Spread the love
लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ ही कथा

लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ

लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ ही कथा

कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ म्हणजे हा मूळ यक्ष देवाच्या प्रकृतीचा. शाक्तांनी प्राचीन भैरवात फरक केला तो त्याच्या रुपात, भूमिकेत नाही. शाक्त पंथात आल्यावर भैरवास मूर्तीरूप मिळाले. चार किंवा अधिक हात, शिवस्वरूपामुळे हातात त्रिशुळ, डमरू, आयुधे दिली गेली. तोच हा दक्षिण कोकणचा संरक्षक क्षेत्रपाळ रवळनाथ. आज दक्षिण कोकणातील प्रत्येक गावात रवळनाथाची मूर्ती असते. ती खास वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे. ही मूर्ती उभी असून तिचा डावा पाय किंचित वाकवून पुढे केलेला असतो.

                उत्तर दक्षिण कोकणासह गोमंतकात व्यापून राहिलेल्या श्री रवळनाथ या लोकदेवांच्या स्वरूपाचा मूलगामी अभ्यास करताना आदी ना अंत रहस्याच्या काळ्याभोर कोंडीत ठाव घेण्यासाठी बुडी मारतो. त्यातील रहस्याचा थोडासा बोध हाती येतो, त्यावेळी आनंदाचे डोही आनंद तरंग हीच मनाची अवस्था होते.

             दक्षिणेचा हा लोकदेव, क्षेत्रपाल देव जो सिंधुदुर्ग गोमंतक व सीमेवरील कर्नाटकर राज्याचा काही प्रदेश व्यापून राहिला आहे. या ग्रामदेवतेच्या, कुलदेवतेच्या, क्षेत्रपाल स्वरूपाचा हा अद्भूत प्रवासाचा मागोवा.

          अजस्त्र, प्रचंड, काळ्याकभिन्न पत्थरांचा, खोल दर्‍याखोर्‍यांचा, घनदाट जंगलानी व्यापलेल्या सह्याद्रीच्या खलाटी वलाटीतील हा प्रदेश. सिंधु सागराच्या विळख्यातील हा प्रदेश. सारे आसमंत, आडमाप, आडदांड, सहज आकलन न होणारे. तसा हा प्रदेश प्रखर, उग्र, अवघड, हिंस्त्र, गतीमान व संघर्षयुक्त. प्रचंड पर्जन्यवृष्टीचा हा प्रदेश. बलवत्ता व अनिश्चितता यावर मात करू शकते ती शक्ती प्रचंड ताकदीची पाहिजे. 

