श्री देवी सातेरी पेंडूर

सातेरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव पंचायतनातील प्रमुख पाच देवतापैकी सातेरी – (शक्ती शांतादुर्गा) ही पंचायतनातील प्रमुख देवता होय. हिला पूर्वसत्तेचे स्थळ मानतात. ही देवता द्रविड काळातील असल्याने सर्व साधारणपणे पेढी (माती वा दगडी चोथरा) वारूळ वा निराकारी पाषाण अशी निराकारी स्वरुपात असते काही गावामध्ये मात्र सातेरी चतुर्भुज आकारी पाषाण प्रतिमा कोरलेली आढळते. ती महिषासुरमर्दिनी स्वरुपात असते. सातेरी ही खारेपाटणच्या खाडीपासुन गोमंतकातील वाळपई तालुक्यापर्यंतच्या प्रदेशात पूर्वीचा (पाटण महाल, साळशीमहाल, कुडाळ परगणा, भिमगडा परगणा) मुळ भुमिका म्हणजे भूमीची तसेच गावाच्या बारा पाचाच्या राठीची अधिकारी देवता मानली आहे. गावाच्या राठीचा वा रयतेचा न्यायनिर्णय करण्याचा सातेरीचा अधिकार

आहे. हिला काही ठिकाणी शांतादुर्गा म्हणतात. सिंधुदुर्ग परिसरातील प्रमुख ग्रामदेवता सातेरी होय. प्रत्येक गावात या देवतेचे बहुतांशी मंदिर असतेच. वारूळ हेच तिचे प्रतिक. या भागात एकूण अंदाजे ७९ मंदिरे आहेत. परशुरामाची माता रेणुका ही एक ग्रामदेवता मानली गेली आहे. तिचा वारुळाशी संबंध अनेक कहाण्यातून दाखविलेला आहे. रेणुका ही वारुळात जन्मली आणि वारुळातच अदृश्य झाली अशी कथा आहे. महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण कोकणात वारुळाच्या पुजेची प्रथा त्यातूनच निघाली असावी.

सिंधुदुर्ग, गोव्यात सातेरीला भूमका असेही म्हणतात. सातेरी मंदिरात गाभाऱ्यात वारूळ असते. काही ठिकाणी कट्टा ही असतो कधी, कुठे तेथे मुर्तीही असते. सातेरी शब्दाच्या अनेक विविध व्यत्पत्ती बनल्या आहे. वारुळाला सात पदर किंवा कप्पे असतात. त्याला सातेरे म्हणतात. म्हणूनच श्री सातेरी वारुळाच्या प्रतीकाने दिसणारी देवी म्हणतात.

पं.महादेवशास्त्री जोशीनी असे मत व्यक्त केले की सातेरी म्हणजे सप्त मातृकापैकी एक किंवा त्यांचा समुदाय असावा. तो सप्त मातृकाच्या नावे असलेला श्लोक पुढीलप्रमाणे आहे.

