मांड उत्सव २०२३

“देवीच्या गावा”त देवीचा मांड

भूमी आणि संस्कृती यांचं नातं मोठं विलक्षण असतं. भूमीच्या अधिष्ठानावर संस्कृती विकसित होत असते. या सदराच्या आरंभीच्या लेखांमधून सिंधुदुर्गाच्या भौगोलिकता, प्रादेशिकता इ. चा विचार करत असताना पर्यावरण, हवामानासह इथल्या माती – भूमीविषयी शास्त्रीय अंगाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. माती आणि तिचे गुणधर्म हे त्या त्या प्रदेशांना वैशिष्ट्य बहाल करत असतात, हेच त्यातून सुस्पष्ट होत गेलं. प्राचीन काळापासूनच भूमीला ‘स्त्रीदेवता’ म्हटलं गेलं आहे. यासंदर्भात लोकसंस्कृती अभ्यासक द. ता. भोसले लिहितात, की “आज आपल्या सांस्कृतिक तसंच धार्मिक आचरणात जे स्त्रीप्रधान व्रतांचे प्राबल्य आढळते, त्यांचा संबंध प्राचीन काळातील मातृसत्ताक रीतीशी असला पाहिजे. ज्या समाजात स्त्रीला महत्त्व असते, त्या समाजातच स्त्रीदैवतांना महत्त्व प्राप्त होते”. एकूणातच, भूमीला माता मानणे आणि तिला धर्मसंस्कृतीत स्त्रीदैवताचे स्थान देणे यामागे प्राचीन परंपरा आढळून येते. याच धारणेतून लोकपरंपरेत भूमी आणि स्त्री यात वात्सल्य, सुफलन, सेवाभाव, समर्पणादि अनेक बाबतीत गुणसाम्य मानले गेले. या वैशिष्ट्यांशी धर्मभावना, श्रद्धा जोडल्या गेल्या. त्याभोवती स्त्रीदैवतांचे विविध उत्सव, परंपरा, व्रते गुंफली गेली. सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यातील पेंडुर गावात वर्षाआड होणारा “देवीचा मांड” हे अशा उत्सवांचच एक रूप. सिंधुदुर्गातल्या बहुतांश गावांतून भूमीचं देवतास्वरूप भूमका – सांतेरीचं वारूळरूप, भगवती, काळकाई इत्यादींच्या पाषाण रूपांचे वेगवेगळे उत्सव, जत्रा, यात्रा प्रसिद्ध आहेत. पैकी पेंडुरमधील देवीच्या मांडाची परंपरा सिंधुदुर्गात अन्यत्र कुठे आढळत नाही, हे विशेष.

