या तरंगासाठी ठेवून बाकीच्या साड्या, पितांबर देवळाच्या ट्रस्टकडे दिल्या जातात. तिथे उपस्थित पाहुणे, ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायत, शाळा, कॉलेज, शासकीय कर्मचाऱ्यांना प्रसाद म्हणून नारळ दिले जातात. १४ दिवस पेंडूर गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आलेले असते. अशा तऱ्हेने १४ दिवसांचा उत्सव ग्रामस्थांच्या एकत्र संघटनेतून संपन्न होतो.
उपसंहार
सुमारे २००० वर्षापूर्वीच्या आख्यायिकेनुसार या गावात पेंढरीची झाडे विपुल प्रमाणात असल्यामुळे या गावास पेंडूर हे नाव पडले. १२ लिंगांची स्थापना झाल्यावर पहाट झाली व कोंबडा आरवला म्हणून पंढरपूर न होता प्रति पंढरपूर म्हणून पेंडूर असे नावारूपास आले. सद्यस्थितीत पेंडूर गावाचा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग असून लोकवस्तीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा गाव आहे. भौगोलिक दृष्ट्या निसर्ग संपन्न अशा गावातील लोकसंख्या मुख्यतः शेतीप्रधान निसर्गाशी अगदी जवळचा संबंध असणारे कष्टकरी, अत्यंत देवभोळे, श्रद्धाळू, पापभिरू आणि बऱ्याच व्रत वैकल्यात सण, उत्सव, परंपरा सांभाळण्यात आपले समाधान व आनंद शोधणारे वाटले. आषाढ महिन्याच्या अमावस्येपूर्वी चार दिवस अगोदर गावचे रक्षण सीमेवरून भात आणि भक्ष जमिनीत पुरून कोणत्याही प्रकारचे संकट, रोगराई, वादळ यापासून गावाचे रक्षण होण्याच्या परंपरेला मांजरी (देसरुड) असे म्हणतात. हे मला या प्रकल्पाचा अभ्यास करताना कळले.
पेंडूर गावात ३६० स्थळांचा अधिपती श्री देव वेताळ, स्वयंभू श्री देवी सातेरी, श्री देव रवळनाथ, श्री देवी पावणाई, श्री देव लिंगेश्वर, श्री देव ब्राह्मण जैनकालीन संकीनी डंकीनी, श्री देव मारुती असे अनेक देवदेवता वास्तव्यास असल्यामुळे संपूर्ण वर्षभर म्हणजेच चैत्र महिन्याच्या गुढीपाडव्यापासून ते फाल्गुन महिन्याच्या शिमगा उत्सवापर्यंत अनेक देव देवतांचे उत्सव साजरे करण्याची परंपरा, संस्कृती या प्रकल्पामुळे मला समजली. ग्रामदेवता म्हणजे ग्रामाच्या संरक्षक देवता होत. म्हणूनच ग्रामस्थांची या देवावर अपार श्रद्धा, विश्वास आणि आदरयुक्त भीती जाणवते. या गावातील स्वयंभू श्रीदेवी सातेरी म्हणजेच भूमी देवता असल्यामुळे धरित्री म्हणजेच काली अर्थात जगदंबा होय. ग्रामदेवतेची सर्व रूपे तिचीच आहेत. धरित्री हा निर्माण करते. पसाभर पेरले की पायलीभर देते. हे तिचे निर्माण सामर्थ्य तसेच ती कोपली तर पिकावर रोग घालते. सगळ्याची धूळधाण करते आणि मानव जातीचा सुद्धा धुव्वा उडवते हे तिचे संहारक सामर्थ्य असल्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीपूर्व काळी जर काही अशी आपत्ती आल्यास त्याला काही शास्त्रीय कारण असू शकते. हे माहिती नसल्यामुळे जणू काही हा देवीचा कोप आहे असे ग्रामस्थ समजत असावेत. म्हणूनच की काय ग्रामजनांनी ही ग्रामदैवते वाजती गाजती ठेवली असावीत.
