संतोष शेणई

मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा

             पेंडूर (ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील जंगलात जैन मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या मी पहिल्यांदा १९८६ला पाहिल्या. (त्यावेळी मी वेंगुर्ल्याला महाविद्यालयात शिकत असतानाच वार्ताहर म्हणून काम करीत होतो.) या जंगलात त्यावेळी मला एकोणीस मूर्ती आढळल्या होत्या. दिगंबर जैन परंपरेतील या मूर्ती साधारण अकराव्या शतकाच्या उत्तरार्धातील असाव्यात असा अंदाज आहे. मी पुन्हा २००४ला या जंगलात गेलो तर चौदा मूर्ती मला दिसल्या. डॉ. भालचंद्र आकलेकर (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवता संप्रदाय) यांना १९९६ मध्ये चौदाच मूर्ती आढळल्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. म्हणजे १९८६ ते १९९६ या मधल्या दहा वर्षात पाच मूर्ती गायब झाल्या होत्या. अलिकडेच गावकऱ्यांनी व जैन युवा मंडळाने या मूर्ती गोळा करून जंगलातीलच एका जुन्या मंदिराच्या चौथऱ्याचा भाग स्वच्छ करून त्यावर ठेवल्या आहेत. या पाच मूर्ती चोरीला गेल्या असतील किंवा पुन्हा त्या भूमिगतही झाल्या असू शकतील. या मूर्तींचा शोध घ्यायला हवा. मध्यंतरी राज्य पुरातत्त्व खात्याने सध्या दिसणाऱ्या चौदा मूर्ती रत्नागिरीला संग्रहालयात हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा प्राचीन ठेवा गावातून हलवण्यास स्थानिकानी विरोध केल्याने त्या तिथेच ठेवण्यात आल्या आहेत. त्या मूर्ती अजून उघड्यावरच आहेत. एकीकडे त्या निसर्गहत होत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

        पेंडूरची ग्रामदेवता असलेल्या सातेरीदेवीच्या मंदिरामागे काही अंतरावर `जैनाचा डोंगर` आहे. आता जंगल बरेचसे विरळ झाले आहे, तरी जाणवण्याइतका रानवटा आहे. आता या गावात एकही जैन कुटुंब नाही, तरी `जैनाचा डोंगर` या स्थळनामाने गावाने येथील प्राचीन जैन संस्कृतीची आठवण जपली आहे. भल्या मोठ्या वारूळ रुपातील सातेरी आणि न्यायदान करणारा वेताळ ही या गावाची मुख्य दैवते. सातेरी मंदिराच्या मागच्या बाजूने जैनाच्या डोंगराकडे पायवाट जाते. काही अंतरावर गेल्यावर रानवटा सुरू होतो. थोडे आत गेल्यावर मंदिराचे भग्नावशेष दिसतात. एक मोठा चौथरा व अर्धवट खांब तेथे पूर्वी मंदिर होते, असे सांगतात. गर्भालयाचे व सभामंडपाचे अवशेष दिसतात. पण मूर्तींची संख्या पाहता हे मंदिर आता चौथरा दिसतो त्याहून खूप मोठे असावे. कदाचित त्या परिसरात मंदिर समूह असावा. येथे पूर्वी नक्षीदार खांब होते, असे गावकरी सांगतात. पण तसे निसर्गहत झालेले खांबही दृष्टीस पडत नाहीत. याचा अर्थ ते पळवले गेले आहेत.