अनुराधा परब

         दक्षिण कोकणातल्या संस्कृतीवर तमिळ, कानडी संस्कृतीचा प्रभाव असल्याचे आपण पाहिले आहे. अनेक ग्रामनामांच्या उत्पत्तीमध्येही याचा अंश आपल्याला सापडतो. त्याचप्रमाणे भूगोलविशेष, नैसर्गिक रचनेचाही संबंध गावांच्या नावांतून कळू शकतो. सिंधुदुर्गातल्या पेंडूर गावातील “पेण्डु” शब्दाचा अर्थ “बाई, बायको (देवीचे गाव)” असा आढळतो. या अर्थाने येथे साजऱ्या होणाऱ्या देवीच्या मांडाचा संबंध लागू शकतो. याशिवाय भाषिक अंगाने पाहिले असता “मांड मांडणे” याचा अर्थ ‘एखाद्या गोष्टीचा घाट घालणे’, असा होतो. त्याहीदृष्टीने देवीचा मांड हा बांबूच्या डाळीवर चौदा दिवसांसाठी घातला जातो, हेदेखील जुळून येते. कलेच्या अंगाने “मांड” शब्दाचा विचार केला तर राजस्थानमध्ये “मांड चित्रशैली” ( अंगणात, घरात चुनखडीने रेखलेले निसर्ग, जीवनाचे कलात्मक रेखाटन या अर्थी ) प्रचलित आहे तर शास्त्रीय संगीत तसंच राजस्थानी लोकगीतांमध्ये ‘मांड’ गायनप्रकार अस्तित्वात आहे. नावापासून कलेपर्यंत, भाषेपासून धर्मापर्यंत या शब्दाची व्याप्ती लक्षात येईल. याशिवाय दक्षिण कोकणामध्ये समाजातल्या व्यावहारिक बोलभाषेत एकत्र येण्याच्या जागेलाही ‘मांडाची जागा’, ‘मांडावर जाऊन येतो वा येते’ असेच म्हटले जाते. त्या जागेला धार्मिक, आध्यात्मिक तसंच सामाजिक महत्त्वही असते.
         पेंडूर गावच्या अस्तित्वाच्या खुणा महापाषाणयुगापासून आढळतात. त्यानंतर या गावाच्या अस्तित्वाचे पुरावे मध्ययुगातले सापडतात. याचे कारण म्हणजे सागरी व्यापारी मार्गावरील पेंडुर हे एक महत्त्वाचे ठिकाण होते, हे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. पुरातत्त्वीयदृष्ट्या याचा अभ्यास संशोधक विनायक परब यांनी केला असता गावातील जैन मूर्तींची प्राचीनता १० – ११ व्या शतकापर्यंत मागे जाते, असे त्यांच्या शोधनिबंधात नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे या गावाची निर्मिती त्याहीपूर्वी झालेली असल्याचे लक्षात येते आणि पेंडुर गावात आढळणाऱ्या जैन देवतांच्या मूर्तींमुळे गावात मध्ययुगामध्ये जैन धर्मीयांची वस्ती होती, एवढे निश्चितपणे म्हणता येते. इथे आढळलेला पाच फुटांचा राजाचा वीरगळ या ठिकाणाची महती सांगतो. त्यानंतर सुमारे ४०० वर्षांपूर्वी सावंतवाडी संस्थानच्या सरदार सावंतभोसले घराण्याच्या मूळ पुरूषाचे इथे येणे आणि त्याने बारा बलुतेदारांच्या सहाय्याने गावाचा कारभार चालवण्यास सुरूवात केल्याची माहिती मिळते. या घराण्याच्या गावातील वाड्याच्या जोतावरच गावातील ग्रामदेवतेच्या मंदिराची उभारणी झाल्याचेही जुनेजाणते सांगतात. गावातील वेताळगड हा सावंतवाडी संस्थानाच्या अखत्यारीत येत असल्याच्या नोंदींचे ऐतिहासिक कागद आजही संस्थानाकडे आहेत. याआधारे पेंडुर गावावरील सावंतवाडीच्या सावंत भोसले घराण्याच्या अधिकाराला दुजोरा मिळतो. याच गावातील ग्रामदेवता श्री वेताळ देव आणि श्री देवी सातेरी यांचा पौष महिन्यातल्या शुक्ल पक्षात होणाऱ्या मांड उत्सवाची परंपरा किमान चारशे वर्षे जुनी असल्याचे म्हटले जाते. एक वर्षाआड होणाऱ्या उत्सवाची ही परंपरा खरेतर त्याहीपेक्षा प्राचीन असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जिल्ह्याव्यतिरिक्त पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या देवीच्या मांडामागेही एक आख्यायिका प्रचलित आहे. ग्रामदैवत वेताळाची बहिण श्री देवी जुगाई ही जन्माने हरिजन आहे. दर तीन वर्षांनी देव आपल्या बहिणीला माहेरपणाला घेऊन येतो. हे माहेरपण तेरा रात्री चौदा दिवसांचे असते. यालाच “मांड उत्सव” म्हटले जाते. उत्सवाच्या