‘ब्राम्ही माहेश्वरी, चैव कौमारी वैष्णवी तथा

वाराहीच तथेंन्द्रानी चामुण्डाःसप्त मातर ।‘

         ऋग्वेदात ज्या मातृकांचा उल्लेख येतो. त्या मातृकांचा प्राचीन काळापासुन भारतात नव्हे तर जगभर मातृका पूजन प्रचलित आहे. आपल्या देशात आर्येतरा (द्रविड) कडून ही पूजा चालू होती. ती परंपरा सिंधुदुर्ग गोव्यासह दक्षिण भारतात सप्तमातृका पुजा आढळून येते. पिंडारी नावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात      तिच्याबरोबर पुजा होते. हीच आपल्याकडे सातेरी, माऊली, भगवती “बाई, माते, आवशी” या गाऱ्हाण्यातून संबोधतात.शक्ती देवता व मातृका यांची सरमिसळ होऊन दोघी मिळून ग्रामदेवतेचे स्वरूप तिला प्राप्त झाले. डोकीवर मुकुट, गळ्यात माळा, चतुर्भुज, एका हातात परशु, दुसऱ्या हातात त्रिशुल, तिसऱ्या हातात तलवार, चौथ्या हातात ढाल, पायाखाली तुडवीत असलेला महिषीदैत्य जो रेड्याच्या स्वरुपात असतो. कधी देवीला आठही हात असतात. एका हाताने तर ती महिषासुराची जीभ ओढत असते. उजव्या हाताने त्रिशुळाने त्याला भोसकत असते. सर्प फुरसे वगैरे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशावर सातेरीचे न्हावण (तीर्थ) दिल्याने असर पडतो अशी श्रद्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सातेरीची मंदिरे वैशिष्ठपुर्ण, प्राचीन व जागृत आहेत. तेथील रितीभाती, परंपरा भिन्न जाणवतात. अनेक मंदिराच्या जिर्णोद्धारामुळे मूळ सौंदर्यास बाधा सुद्धा जाणवते. वेंगुर्ले तालुक्यात १९ मंदिरे, मालवण तालुक्यात ३५ मंदिरे, कणकवली तालुक्यात १३ मंदिरे उर्वरित कुडाळ सावंतवाडीत येतात. यातील रेडीची माऊली, पावशीची सातेरी, मसुरेची सातेरी, बिळवस जलमंदिरातील सातेरी, कांदळगाव सातेरी, वेंगुर्लेतील सातेरी, चेंदवणची माऊली व पेंडूरची सातेरी वैशिष्ठपुर्ण आहेत. श्री माऊली, श्री सातेरी, आंगणेवाडीची (भद्रकाली) भराडी या तिघी बहिणी अस बोलतात. तेथील सातेरीची पेढी हे ठिकाण अत्यंत जागृत. या बहिणी यात तथ्य ही आहे. कारण शक्तीची रूपे महालक्ष्मी, कात्यायणी आहे. (महिषासुरमर्दिनी) शांती व भद्रकाली या नावाने त्या प्रसिद्ध. माऊली ही महलक्ष्मी, भराडी ही भद्रकाली व सातेरी ही शांता. कदंबाच्या ताम्रपटात सातेरी यांचे संस्कृत रूपे ‘शांतिकरी’ असे दिलेले आहे. दोडामार्ग, गोव्यात ही सातेरी शांतादुर्गा म्हणून ओळखली जाते.. मात्र भूमि ही देवी स्वरूप आहे. कारण पहिल्या वसाहत कारांनी भूमिला देवीस्वरूप मानलं आहे म्हणून ती सातेरी झाली.

“समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले ।

विष्णुपत्नि नमस्तुभं पादस्पर्श क्षमस्व मे ।।“

अशी जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिची प्रार्थना करण्याची प्राचिन पद्धत आहे म्हणूनच ती भूमिका म्हणून प्रसिद्ध. पूजेला रोयन किंवा वारूळ असते. वारूळ हे मृतीकामय असून ती उंच वाढलेली भूमि होय. रेणुका (रेणु+ का) म्हणजे रेणुमयी. कुंकण आणि रेणुका दोन्ही नावे एकार्थकच आहेत. कारण कुंकणा – (कुं = पृथ्वी + कण = रेणुरूप. म्हणजे भूमीच्या कणांनी बनलेली. ही दोन्ही नावे भूदेवीची व हीची उपासना दक्षिण भारतात आंध्र, कर्नाटक, कोकण, गोमंतक) या भागात वारूळ रुपात होते. वारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतिक आहे. व या प्रतिकांच्या अनुषंगाने वारूळस्थ नाम हे पुरुषतत्वाचा म्हणजे क्षेत्रपालाचा प्रतिनिधी मानला जातो. शतपथ ब्राम्हणात उत्ताणा योनी या शब्दातील योनी ही स्त्री आणि पृथ्वी या दोन्हीचे द्योतन करू शकते. त्यात तीचे स्त्रीरूपच अभिप्रेत आहे. स्त्री प्रमाणे पृथ्वीची हीच उत्तानावस्था अशी गर्भधारणक्षम असल्याचे वैदिक परंपरेतील ऋषीनी केले आहे.

