उदे ग अंबे उदे !

कोकणातील देवस्थान : देवीचा मांड, पेंडुर (मालवण)

संपूर्ण देशभरात एकूण ५१ शक्तीपीठ आहेत आणि त्यातील साडेतीन शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. देवी मातेचा म्हणजेच आदिमाया,आदिशक्तींचा जागर दर नवरात्रौत्सवात केला जातो. घरात अथवा कुठेही कोणतंही शुभ कार्य असेल तर इष्टदेवतांच्या स्मरणानंतर आराधना केली जाते ती कुलदेवतेची आणि ग्राम देवतेची…

मी आता लग्न करून परब घराण्यात आले आणि त्यामुळे माझं सासरच गाव हे मालवण तालुक्यातील पेंडूर येथे आहे. मी माझा सासरच्या गावी एकदाच गेले होते – २०१४ साली आणि त्यानंतर मला गावी जाण्याचा योग आला नाही… असो पण मला आमची मालवणी संस्कृती आणि रितीरिवाज या बद्धल खूप जिव्हाळा वाटतो जो प्रत्येक कोकणी माणसाला असतोच मग तो अगदी जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी. तर आमचा ग्रामदेव आहे – श्री देव वेताळ आणि ग्रामदेवता आहे – श्री सातेरी देवी. मालवण तालुक्यातील पेंडूर हे गाव तेथील देवीच्या मांडउत्सवा मुळे आणि प्राचीन मंदिरामुळे खूप प्रसिद्ध आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा देवीचा मांड प्राचीन उत्सव असून सर्वधर्म-समभावाचे प्रतीक आहे तसेच या उत्सवाला सुमारे ४०० वर्षांचा ज्ञात इतिहास आहे.

१३०० वर्षांपूर्वी जैन धर्मियांनी या पेंडूर गावाची निर्मिती केली असे सांगितले जाते. तसेच ४०० वर्षांपूर्वी सावंतवाडी संस्थानाचे सरदार सावंत-भोसले घराण्याचा मूळ पुरुष पेंडूर खांदवाडी या ठिकाणी आला आजही या मूळपुरुषाच्या वाड्याचा पाया येथे पाहावयास मिळतो. या पायावरच सावंत- भोसले या घराण्याचे एक कुलदेवता मंदिर आहे. या मूळपुरुषाने पेंडूर गावाचा कारभार हाती घेऊन तो चालविण्यासाठी बारा बलुतेदारांची नेमणूक केली तर ग्राम देवता म्हणून श्री देव वेताळ याची स्थापना करण्यात आली या बरोबरच श्री देवी सातेरी, पावणाई, लिंग, रवळनाथ अशा अनेक देवतांची मंदिरे स्थापन करण्यात आली. या गावामध्ये देवीचा उत्सव हा तीन वर्ष आड केला जातो. हे वेतोबाचे देवस्थान हे अत्यंत पुरातन मंदिर समजले जाते तसेच या उत्सवा दरम्यान मांड उठण्यापूर्वी अगोदरचे दोन दिवस लक्षद्वीप कार्यक्रम ठेवला जातो आणि प्रत्येक गावकरी स्वतःचे पैसे खर्च करून एक दिवा आपल्या देवासाठी लावतो.

पेंडूर मांड उत्सव २०२२-२३

पेंडूर गावाच्या या मांड उत्सवाची कथा ही अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक आहे. ग्राम दैवत श्री देव वेताळाची बहीण श्री देवी जुगाई ही आहे आणि दर ३ वर्षांनी स्वतः श्री देव वेताळ हा आपल्या बहिणीला १४ दिवसांसाठी माहेरपणाला घेऊन येतो. श्री देवी जुगाई १४ दिवस माहेरी राहते आणि तिच्या या माहेरपणाला काळ म्हणजेच हा मांड उत्सव. उत्सवाच्या दिवशी सर्व मानकरी, ग्रामस्थ ढोल-पतकासह गावात जातात आणि तेथील एखाद्या स्त्रीच्या अंगात श्री देवी जुगाईचा संचार होतो असे म्हणतात. त्यानंतर श्री देव वेताळ स्वतः आपल्या बहिणीचा हात धरून ढोल ताश्यांच्या गजरात आणि मिरवणुकीने तिला माहेरी म्हणजेच स्वतःच्या मंदिरात घेऊन येतो. श्री देवी जुगाई मंदिरात आल्यानंतर प्रथम मानकऱ्यांच्या हस्ते पाटावर ओटी भरून तिची पूजा केली जाते आणि यानंतर खऱ्या अर्थाने उत्सवाला प्रारंभ होतो. तिसऱ्या दिवशी पाच मानकरी आणि १२ सेवक यांनी ओट्या भरल्यानंतर देवाच्या हुकुमावरून अन्य भाविकांच्या ओट्या भरण्यास सुरुवात होते. हा कार्यक्रम उत्सवाची सांगता होईपर्यंत निरंतर सुरु असतो. पौष महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये या जत्रेची सुरुवात होते आणि तिथून हा कार्यक्रम १३ रात्री १४ दिवस अव्याहतपणे चालू असतो.