. या लोकसंस्कृतीला ती दिसली शैवोपासनेत. येथून प्रवास सुरू झाला, तो मूळ यक्षोपासनेचा. दक्षिण कोकणात ज्या प्राचीन यक्षदेवता व वीरयक्ष हेच प्रामुख्याने ग्राम व नगरसंरक्षक देव आहेत, तेच गावचे संरक्षण करतात ही या लोकांची श्रद्धा आहे. श्री. गोडसे म्हणतात, ‘यक्षपुजेपासून शिवोपासना आणि शिवोपासनेतून त्यांच्या अनुचर देवता भैरव, मल्हारी, खंडोबा, ज्योतिबा, रवळनाथ यांच्या पूजा शिवकालात रूढ होत्या. यक्षपूजा तर आर्येतरांचा पशुपती व आर्यांचा रूद्र यांचे एकत्रित केलेले हे स्वरूप 5 हजार वर्षांपूर्वी सिंधुनदीच्या खोर्‍यात शिवाची पशुपती या स्वरूपात दिसून येते. लोकसंस्कृतीने स्वीकारलेली रूद्र व शिव उपासना मूळ आर्यांची नव्हती. कारण यांचे देव विष्णू, ब्रह्मा, महेश, रूद्र, इंद्र, वरूण यांची मंदिरे दिसत नाहीत. मंदिरे आहेत ती यक्षदेवांची परिणत झालेल्या रूपांच्या देवांची. लोकप्रिय क्षेत्रपाल देवांची. हजारो वर्षे झाली तरी आदिम यक्षोपासनेची चिवट परंपरा सातत्यपूर्ण पिढ्यान्पिढ्या चालू आहेत. म्हणूनच भैरव (गस्ती करणारा) हा लोकप्रिय क्षेत्रपाल देव प्रसिद्ध आहे. कौल, नवस, गार्‍हाणे, बळी या उपासनेतून संपूर्ण गाव बांधिलकी असणे, अरिष्टापासून संरक्षण, कोपापासून कृपा, सुख, समृद्धी ही अपेक्षा अजिबात नसते. सौम्य रूपापेक्षा उग्र रूपावर भर. ती आणि भक्तीसुद्धा भितीतून अधिक. निसर्गाच्या गुढ, पंचमहाभूतांचे वाटणारे भय त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून उपासना यातून झटकन पावणार्‍या ग्रामदेवता, यक्षदेवता या दक्षिण कोकणात प्रसिद्धी पावल्या. या मूळे यक्षदेवास शाक्तांनी आपल्या पंथात कोणताही बदल न करता सामील करून घेतले. त्यांच्या यक्षीय व्यक्तिमत्वाला कुठलाही धक्का न लावता. कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ म्हणजे हा मूळ यक्ष देवाच्याच प्रकृतीचा. शाक्तांनी प्राचीन भैरवात फरक केला तो त्याच्या रुपात, भूमिकेत नाही. शाक्त पंथात आल्यावर भैरवास मूर्तीरूप मिळाले. चार किंवा अधिक हात, शिवस्वरूपामुळे हातात त्रिशुळ, डमरू, आयुधे दिली गेली. तोच हा दक्षिण कोकणचा संरक्षक क्षेत्रपाळ रवळनाथ. आज दक्षिण कोकणातील प्रत्येक गावात रवळनाथाची मूर्ती असते. ती खास वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे. ही मूर्ती उभी असून तिचा डावा पाय किंचित वाकवून पुढे केलेला असतो. रवळनाथ चतुर्भज आहे. पुढच्या उजव्या हातात तलवार व डाव्या हातात अमृत पात्र असते. मागच्या उजव्या हातात त्रिशुल आणि डाव्या हातात डमरू असतो. मूर्तीची दृष्टी समोर आणि सरळ असते. डोक्यात मुकूट, धोतर नेसलेले असते. गळ्यात यज्ञोपवित असते. इतर मालाही असतात आणि नरमुंड मालाही असते. ओठांवर वळविलेल्या मिश्या असतात. या भागात देवतांच्या मूर्तींना रूप्याचे नेत्र चिकटवलेले असतात. रवळनाथ मूर्तीचे नेत्र असेच रूप्याचे असतात. मूर्तीचे दोन्ही बाजूस परिचारिकांच्या चवरी ढळीत असलेल्या अशा दोन मूर्ती कोरलेल्या असतात. काही ठिकाणी या परिचारिकांच्या चार मूर्ती असतात. कित्येक ठिकाणी मूर्तीच्या उजव्या बाजूस घोडा कोरलेला असतो. श्री रवळनाथ ही ब्रह्मचारी देवता असे मानले जाते. रवळनाथ हा शिव आहे, कारण याचे पुजारी गुरव किंवा राऊळ असतात ही महत्त्वाची खूण आहे. कारण संपूर्ण हिंदूस्तानात शिवाचे पुजारी गुरव, जंगम आणि राऊळच आहेत. रवळनाथास एका बाजून ब्रह्मचारी म्हणतात, दुसर्‍या समजूतीप्रमाणे त्याला बायको आहे. तिचे नाव पावणाई. ती कुठे द्विभुज तर कुठे चतुर्भुज स्वरूपात आढळते. तिच्या चतुर्भुज रूपाची आयुधे रवळनाथाच्या आयुधांप्रमाणे असतात. या देवतेच्या जीवन रहस्याचा पट अनेक जिज्ञासूंनी उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या देवतेची व्यापकता इतकी आहे की इथल्या जनमानसावर सर्व स्तरात तिची उपासना प्रचलित आहे.

              सातत्याने उन्नयन प्रक्रिया घडत गेली. ग्रामदेवता ते कुलदेवता बनून तिच्यावरील अलौकिक श्रद्धा अभंग राहिली आहे. या लोकदेवतेची लोकश्रद्धेने निर्माण झालेली अवतार कथा, तिचा प्रवास पाहण्यासाठी ती समजून घेणे महत्त्वाचे आहे.