                                     यथेयं पृथिवी मह्युताना गर्भ आ दधे ।

                                    एवं त्वं गर्भ आ दधे दशमे मासि सुतवे ।।

                                                                    ऋ. खिड ४.१३२.३

अर्थ – ज्या प्रमाणे उत्ताणा (उताणी) मही (महान विस्तृत) पृथ्वी गर्भ धारण करते तु दहाव्या महिन्यात प्रसवण्यासाठी गर्भ धारण कर) ही उत्ताना स्त्रि आणि पृथ्वी यांची समरुपता व एकरुपता स्पष्ट प्रकट होते अश्या आदितीचे पृथ्वीचे, गौरीचे लज्जागौरी हे निखळ योनिरुप म्हणजे विश्वाचे गर्भालय जीस आपण वारूळ प्रतिकापासून लज्जागौरी हे तिचे सालंकृत रूप कात्यायनी पुजतो. त्यावेळी भावगम्य सत्याचे दर्शन घडते. रेणुका (रेणुमयी पृथ्वी) तशीच रवळनाथाची सहचारिणी कोकणात, वारूळरुपात पुजनीय केदार म्हणून भूमि. तोच रवळनाथ अर्थात रवळेश्वर या नावातील पूर्वपद क्षेत्राचे प्रतिक दाखविते. ळ आणि ल या अभेदापासून रोयन- रवणपासून रवळ शब्द बनलेला त्याचा अर्थात गोमंतकीय मराठीत वारूळ. त्यामुळे रवळ (<रवळ < रोयन) हे पद सातेरीचे द्योतक आहे. रवळनाथ तिचा पती (नाथ) त्यामुळे रवळनाथ, रवळेश्वर ही नावे. देवाचे क्षेत्र पतित्व स्पष्ट करतात. क्षेत्राच्या प्रतीकामुळे क्षेत्रपतीकडे नागरूप सहजपणे येतो. आपल्याकडे वारुळास भोम म्हटले जाते. भोम म्हणजे लाकडी कुजुन त्याचा मातीचा संपर्क होऊन त्याचे भोम (वारूळ) बनते.