जैन संस्कृती सिंधुदुर्ग
पेंडूर गावचा इतिहास

             जैन तीर्थंकरांची मूर्ती अजूनही देखणी दिसते. तीर्थंकरांच्या बाजूला चवऱ्या ढाळणाऱ्या दासीची प्रतिमा आहे. समोरच जमिनीवर गजमुखाचे कोरीव काम असलेले आसन व मूर्तीमागची प्रभावळ भग्नावस्थेत आहे. यक्ष व शासनदेवी यांच्या मूर्ती आहेत. भगवान वर्धमान महावीर यांची पद्मासनातील मोठी मूर्ती व निसर्गहत झालेल्या पादुकाही आहेत. याखेरीज पार्श्वनाथांची मस्तकहीन मूर्ती, सर्वानुभूते वगैरेंच्या मूर्ती आहेत. एक सिंहशिल्प व हत्तींची दोन आकर्षक शिल्पेही आहेत. नीट ओळखू न येण्याइतकी सिंहशिल्पाची हानी झाली आहे. या शिल्पांपासून थोडे दूर एक व्याघ्रशिल्प आहे. ते शिल्प तांबूसपिवळ्या रंगाने रंगवलेले आहे. त्याची वाघचाळा अशी ओळख आहे. चाळा म्हणजे गावासाठी तारक असणारी विध्वंसक शक्ती. गावाबाहेरून येणाऱ्या वाईट गोष्टींचा विध्वंस करणारी शक्ती. रक्षक देवता म्हणून या जंगलझाडीतील व्याघ्रशिल्पाची योजना गावकऱ्यांनी केलेली दिसते. व्याघ्रारूढ रक्षक देवीची एक मूर्ती अर्धी-अधिक जमिनीत गाडली गेलेली आहे. आभूषणांनी नटलेली ही मूर्ती लक्ष वेधून घेते. मुकुट, कर्णफुले, गळयात हार असलेली ही मूर्ती ध्यानस्थ स्थितीतील आहे. ती गोमेधा देवीची मूर्ती असावी. जांभाळ (कुबेर) हा संरक्षक यक्ष आणि गजलक्ष्मी, तसेच कालिका (महिषासूरमर्दिनी) यांच्याही मूर्ती येथे आहेत. चामरधारिणी यक्षिणी आहे. गजलक्ष्मीच्या पायाशी वादक कोरलेले आहेत. पंचनागांचे छत्र असलेली महावीरांची, तीर्थंकर नेमिनाथांची, तसेच एक कुबेरासारखी दिसणारी यक्षाची आणि पद्मावती व कुष्मांडिनी या शासनदेवतांच्या मूर्ती मी येथे पहिल्या भेटीत पाहिल्या होत्या. मी पाहिल्या तेव्हा त्या चांगल्या स्थितीत होत्या. त्या पाचही मूर्ती आता दिसत नाहीत. कुष्मांडिनी (अंबिका) ही तीर्थंकर नेमिनाथांची यक्षिणी. नेमिनाथांच्या मूर्तीबरोबरच जी यक्षिणी हरवलेली आहे, तिचा उल्लेख येथे मी कुष्मांडिनी असा करतो, कारण अजून एक कुष्मांडिनी येथे आहे आणि ती अंबिका म्हणून ओळखली जाते.

जैन संस्कृती मालवण

          कुष्मांडिनी सव्यललितासनात बसलेली होती. तिच्या डाव्या मांडीवर लहान मूल होते. मुलाला कवेत घेतलेल्या हातात आम्रलुम्बी (आंब्याची डहाळी) होती. उजवा हात वरदमुद्रेत होता. ‘प्रतिष्ठातीलाकम्‘ या ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे ही द्विभुजा मूर्ती होती. पादपीठावर सिंह हे वाहन कोरलेले होते. पाठशिळेवर दोन्ही बाजूस भक्तगण होते. अधोवस्त्र नेसलेल्या कुष्मांडिनीच्या कमरेला बारीक नक्षीकाम केलेली साखळी होती. हातात कंकणे, बाहुंवर बाजूबंद, गळ्यात हार, कानात कुंडले होती. ही यक्षिणी आता येथे नाही.
पद्मवाहना, चतुर्भुजा पद्मावतीच्या हातात अंकुश, पाश व पद्म ही आयुधे होती. उजवा खालचा हात वरदमुद्रेत होता. पादपीठावर कुक्कुटवाहन कोरलेले होते. पद्मावतीचे हे वर्णन ‘अपराजितपृच्छा‘ या ग्रंथात आले आहे. पद्मासनात बसलेल्या या पद्मावतीने डोक्यावर करंडमुकुट धारण केलेला होता. कानी कुंडले, गळ्यात विविध हार, कंकणे, बाजूबंद ल्यायलेली ही मूर्ती होती. येथील पार्श्वनाथांची मूर्ती मस्तकहीन आहे. तर त्यांची यक्षिणी असलेली पद्मावती येथून गायब आहे. (१९८६मधील टिपणाच्या आधारे आता मी या दोन्ही मूर्तींचे वर्णन केले आहे).