             ही कथा केदार रवळेशाची. कोल्हापूर जवळ ज्योतिबाचा डोंगर म्हणून जे स्थान आहे, त्याला रत्नागिरी असेही नाव आहे. तेथील ज्योतिबा हाच केदार रवळेश आहे. महालक्ष्मीने कोल्हासूराशी युद्ध करण्यासाठी मदतीसाठी त्याला हिमालयातून आणले. त्याने रत्नासूर व रक्तभोजन या दोन असूरांचा नाश केला व हिमालयातून लिंग आणून केदारेश्वर म्हणून स्थापना केली, असे करवीर महात्म्यात वर्णन आहे. असा हा कोल्हापूरजवळील केदार रवळेश हा रवळनाथ या नावाने कोकणात व्यापून राहिला आहे. ज्योतिबाला दक्षिण मुख केदार असे करवीर महात्म्यात म्हटले आहे. कोकणातील रवळनाथांची बहुतेक देवळे दक्षिणमुख असलेली आहेत. असा हा क्षेत्रपाळ भैरव जो दक्षिणमुखी आहे, हा घाटमाथ्यावर ज्योतिबा आणि दक्षिणक कोकण गोमंतकात रवळनाथ या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव एका सांस्कृतिक बंधनाचे प्रगटीकरण आहे.

        केदार विजयातील या ज्योतिबा स्वरूप रवळनाथाची महात्म्य कथा, जन्म कथा अशी आहे. बद्रीकेदारक्षेत्री पौगंडऋषी आणि त्यांची पत्नी विमलांबुजा हे दांपत्य पुत्रप्राप्तीसाठी तप करीत होते. त्यांच्या तपाला जे फळ आले ते केदार रवळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. हिमालयातीतल केदारनाथाचा हा अवतार असल्यामुळे केदार, केदारनाथ, केदारेश्वर अथवा केदारलिंग अशी त्यास नावे मिळाली. तसेच हा रवळेश्वर म्हणून प्रसिद्ध तर जमदग्नीच्या रवाग्निचा म्हणजे क्रोधाग्निचा तो अवतार. रेणूका वधानंतर जमदग्नि ऋषिंनी त्यागिलेला क्रोध परशुराम, नवनाथ (नवनारायण), समुद्र, अरण्य व अन्य जग यांनी वाटून घेतला. त्यापैकी लक्ष्मीने नवनाथांचे क्रोध तेज एकत्र करून ब्रह्मा, विष्णू, महेशास एकरूप अवतार घेण्याची विनंती करून हा केदारनाथ विमलांबुजाच्या करकमळाला केदर रवळेश्वर म्हणून शुक्ल पक्ष, चैत्रमासी वसंत ऋतूत रविवारी षष्ठीयुक्त सप्तमी तिथीला रवळनाथांचा अवतार म्हणून जन्मास घातला.

        ‘नव रवाग्नीचा अवतार । धरिण त्रिगुणी सगुणाकार ।

        म्हणूनी नाम रवळेश्वर । आगमोत्तरी ठेविले ॥’

        केदारनाथ हा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे केदार लिंगाला ज्योतिर्लिंग असेही म्हणू लागले. ज्योतिर्लिंग या नावावरून त्यास ज्योतिबा असे लौकीक नाव रूढ झाले. करवीर निवासिनी महालक्ष्मी हिच्या आग्रहास्तव तो दक्षिणेस आला म्हणून त्याला दक्षिण केदार असेही म्हणतात. केदार या शब्दाचा अर्थच मुळी शेतजमीन असा आहे. यावरून त्याला केदारनाथ म्हणजे क्षेत्रपती म्हटले आहे. धरित्री माता आणि तिला सफलित करणारा ज्योतिबा (लांगलदेव, नांगरदेव) पिता ही संरचना वेदांच्या तर वेदापूर्वी कालापासून चालत आलेली आहे. यमाई आणि ज्योतिबा हा असा जिव्हाळ्याचा संबंध. या संबंधातूनच या सृष्टीची निर्मिती झाली. म्हणून या देवी मातापितरांचा सोहळ्यात ‘चांगभलं’ असा पवित्र घोष करतात.