ओट्या भरण्यासाठी १६ बाय १२ अश्या आकाराची पारंपरिक बांबूची डाळी अंथरली जाते आणि उत्सवाची सांगता होईपर्यंत ह्या डाळीवरच या ओट्यांची रास रचली जाते. १३ व्या दिवशी रात्रौ देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम केला जातो आणि १४ व्या दिवशी पहाटे देवीच्या अवसर काढला जातो आणि ह्याच अवसरी रूपातील देवी ओट्यांच्या राशीला स्पर्श करून ओट्यांचा स्वीकार करते असे मानले जाते. त्याचप्रमाणे मानकरी ग्रामस्थांना स्वहस्ते ओट्यांमधील नारळ आणि तांदळाचे वाटप करतात. यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून श्रीदेव वेताळ आणि श्री देवी जुगाई ढोलताश्यांच्या गजरात मिरवणुकीने कर्ली खाडी येथे स्नानासाठी देवाची निशाण परडी घेऊन जातात. त्यानंतर मंदिरात येऊन भक्तांना तीर्थ प्रसादाचे वाटप केले जाते आणि देवीची खणा-नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने पुन्हा घरी पोचवले जाते. या ऊत्सव काळात जमलेल्या ओट्यांपैकी निम्म्या ओट्या ह्या देवीला दिल्या जातात आणि निम्मा भाग हा देवस्थान समितीकडे सुपूर्त केला जातो आणि या कार्यक्रमानंतर उत्सवाची सांगता होते. सुरुवातीला ३ दिवस नंतर ५, ७, ९, १२ असे करता करता आता या उत्सवाच्या लोकप्रियतेमुळे हा उत्सव तब्बल १४ दिवसांचा केला जातो. असे म्हणतात की अनेक वर्षांपूर्वी एक उभयता पंढपूरला गेले असता त्यांच्या स्वप्नात देवी आली, तिचा संचार झाला आणि गावात देवीची स्थापना झाली असा समज आहे. पुढे गावाने त्याचा विचार करून त्या देवीला इथे वेताळ मंदिरात स्थापन केले. तर असा हा जुगा-पतीचा खेळ म्हणजेच श्री देव वेताळ आणि श्री देवी जुगाई ह्या बहीण-भावाचा हा मांड उत्सव सिंधुदुर्गातील भाविकांचे मोठे श्रद्धा स्थान आहे. असे म्हणतात माहेर वाशीण असो किंवा सासुर वाशीण महिला असो या सर्व स्त्रीया न चुकता या मांडाला ओटी भरण्यास येतात तसेच संपूर्ण देशभरातूनही अनेक भाविक या उत्सवाला भेट देतात.

भाविकांना पावणारा देव वेताळ आणि सातेरी देवी अशी या पेंडूर गावाची ख्याती आहे. तसेच तुम्ही जर पेंडूर मधील सातेरी मंदिरात गेलात तर तुम्हाला एक अत्भुत द्रुश्य पाहायला मिळेल. इथे देवीची कुठलीही पाषाणरूपी मुद्रा नसून तुम्हाला पाहायला मिळेल ते भलेमोठे वारूळ. ह्या वारुळाच्या रूपालाच देवी मानले जाते आणि हे वारूळ वर्षानुवर्षे तसेच्या तसेच आहे ही खूपच विस्मयकारक बाब आहे नाही का …

देव हा सर्वांचे कल्याणच करतो आणि कोणत्याही संकटात आपले कुलदैवत अथवा कुलदेवी आपल्या पाठीशी सदैव उभे असतात अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांचे नामस्मरण करणे आणि त्याची आपल्याला माहिती असणे हे खूप महत्वाचे आहे कारण आपल्या सगळ्यांचीच या गोष्टीमुळे आपल्या कुळाशी आणि आपल्या गावाशी नाळ जोडलेली असते आणि हाच संस्कृतीचा वारसा आपण संस्कारांवाटे आपल्या पुढच्या पिढीला देत असतो.आपला हा जुन्या चाली-रीतींचा ठेवा आणि कुलदेवीची आठवण अशीच कायम जपायला हवी.
तुमची कुलदेवी आणि त्यामागची एखादी पौराणिक किंवा इतिसाहिक कथा नक्कीच असेल ना…मग तुम्ही सुद्धा ती कमेंट्स मध्ये शेअर करायला विसरू नका.
II श्री कुलदैवतायै नमः II

  • रमा रुक्मांद परब

टीप : या लेखामधून कोकणातील देव-देवतांची इतरांनादेखील माहिती व्हावी हीच फक्त सदिच्छा आहे आणि माझा लिखाणात जर काहीही चूक आढळल्यास क्षमा असावी.

 

Visits:1346
Total: 20494
Translate »
Pendur village Sindhudurg