                    जैनांच्या मूर्ती असलेल्या या भागाला ‘डंकिनी-शांकिनी‘ नावाने ओळखले जाते. येथील एका यक्षिणीला डंकिनी व यक्षाला शांकिनी म्हटले जाते. यक्षीण या शब्दावरून डाकीण व त्यावरून डंकिन असे झाले असावे. शांकिनीचे पोट गणपतीसारखे मोठे आहे. मस्तकी मुकुट व छातीवर रुळणारे अलंकार आहेत. येथील डंकिनी अष्टाच्या मुळांनी वेढलेली आहे. कदाचित त्यामुळेच ती अजूनही तिथे सुरक्षित असावी. ही डंकिनी म्हणजे डाव्या मांडीवर लहान मूल घेतलेली अंबिका म्हणजे आम्रादेवी होय. सव्यललितासनात बसलेली अशी ही द्विभुजा मूर्ती आहे. गळ्यातील हार व बाजूबंदही दिसतो आहे. कमरेला अधोवस्त्र आहे. पाठशिळा नीट दिसत नाही, मात्र डोक्यावरच्या भागात आम्रफळे व डहाळी कोरलेली दिसते आहे. उजवी बाजू झाडात शिरलेली असल्याने उजव्या हातात फळ आहे की तो वरदहस्त आहे हे कळत नाही. `निर्वाणकलिका` व `प्रतिष्ठासारसंग्रह` या ग्रंथातील वर्णनानुसार ही अंबिका आहे. या यक्षिणीचे वाहन असलेल्या सिंहाचे शिल्प येथे दिसत नाही. या शिल्पापासून दूर असलेल्या व्याघ्रारूढ देवीच्या शिल्पाजवळ एक सिंहशिल्प सापडले आहे, ते या अंबिकेचे वाहन असू शकते.

                जैनांची ही यक्षिणी आता सर्वच गावकऱ्यांसाठी श्रद्धास्थान बनली आहे. रानवट्यातील या देवीला अपत्यसुखासाठी नवस बोलण्याची प्रथा आहे. छोटी पाळणी, बांगडया आदी नवस म्हणून देण्याची प्रथा आहे. लग्न व्हावे अशी इच्छा धरून अविवाहित येथे मुंडावळ्या नवस करतात. तर विवाह झाल्यानंतर बांगड्या अर्पण केल्या जातात. नव्याने आयुष्य सुरू करणारे नवउभयता आशीर्वादासाठी या मूर्तीसमोर दाखल होतात. साथीच्या रोगाला या वन-मातृकांचा कोप कारणीभूत असतो, असे येथे मानले जाते. पूर्वी गावात साथ पसरली की या मातृकांची हळद-कुंकू, काजळ, फुले व काकणे वाहून पूजा केली जात असे आणि त्यांना शांत केले जात असे, अशी माहिती ए. एम. टी. जॅक्सन यांनी `फोकलोअर इन कोकण` (१९१५) या पुस्तकात नोंदवून ठेवली आहे. (ब्रिटिशांविरुद्धच्या रागातून अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सन यांची नाशिक येथे हत्या केली). एरवी डंकिनी म्हणून उल्लेखली जाणारी ही यक्षिणी अशावेळी अंबिका माता असते. 

जैन संस्कृती शिल्प

           आता एकही जैन कुटुंब नसलेल्या या गावात अजूनही जैनांची आठवण ठेवून एक वर्षाआड उत्सव होतो. या उत्सवाची परंपराही अनोखी आहे. त्याकाळात येथे कुणी वाद्य वाजवित नाही आणि मांसाहार केला जात नाही. पूर्वी कार्तिकी अमावास्येला घरपरसातल्या आंब्याच्या झाडाखाली तांब्याचा पैसा ठेवायची प्रथा होती, असे तातू परब यांनी सांगितले. दिवाळीत आम्रवृक्षाखाली ताम्रनाणे ठेवण्याची प्रथा मालवणी मुलखात इतरत्र नाही. ती केवळ इथेच होती. कार्तिकी अमावास्या हा महावीरांचा निर्वाणदिन, त्यांचे स्मरण करण्यासाठी तर ही प्रथा पेंडूरमध्ये नसेल? (माझे गाव आडेली, ता. वेंगुर्ला. तेथील गोपीनाथांच्या तळ्याजवळ कार्तिकी अमावास्येला सायंकाळी दिवा लावून यायला माझी आजी सांगायची. `जैनांची दिवाळी` असे ती म्हणायची.) आता ताम्रनाणेही राहिले नाही आणि प्रथाही उरली नाही.