सातेरी शब्दाची सप्त+तेरी अशी ही व्युत्पत्ती केली आहें. तेरी हा कानडी शब्द असून त्याचा अर्थ फणा असा आहे. त्यामुळे सातेरी शब्दाचा संबध सात फणा धारण करणाऱ्या नागदेवतेशी लावता येतो. नाग हे बहुधा वारुळातच असतात म्हणून सात कप्पे किवा पदर असलेले ते सातेरे अशी या शब्दाचे स्पष्टीकरण आहे. कोकणात हिला पूर्वी म्हणतात. म्हणजे गावातील सर्वात पूर्वीची देवता असे वाटते. तिला पूर्वसत्तेचे स्थळ म्हणतात त्यामुळे तरंग हे देवतेचे प्रतिक हे त्यामुळे पावणाईचा तरंग हा भूमिकेचा किवा पूर्वीचा तरंग नव्हे. पावणाई देवी वेगळी आहे. या भागात पूर्वी कदंब, शिलाहार वैगेरे जैन राजांची सत्ता होती. जैन धर्माचा प्रसारही झाला होता तेव्हा देवता स्वरूपही ध्वज जैनाच्या काळात प्रसिद्ध होता त्यामुळे जैनानंतर वैदिक देवतांची नावे मिळाली असे वाटते. कोल्हापूरची महालक्ष्मी ही जैनाची देवता मानतात. शिलाहार तिला महालक्ष्मीलब्धवरप्रसाद असे म्हटलेले आहे. तरंगांपैकी पावणाईचा तरंग हे महालक्ष्मीचे रूप असे स्मरण होते. पावणा म्हणजे रवळाशी. रवळाशाची पत्नी असाही पावणाईचा उल्लेख आढळतो. शिवलग्नात पावण-आई-देव फक्त शिवलग्ना प्रीत्यर्थ सांकेतिक आहे. तसेच लिंग शिव (पाशुपति) ही द्रविड वंशीय देवता असून लिंग हे तिचे प्रतिक आहे. द्रविड व आर्य संस्कृतीचे मिलन झाल्यावर आर्यांनी आपल्या वैदिक वाड:मयात शिव शक्ती देवतांचा समावेश केलेला आढळला. प्रत्येक गावामध्ये लहान मोठे शिवालय आवर्जून असते. ज्या गावामध्ये लिंग (शिव) प्रमुख मानले जाते. ते शिव पंचायतन होय. या  गावामध्ये स्मार्त एकाद्शी पाळली जाते. लिंगदेवता स्वयंभू मानण्याकडे सर्वसाधारण जनमत कल आहे. त्यातून अनेक दंतकथा प्रचलित आहेत. यांची ऐतिहासिक छाननी करताना त्यातून अनेक गावात ईस्लामी आक्रमणामध्ये गाव मंदिरे उध्वस्त झाली व शांतता प्रस्थापित झाल्यावर गावच्या पुर्नस्थापनेमध्ये पुरातन शिवालयाचा शोध लागल्यामुळे ही स्थाने भूमीतून वर आली. म्हणून स्वयंभू मानण्याकडे समाजाचा कल असतो. वरील सर्व देवस्थाने पेंडूर या गावी स्थित आहेत. वारूळ हे पृथ्वीची योनी ती योनिरुपाने भूदेवी आहे हे लोकधर्माच्या प्रतिष्ठित आहे. त्यामुळे यल्लमा, मातंगी, रेणुका, सातेरी या क्षेत्रदेवता व मुरूग, सुब्रम्हण्य, जोतिबा, खंडोबा, रवळनाथ, म्हस्कोबा हे क्षेत्रपती यांच्या प्रतिकातुन नि:शंक स्वरुपात घेतला जाते. वारूळ हे सुद्धा नाजूक असते  म्हणून त्यावर पूजाविधी करण्यासाठी मंदिर उभे केले जाते. `त्यावर निळी सारखे पुन: पुन: भाजणे केल्याप्रमाणे मातीचा लेप चढविला जातो. वारूळ ते योनिमुर्ती ते सालंकृत महिषासुर मर्दिनी असा क्रमविकास ध्यानी घेता उत्तान मही उपासन वेदकाळापासून ते सध्या प्रागैतिहासिक काळापासून ते सध्यकालपर्यंत प्रचलित आहे हे दिसते. मानव प्राणी हे भूमीपासून जन्मले ही श्रद्धा जगभर आहे. सर्वांची निर्मिती पृथ्वीपासून झाली . त्यामुळे आपण सिंधुदुर्गवाशीय तिला ‘आये, माते, आवशी’ ही हाक देतो. वेदवाणी या महामातेला वंदन करताना म्हणते-

माता भूमि: पुत्रोSहं पृथिव्या:।

नमो मात्रे पृथिव्यै  नमो मात्रे पृथिव्यै ।।

                                                   अथर्व – १२.१.१२

                          पृथ्वी ही माता आहे. मी पृथ्वीचा पुत्र आहे.

                          त्या पृथ्वी मातेला नमन असो । त्या पृथ्वी मातेला नमन असो ।

Shree Prakash Narkar

श्री.प्रकाश नारकर 

Visits:203
Total: 20497
Translate »
Pendur village Sindhudurg