कोकणात कुंकणा हे रेणुकेचे पर्यायी नाव. कुंकणा (कुं – पृथ्वी + कणा – रेणुरूप) म्हणजे भूमीच्या कणांनी बनलेली. रेणुमयी म्हणजे भूदेवी. या रेणुकेची कुंकणा ही उपासना, कोकण, गोमंतक, आंध्र, कर्नाटक येथे वारूळ रूपात केली जाते. जिला भूमिका, सातेरी म्हणून रोयण किंवा वारूळ रूपात पुजतात. वारूळ हे भूमीच्या योनीचे प्रतिक आहे. या प्रतिकाच्या अनुषंगाने वारूळस्थ नाग हा पुरूषतत्त्वाचा म्हणजे क्षेत्रपाळाचा प्रतिनिधी मानला गेला आहे. वारूळ रूपात क्षेत्रदेवता म्हणजे यल्लम्मा, मातंगी, रेणुका, सातेरी यांचे पूजन आणि नागरूपात वारूळात नांदणार्‍या नागाच्या रूपात क्षेत्रपती मुरूग, सुब्रह्मण्य, ज्योतिबा, खंडोबा, रवळनाथ, म्हसोबा हे क्षेत्रपती पावित्र्याने पुजिले जातात. असे कोकणात रवळनाथ पती व सातेरी पत्नी म्हणून पुजनीय ठरली आहे. सातेरी आणि रवळनाथ क्षेत्र, क्षेत्रपाळी हा संबंध. कोकणात या सातेरीची गावोगावी ठाणी आहेत व ती वारूळ स्वरूपातच आहेत. वारूळ हे भूमिद्रव्याने घडले आहे. त्याला भौम भोंबाडा असे म्हणतात. हेच देवीचे रूप पुजीले जाऊन तिला ‘भूमिका देवी’ हे नाव आहे. या सर्व ठिकाणी रवळनाथ हा क्षेत्रपती म्हणून नांदत असतो. असे केदारनाथ व केदारेश्वर या नावातील पहिले पूर्वपद क्षेत्र दर्शविते. तसेच रवळनाथ किंवा रवळेश्वर या नावातील पहिले पद क्षेत्रप्रतिक आहे. आणि ‘ण’ या उभेदाने रोयण रवणपासून ‘रवळ’ हा शब्द बनला आहे. त्याचा गोमांतकीय मराठीत ‘वारूळ’ हा अर्थ आहे. रवळेश्वर, रवणेश्वर अशी नावे उपलब्ध आहेत. त्यामुळे रवळ (रवण/रोयण) हे पद सातेरीचे द्योतक आहे. रवळनाथ हा तिचा पती (नाथ) आहे. हे क्षेत्र पतित्व स्पष्ट होते. बर्‍याच ठिकाणी अश्व व सर्प हीच त्यांची वाहने आहेत. त्याचे प्रमुख वाहन कासवही मानले जाते. त्याचे दुसरे वाहन शेष आहे. तो सर्पालंकृत आहे. व सर्पविषतारकही आहे. असा क्षेत्रपाळ अनुक्रमे वारूळ आणि नाग ही प्रतिके वापरतो. जी उघड स्त्रीपुरूष तत्त्वाची प्रतिके आहेत. त्यामुळे लोकधर्माच्या विश्वात जगाची मातापिता म्हणून सर्व देव मंडळात पूजनीय आहेत. रा. चि. ढेरे यांचे यावरील संशोधन अतिशय बहुमोल आहे. रवळनाथ हा कोणत्या देवाचा अंश असावा, यावरून विद्वानांमध्ये भिन्न भिन्न कल्पना आहेत. श्री रवळनाथ हे रवणनाथाचे अपभ्रष्ट रूप असावे असा काहींचा तर्क असून कोकणी संशोधक कॅ. बांबार्डेकर यांनी त्याला दुजोरा दिला आहे. नाथपंथाचा कोकणात संचार झाल्यावर त्यांच्या बरोबर चेटूकमाटूकचे प्रकार येथे आले. मांत्रिकांनी आणि देवस्कीत बदल केला असे काहींचे मत आहे. परंतु रवळनाथ हे रेवणनाथ यांचे रूप आहे. नाथपंथीयांनी हा देव आणला असे मानता येत नाही. नाथपंथाचा प्रसार नववे शतक हा निश्चित आहे. ही देवता त्याहून प्राचीन आहे. त्यामुळे रेवणनाथ हा रवळनाथाचा ‘अवतार’ हा तर्क चुकीचा वाटतो. कोकणात रवळनाथाची कुठे असा एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ भुतावळ. शिवाचा आणि त्याचा भुतगणांचा संबंध प्रसिद्ध आहे. तो भूतनाथ म्हणून ओळखला जातो. म्हणून हा भूतपती म्हणजे भुतावळीचा धनी. या नावाचा रवळनाथाशी संबंध जोडून कॅ. शणै गोय बाब आपल्या ‘ऐन वेराळ’ या कोकणी पुस्तकात म्हणतात. ‘रवळनाथ’ हा अगदी पूर्व वैदिक काळातील देव आहे यात संशय नाही. आता हे नाव त्याला केव्हापासून लागू झाले आहे हे पाहू. रवळनाथ यातील ‘रवळ’ हा शब्द ‘राऊळ’ याचे रूपांतर आहे. ख्रिस्त शकाच्या तिसर्‍या शकात बुद्धीधर्मी महायान संस्थापक नागार्जुन यांच्या गुरूंचे नाव राहुलभद्र असे होते. याही ब्राह्मणाने बुद्ध धर्माची दिक्षा घेतली होती. गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव ‘राहूल’ होते. यावरून बुद्धपूर्व वैदिक काळ हे नाव प्रचारात असणे शक्य आहे. याच काळात आपले पूर्वज राऊळनाथ हे नाव त्यांची भक्ती घेऊन कोकणात आले असावे. या नावाची देवळे इतर कोठेही नाहीत. रवळनाथ या नावाला कोकणच्या ट्रेडमार्कचे रूप आले आहे. (पृष्ठ 128-129)