                गावात डांबरी रस्त्यालगत एका जैन धर्मगुरूची समाधी आहे. स्वामींची समाधी म्हणून तिची ओळख दिली जाते. पूर्वी येथे जैन वस्ती होती याच्या अनेक खुणा येथे आहेत. (पुण्यातील डेक्कन कॉलेजकडून पेंडूर येथील जंगलात लवकरच उत्खनन केले जाणार आहे).
         

तातू परब आणि नाना राऊळ यांनी ऐकवलेल्या दोन लोककथा सांगायलाच हव्यात.

                एक जण पेंडूरच्या तळ्यावर मासे पकडायला जात असे. (या तळ्यावर सामुहिक मासेमारीची प्रथाही आहे. त्याला `तळे मारणे` असे म्हणतात). नेहमीप्रमाणे त्यादिवशीही तो तळ्यावर गेला. त्याने जाळे फेकले. तो जाळे ओढू लागला. त्याला ते नेहमीपेक्षा जड वाटू लागले. मोठा मासा जाळ्यात आला असेल का, असा विचार करीत त्याने जाळे वर घेतले. बघतो तर जाळ्यात देवीचे पाषाण. त्याच्याबरोबर जाळ्यात मासेही खूप. पाषाणातून आवाज आला, `आजपासून तुझ्या जाळ्यात मी भरपूर मासे देत जाईन. मला उचलून सातेरीमागच्या डोंगरावर ठेव. तीन दिवस ही गोष्ट कोणालाच सांगू नकोस. या तीन दिवसात आम्ही तिन्ही बहिणी एकमेकींना भेटू आणि आपापल्या घरी जाऊ. तोवर आमची गोष्ट कोणालाच कळू देऊ नकोस.` त्या माणसाने तसे कबूल केले. देवीचे पाषाण सातेरीच्या मंदिरामागच्या डोंगरावर ठेवले आणि तो मासे घेऊन घरी आला.
                त्याला इतके मासे मिळाले होते, तेवढे याआधी कधीच मिळाले नव्हते. बायकोने त्यातील काही मासे घरात ठेवले आणि बाकीचे आवाठात फिरून विकले. दुपारी जरा सवड होताच तिने नवऱ्याला विचारले, “ आज इतके मासे कसे काय मिळाले? “ नवऱ्याने काही तरी थातुरमातुर उत्तर दिले व विषय टाळला. दुसऱ्या दिवशीही त्याला खूप मासे मिळाले. त्यादिवशीही बायकोने बरेच मासे आवाठात विकून पैसे मिळवले. तिसऱ्या दिवशीही खूप मासे मिळाले, तसे बायकोला राहवेना. ती म्हणाली, “अहो, बाकीचेही त्याच तळ्यावर मासे पकडायला जातात, पण तुमच्या जाळ्यात जेवढे मासे मिळतात, तेवढे इतर कुणालाच मिळत नाहीत. कसे काय? “ तिने खूपच आग्रह केला. तिच्या हट्टापुढे नवरा देवीला दिलेले वचन विसरला. त्याने ती गोष्ट पत्नीला सांगितली. तो म्हणाला, “ही गोष्ट तीन दिवस कुणालाच सांगायची नव्हती, पण तुला सांगितली. आज तिसरा दिवस आहे, म्हणून तू ही गोष्ट आज घराबाहेर कुणालाही सांगू नकोस. “ त्याचे हे बोलणे होत असतानाच उघड्या दारातून अचानक वाघ घरात घुसला आणि त्या माणसाच्या नरडीचा घोट घेऊन आला तसाच नाहीसा झाला.