प्रारंभी देवाचे मानकरी, ग्रामस्थ वाजतगाजत हरिजन वाड्यात जातात. तेथील एका स्त्रीच्या अंगात देवीचा संचार होतो आणि त्यानंतर देव वेताळ तिला सन्मानपूर्वक ढोलताशांच्या गजरात मंदिरात घेऊन येतो. मंदिरात आल्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते देवीची ओटी भरून पूजा केली जाते. या ओट्या बांबूच्या डाळीवर भरण्याचा पूर्वापार प्रघात आहे. या ओट्यांनी मांड उत्सवाला सुरूवात होते. नंतरच्या दिवशी पाच मानकरी व बारा सेवकांनी ओट्या भरल्यानंतर देवाच्या हुकूमावरून अन्य भाविकांच्या ओट्या भरण्याला सुरूवात होते. हा कार्यक्रम उत्सवाच्या अखेरच्या दिवसापर्यंत चालू राहतो.
उत्तर कोकणापेक्षा अनेक अर्थांनी दक्षिण कोकणातल्या – सिंधुदुर्गातल्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. इथल्या संपूर्ण जमिनीचा वतनदार दलित समाज आहे, असे पूर्वापार मानले जाते आहे. त्यामुळे इथल्या भूमीवर कोणतीही गोष्ट करताना पहिला मान दलिताला दिला जातो. महत्त्वाचे कार्य असो किंवा मग मर्तिकाचे विधी असोत, पहिल्यांदा दलिताला विडा – पान, दक्षिणा अर्पण केले जाते. तळकोकणात सर्व विधींमध्ये दलित समाजाला अधिक महत्त्व आहे. इथे विधींच्यावेळेस एकवेळ ब्राह्मण नसला तरीही फारसे अडत नाही. किंबहुना, अनेक पूजांमध्ये ब्राह्मणांना इथे स्थान नाही. परंतु दलितांना सर्वत्र स्थान असून त्यांचे अधिकार समाजमान्य आहेत. त्यामुळेच पेंडुरमधल्या वेताळाची बहिण ही दलित समाजातील – हरिजन असणे हे मानववंशशास्त्रानुसार तेवढेच साहजिक ठरते. मानववंशशास्त्र आपल्याला अशाप्रकारे प्रथा परंपरांच्या मुळाशी घेऊन जाण्यास मदत करते आणि लोकपरंपरेतील मूळ लोकवर्तनाचा शोध घेण्यास प्रेरक ठरत त्याचा उलगडा करण्यास उपयोगीही ठरते.
          पौष महिन्यात पौराणिक कथेनुसार दैत्यांच्या अत्याचारातून, दीर्घकालीन दुष्काळातून पृथ्वीला – भूमीला तारणाऱ्या आदिशक्ती दुर्गारूप शाकंभरीचा उत्सव साजरा होतो. शतकाच्या दुष्काळाला पर्जन्यवर्षेने सुजलाम सुफलाम करणारी शाकंभरी आणि अन्नपूर्णा यांत वात्सल्य, पालनकर्ती, ममत्वादि गुणांचा सारखेपणा आहे. हिवाळा ऋतू अन्नधान्य, भाजी, फळांनी संपन्न समजला जातो. आरोग्य, समृद्धता, हवामान अशा अनेक गोष्टींनी हा ऋतू उत्सवाला पोषकही ठरतो. पेंडुर गावाच्या अर्थामधील स्त्रीत्व या सगळ्यांशी जुळणारंही ठरतं. आख्यायिका, कथा, परंपरा ह्या अशा अर्थवादाशी जोडलेल्या असतात. आणि त्यातूनच लोकमानसाच्या धारणा आकाराला येत संस्कृती सोहळे, सण, विधींतून सश्रद्ध मनांतून प्रवाहित होत राहतात.

 
अनुराधा परब
anuradhaparab@gmail.com


(विशेष नोंदः – प्रस्तुत लेखिका गेली तीस वर्षे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. मराठी आणि संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी ग्रहण केली असून प्राचीन भारतीय संस्कृती हा त्यांच्या तज्ज्ञतेचा विषय आहे. प्रस्तुत लेखिकेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील रामेश्वर मंदिरातील स्थापत्य रचना आणि सौंदर्यस्थळे या विषयावर केलेले संशोधन २०१९ साली मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केले. प्रस्तुत लेखिकेने २०२२ साली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, साहित्य संस्कृती, जैववैविध्य अशा विविध अंगांनी धांडोळा घेणारे संस्कृतीबंध हे सदर दैनिक प्रहारमध्ये संपूर्ण वर्षभर लिहिले. प्रस्तुत लेख हा त्या सदरातील अखेरचा लेख होता. दैनिक प्रहारच्या सौजन्याने हा लेख इथे देण्यात आला आहे.)

Visits:676
Total: 20492
Translate »
Pendur village Sindhudurg