रवळनाथ म्हणजे परमेश्वराच्या तृतीय प्रकृतीचे प्रतिक आहे. ही देवीची मूर्ती आहे अशी माहिती श्री. नानासाहेब चाफेकर यांनी ‘चित्पावन’ ग्रंथात नोंदली आहे. श्री. खरे यांनी रवळनाथ हा कोकणातील देव खंडोबाशी एकरूप मानला आहे. ते म्हणतात रवळनाथ, रवळदेव, रवळेश्वर हे खंडोबाचे एक नाव असून त्याच्या मूर्तीवरून त्या दोघांचे एकरूपत्व चांगलेच प्रत्ययास येते.

        श्री. खरे यांचे मते ‘लवल’ या शब्दापासूनच रवल हा शब्द बनलेला आहे. लवल हे एका वेलीचे शुभ्रवर्णाचे फळ असून शुभ्रतेच्या वर्णनात त्याचा उपमा म्हणून संस्कृत साहित्यात उपयोग आढळतो.

        शिव हा कर्पुरगौर पांडुरंग आहे. तेव्हा सवलनाथ, रवळनाथ म्हणजे पर्यायाने शिवच. परंतु रवळनाथ व खंडोबा हे दोघे शिवस्वरूप ठरले तरी भूमितीतील प्रमेयाप्रमाणे एकरूप ठरविता येणार नाही.

        ज्योतिबा सौम्य भैरवरूपी आहे. तसेच ज्याला आपण केदारनाथ-रवळनाथ म्हणतो तो खंडोबाच्या त्या भैरवाच्या अत्युग्र रूपातून सौम्य रूपाकडे जाणारी पुढील पायरी आहे असे वाटते.

        प्रसिद्ध साहित्यिक पंडीत महादेवशास्त्री जोशी यांच्या मते रवळनाथ हा शुद्ध देव असून रूरू हे त्यांचे मूळ नाव आहे. अष्टभैरवात ‘रूरू’चे रवळू आणि रवळू चे पुढे नाथ जोडून रवळनाथ असे रूपांतर होऊ शकते. सर्पाचे विष उतरविणे हे रवळनाथाचे वैशिष्ट्य, त्यामुळे देशावरील बहिररोबर व दक्षिण कोकणातील रवळनाथ हे दोघे भैरव सांगितले असल्याचे निश्चित होते.