              त्या माणसाच्या बायकोला मोठा धक्का बसला. तिने दुसऱ्या दिवशी सारी हकीकत गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनी डोंगरावर शोध घेतला तशी त्यांना मातृकांची तीन पाषाणे व वाघचाळ्याचे पाषाण सापडले. गावकरी त्यांना शरण गेले.
ही लोकसांगी मला महत्त्वाची वाटते. येथे असलेल्या तीन यक्षिणींचे व व्याघ्राचे स्मरण या कहाणीत आहे. आणखी एका दृष्टीने ती महत्त्वाची वाटते, कारण अणसूर-पाली येथील खाजणादेवीची कहाणी थोड्याफार फरकाने अशीच आहे. अणसूरलाही जैनस्थान होते. म्हणजे या परिसरातील दोन महत्त्वाची जैनस्थाने जनस्मृतीने जोडून ठेवलेली आहेत, असे म्हणता येईल.

jain-statue

          दुसरी कहाणी पाहू.

          काळसे येथील गुरव घराण्यातील बाई पेंडूरच्या सिद्धपुरूषाची सेवा करायला रोज यायची. तिच्या घरातून तिला पूजेसाठी पेंडूरला जायला बंदी घालण्यात आली. मग ती रात्री घरात निजानीज झाली की, घराबाहेर पडू लागली. अंगणाबाहेर सिद्धपुरूषांचा वाघ तिची वाट पाहात असायचा. त्याच्या पाठीवर बसून ती सिद्धपुरूषांच्या सेवेला जायची. अशा रीतीने तिचा तो नित्यनेम सुरू राहिला. पण ही गोष्टही फार दिवस लपून राहिली नाही. एक दिवस तिच्या घरातील कुणाला तरी कुणकुण लागली. घरातील लोकांनी तिला रात्री घराबाहेर पडताना व वाघावर बसून जाताना पाहिली. पण कुणीच तिला त्यावेळी हटकले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री जेवण करून ती आपल्या खोलीत गेल्यावर तिच्या खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली. मध्यरात्री नेहमीप्रमाणे ती सिद्धपुरूषांकडे जायला निघाली तर दाराला बाहेरून कडी. तिला बाहेर पडता आले नाही. सिद्धपुरूषांचा वाघ वाट पाहून निघून गेला. तीन दिवस असेच घडले. ती रात्री खोलीत गेली की घरातील कुणीही तिच्या दाराला कडी लावायचे. वाघ यायचा आणि वाट पाहून निघून जायचा. चौथ्या रात्री तिने युक्ती केली. नेहमीप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर तिने आपल्या खोलीत जात असल्याची हूल दिली. खोलीतील दिवा मालवला आणि दार बंद करून घेतले. थोड्यावेळाने घरातील इतरांनी तिच्या दाराला बाहेरून कडी लावली. पण गुरवीण त्या खोलीत नव्हती. ती आधीच घराच्या ओसरीला काळोखात लपून बसली होती. सगळीकडे निजानीज झाली आणि मध्यरात्री बारा वाजता वाघ आला. गुरवीण वाघाच्या पाठीवर बसून सिद्धपुरूषांच्या पूजेला गेली. तिने पूजा झाल्यावर सिद्धपुरूषांना यापुढे सेवेला येणे कठीण असल्याचे सांगितले. सिद्धपुरूष हसून तिला म्हणाले, “परत जाऊ नकोस. गावाच्या भल्यासाठी येथेच राहा.“

गुरवीण धन्य झाली आणि व्याघ्रारूढ रक्षक देवता होऊन तिथेच राहिली.

जैन संस्कृती शिल्प

जैनाच्या ड़ोंगरावर जमिनीत अर्धे गाडलेले व्याघ्रारूढ रक्षक देवतेचे शिल्प आहे. ते पाहून कुणाला तरी ही कहाणी सुचली असेल. पण या कहाणीत एक स्मृती जपली गेली आहे. गुरव हे शिवभक्त आहेत. शैवस्थानांचे पुजारी गुरव असतात. येथे एक काळ असा होता की, एकाच घरात शिवभक्त व जिनभक्त असत. पुढे शिवभक्तांनी जिनभक्तांना विरोधही केला. याचीच स्मृती या कहाणीत जपली गेली आहे आणि या दृष्टीने या कहाणीला महत्त्व आहे.