आज काळ बदललेला आहे. आपला देश २१ शतकाकडे वाटचाल करत असल्यामुळे उपजीविकेच्या व्याख्या, गरजा, साधने आज बदलली आहेत. गावातील काही लोकांचा केवळ शेती हा व्यवसाय राहिला नसून गावातील बरेच लोक काम धंद्यासाठी गावाबाहेर पडले असले तरी काही ग्रामस्थांचा आजही आपल्या उपजीविकेचा मूळस्त्रोत शेती हाच आहे यात मला असे वाटले की अत्यंत सुखसोयी वाढणारा “मुंबईकर” आणि प्रतिकूल परिस्थितीत राहणारा “ग्रामस्थ” या दोघांवर लहानपणापासून जे परंपरागत संस्कार झाले तसेच पिढी जात वारसा आणि माहिती मिळाली त्या आधारे त्या ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करत असावेत. या उत्सवातील एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे देव वेताळ मंदिरातील मांड उत्सव होय पेंडूर गावात त्रैवार्षिक १४ दिवसांचा जो भव्य दिव्य मांड भरविला जातो. त्यास ग्रामस्थ, मुंबईकर, पै पाहुणे आनंदाने, श्रद्धेने आवर्जून उपस्थित राहून खणानारळाने ओटी भरून आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करतात किंवा आपल्या अडीअडचणी श्री देव वेताळ मंदिरातील अंगात आलेल्या वारीरुपी देवांना सांगून त्यावर देवाने सुचवलेला मार्ग देवळाच्या पायरीवर करून आपल्या अडीअडचणीचे निवारण करताना दिसले.
मांडाच्या स्थापनेवेळी श्रीदेवी जरीमरी ही जरी अनुसूचित जातीची महिला असली तरी श्री देव वेताळ, श्रीदेवी सातेरी, श्रीदेवी पावणाई, श्री देव रवळनाथ, श्री देव लिंगेश्वर, श्री देव दांडेकर ही वारीरूपातील देव देवीच्या ठिकाणी खरारे गावात उपस्थित राहून वारी रूपातील श्री देव वेताळ श्रीदेवी जरीमारीच्या अंगात आल्यावर तिला फुल देऊन आपली बहीण म्हणून देवळात घेऊन येतो व सभागृहातील वारी रूपातील सातेरी देवी तिची ओटी पाटावर मांडून स्थापना करते. ही संकल्पना मला विलक्षण, सुंदर आणि बहिण भावाचे जातीभेदापलीकडील संबंध दृढ होताना वाटले. त्यानंतर चार दिवस देवीच्या मांडाचा उत्सवाचा आनंद उपस्थित प्रत्येक मंडळीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसला.
रात्री निघणाऱ्या वारी रूपातील ग्रामदेवतांच्या दिंडीमध्ये सामील होण्यासाठी ग्रामस्थ मंडळी, मुंबईकर,पै पाहुणे खास रात्रीच्या अंधारातून वाट काढत,काळोखात प्रसंगी ठेचाळत हा प्रचंड जनसमुदाय ढोल व सनईच्या तालावर वारी रूपातील सर्व ग्रामदैवते हिंदी मधून निघतात. त्यावेळी हा जनसमुदाय दिंडीच्या मागे मागे चालतो. प्रचंड गर्दी असूनही कमालीची शांतता, कोणताही गोंधळ, तंटा न करता जणू काही देवच आपल्याला मार्ग दाखवत आहे या भावनेने प्रेरित होऊन दिंडीत मार्गक्रमण करीत असतात त्यावेळी उपस्थित प्रत्येकाच्या मनात या ग्रामदेवता विषयीचा भक्तीभाव, श्रद्धा, विश्वास ठासून भरलेला जाणवला.
पौष महिन्यात अन्य देवळात शक्यतो उत्सव साजरे केले जात नसताना फक्त पेंडूर गावात श्री देव वेताळ मंदिरात १४ दिवसाचा त्रैवार्षिक मांड उत्सव ही या गावाची परंपरा, रूढी, उत्सवातील वेगळेपणा, उत्सवाचे महत्व याविषयी ज्ञानबोधक माहिती मला या प्रकल्पाचा अभ्यास करताना समजली.

Visits:277
Total: 20490
Translate »
Pendur village Sindhudurg