                   सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्यत्रही जैनांच्या प्राचीन खुणा आहेत. पेंडूरजवळच कट्टा येथे `जैनांची बाव`(विहीर) आहे. पेंडूरशेजारच्याच काळसे येथे `पारस परबां`चे स्थान आहे. श्रीपार्श्वनाथ प्रभू याचा `पारस परब` हा अपभ्रंश झाला आहे. प्राचीन काळी पेंडूर, काळसे, धामापूर या परिसरात जैनांचे मोठे धार्मिक पीठ असले पाहिजे, असे येथील अवशेषांवरून वाटते. मालवणात भरड भागात दिगंबर पंथियांचे श्रीनेमिनाथांचे मंदिर आहे, पण ते अलीकडचे म्हणजे साधारण १९३५च्या सुमाराचे आहे. सिंधुदुर्गात वेतोबाची मंदिरे अनेक आहेत. हा वेतोबा शैव परिवारातील. मात्र हारिस्ते (कणकवली) येथील वेतोबा व खवणे (वेंगुर्ला) येथील खवणेश्वर ही पूर्वीची जैन तीर्थकरांची स्थाने असावीत. माणगाव (कुड़ाळ) येथील यक्षिणी ही तीर्थंकर शांतिनाथांची निर्वाणी आहे. तेथे शांतिनाथांचीही मूर्ती आहे. वेंगुर्ल्याजवळील म्हापण, कुडाळजवळील हरकूळ व साळगाव, मालवणजवळील मसुरे, पोईप, कणकवलीजवळील बोर्डवे आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवरील खारेपाटण येथेही जैनांची महत्त्वाची स्थाने असावीत. वेंगुर्ल्याजवळील अणसूरला दांडोबाच्या देवस्थानाजवळ एका लांबलचक भिंतीचे अवशेष आहेत. या भिंतीलगतच्या खळग्यात जैन मूर्तीची खूण सांगणारी चार पाषाणे आहेत. खारेपाटण येथे नेमीनाथ व चंद्रप्रभू यांची मंदिरे सुख नदीच्या काठावर उभी आहेत.
मालवणी मुलखातील प्रत्येक गावात मुख्य देवस्थानात जैनांचे पाषाण असते. काही गावात `जैनाचा खांब`(तरंग)ही असतो. तरंग हे खास मालवणी मुलखाचे व गोव्याचे वैशिष्ट्य आहे. तरंग ही देवतांची प्रतिके असतात. तीन, पाच किंवा सात अशी ही तरंगे असतात. साधारण माणसाच्या उंचीएवढा गुळगुळीत सोटा असतो. या सोट्याला रंग काढलेला असतो. वरच्या बाजूला पितळीचा किंवा रुप्याचा मुखवटा, स्त्री अथवा पुरूषाच्या हाताचा पंजा किंवा कलश असतो. या सोट्याला रेशमी किनारीची धोतरे अथवा लुगडी नेसवलेली असतात. उत्सवादिवशी पालखीच्या वेळी ही तरंगे खांद्यावर घेतली जातात. कोणते तरंग कोणी खांद्यावर घ्यावे याचे त्या त्या गावात नियम असतात. जैनाचा खांब गुरव खांद्यावर घेतो. ज्या गावात गुरव नसेल, तेथे घाडी घेतो. शैवपूजक गुरव जैनाचा खांब खांद्यावर घेतो, हे येथे शैव-जैन संबंधात लक्षात घ्यायला हवे. मालवणी मुलखातील काही गुरव शैवपूजक असूनही स्वतःची ओळख `जैनगुरव` अशी सांगतात, हे महत्त्वाचे वाटते. समाजातील स्थित्यंतरातही काही खुणा या अशा टिकून राहिलेल्या असतात.

                मालवणी मुलखातील जैनाच्या पाषाणाचा जैन धर्माशी काहीही संबंध नाही, तर लिंगायत समाजाशी संबंध आहे, असे पु. रा. बेहेरे (कोकणातील देवदेवस्की) आणि श्याम धुरी (कोकणातील गावऱ्हाटी) मानतात. डॉ. भालचंद्र आकलेकर (कोकणचा सांस्कृतिक इतिहास, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवता संप्रदाय) यांनी हे मत पहिल्यांदा मांडलेले दिसते. ते लिहितात, `जैनांचे पाषाण किंवा प्रतीक हे जैन धर्माचे निदर्शक नाही. जैन म्हटलेल्या स्थळात शिवलिंग असते. त्याच पाषाणावर नंदी, गणपती यांच्या मूर्ती कोरलेल्या असतात. शिवाय एक किंवा अनेक मूर्ती आसनमांडी घालून ध्यानस्थ बसलेल्या असतात. किंवा शंकराच्या मंदिरात मुख्य शिवलिंगाच्या जवळपास आणखी एक लिंग असते. त्याला जैन असे नाव असते. पण हे लिंग असून त्याला जैन हे नाव चुकीने देण्यात आले असावे. जैन म्हटलेले स्थळ लिंगायत पंथियांचे निदर्शक आहे. कित्येक देवळात गुरव पुजारी असतात. त्यात काही मराठे तर बरेचसे लिंगायत असतात. लिंगायत गुरवास इतर लोक जैन म्हणतात व तेही स्वतःला जैन म्हणवतात. जैनांचे बहुसंख्य लोक लिंगायत बनले, त्यामुळे ते स्थळ जैन म्हटले जाते इतकेच. जैन संस्कृतीची ती विस्मृत खूण आहे. `( सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवता संप्रदाय). डॉ. आकलेकर प्रथम सांगतात की `जैनांचे पाषाण हे जैन धर्माचे निदर्शक नाही` आणि त्यानंतर सांगतात की `ती जैन संस्कृतीची विस्मृत खूण आहे`. या दोन विधानातील विसंगती बेहेरे व धुरी यांनीही लक्षात घेतलेली नाही. `जैनांचे बहुसंख्य लोक लिंगायत बनले, त्यामुळे ते स्थळ जैन म्हटले जाते इतकेच, `या विधानाने डॉ. आकलेकर खरे तर येथील धार्मिक स्थित्यंतर सांगू पाहात आहेत, पण त्याचवेळी जैनांचे महत्त्व नाकारू पाहात आहेत. जैनांमधून काहीनी लिंगायत पंथ स्वीकारला व नंतर त्यांनी पूर्णतः शैव पंथ स्वीकारला हा इथला इतिहास आहे. त्याचवेळी एकाच घरात जैन व शैव नांदत होते हाही इतिहास आहे.

कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार या घराण्यांची मालवणी मुलखावर सत्ता होती. या चारही राजघराण्यात जैन व शिव एकत्र नांदत होते. राजा जैन व राणी शिव असेही घडले आहे. जैन धर्माचे आचार्य समंतभद्र हे कदंब घराण्यातील राजपुत्र होते. राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष यानी उत्तरायुष्यात जैन धर्म स्वीकारला होता. कर्नाटकातील मंगळूरजवळच्या धर्मस्थळ येथील मंजुनाथाच्या मंदिराचे, एका शैवस्थानाचे धर्माधिकारी परंपरेने हेगडे या जैन घराण्यातील आहेत. कर्नाटकातील राणी अब्बक्का ही बंट (शेट्टी) समाजातील चौता घराण्यात जन्माला आली. तिचे मातुल घराणे जैन असले, तरी कुलदैवत सोमेश्वर (शंकर) होते.
कोकणात जैन धर्माचे अस्तित्व अगदी तेराव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर होते, याचे पुरावे सापडतात. पुढे मोठ्या प्रमाणात या भागातील जैनांनी शैव धर्म स्वीकारला. स्वाभाविक त्यांच्या मंदिरांचेही परिवर्तन झाले. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव आणि शिव ही एकच व्यक्ती आहे, असे जैन मानतात. जैन स्तोत्रांमधून शिवाची स्तुती केलेली दिसते. शिव आणि ऋषभदेव एकच मानल्यामुळे जैनांचे शैवात परिवर्तन होताना मंदिर परिवर्तनही सहज होऊ शकले. मात्र तरीही आधीच्या धर्माची आठवण म्हणून देवळांमध्ये ‘जैनाचे पाषाण’ कायम ठेवले गेले. आजही या भागातील बहुजन समाजातील अनेक लग्ने या ‘जैनाच्या पाषाणा’ला साक्ष ठेवून केली जातात.
आता मालवणी मुलखात येथील स्थानिक असे जैन कुटुंब आढळत नाही, पण जैनस्मरण कायम उरले आहे.

(विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर यांच्या `संशोधन क्षितिज` वार्षिकांक २०२२ यामध्ये हा लेख सविस्तर प्रकाशित झाला आहे.)

संतोष शेणई 

ई मेल – santshenai@gmail.com

Visits:1125
Total: 21129
Translate »
Pendur village Sindhudurg