        दक्षिणेस कारवार पासून उत्तरेस देवगडपर्यंत रवळनाथाची देवळे आहेत. देवगडच्या ओर्ला रवळनाथाची देवळे तुरळक तरीपण गावोगावी केदारलिंग ही देवता आढळते. रवळनाथ व त्यांचे भव्य आजरे, चंदगढ कोकणात आले असावे. यामुळे चंदगढ, आजरा येथेही रवळनाथाची मंदिरे आहेत.

        शिवाप्रमाणे केदार ही द्रविडांची देवता असावी. त्यामुळे कोकणात रवळनाथ देवतेला आणणारे वसाहतकार आर्य नसून द्रविडच असावे अशी शंका पू. रा. बेहरे यांनी व्यक्त केली आहे. बेहेरे पुढे म्हणतात, श्री रवळनाथाचे तरंग हे याच देवतेचे प्रतिक आहेत. रवळनाथ ही देवता ज्या वसाहतकारांने कोकणात आणली त्याची जमात आपल्या पराक्रमाने व गुणाने या भागात अग्रगण्य झाली असावी. त्यामुळे तरंग सार्वत्रिक आहेत आणि तेच मुख्य तरंग आहेत. संचाराची किंवा अवसराची जी देवस्की असते, त्यात रवळनाथांचा पूर्वस हा प्रमुखपणे मेळा करतो. म्हणजे अवसराबरोबर सल्लामसलत करून अखेरचा निर्णय देतो. म्हणून त्याला मेळकरी असे म्हणतात. थोडक्यात पंतप्रधानाची भूमिका.

        ज्योतिबा-यमाईचे लग्न जसे लावतात तसेच रवळनाथाचे तरंग, पावणाईचे तरंग यांचेही लग्न लावतात. या विधीला ‘शिवलग्न’ म्हणतात. ‘पाणाई’, ‘सातेरी’ नव्हे ‘पावणाई’ ही यमाई असून ती रवळनाथाबरोबर कोकणात आली असली पाहिजे. यमाई ही महालक्ष्मीहून वेगळी देवता आहे. ती अनादी शक्ती आहे. रवळनाथ, पावणाई, भूतनाथ, सातेरी या दैवत उपासनेत तरंग नपुसकलिंगी आहे. खांब हा त्यास पर्यायी शब्द. माणसाच्या उंचीची लाकडाची एक गुळगुळीत गोल काठी, त्याला निरनिराळ्या रंगाचे पट्टे असतात. या तरंगावर पितळी अगर रूप्याचे मुखवटे, पुरूष मुखवटा आढळत नाही. देवीचा मुखवटा, हाताचा तळवा, कलश असे बसवून रेशमी किनारीची धोतरे किंवा लुगडे नसवून विशेष प्रसंगी पूजन करताना गाव देवस्कीच्या वेळी खांद्यावर घेऊन अवसर काढतात. प्रत्येक ठिकाणी रवळनाथाचा तरंग असतोच. शक्यतो तो गुरव (क्षेत्रपालाचा पुजारी) घेत असतो. तरंग काष्ठ आहे. तो नागफणीशी संबंधित आहे. नागकाल लिंगरूप आहे. तरंग त्याचे प्रतिक सामर्थ्याने भरले आहे. लिंग-लंगल-लगूल यापासून तलंग व तलंग हे स्वरागमाने तलंग तरंगाची ही व्याप्ती रा. चि. ढेरे या अभ्यासकाने अतिशय सुंदर केली आहे.

             डॉ. भालचंद्र आकलेकर या तपस्व्याने रवळनाथ या देवतेचा परिपूर्ण अभ्यास केला आहे. त्यांनी रवळनाथाचा एक नवा अन्वयार्थ लावला आहे. त्याने द. कोकणातील 139 रवळनाथांचा अभ्यास केला. ते म्हणतात, यातील 29 रवळनाथ हे केदाार वाटतात. उरलेले 59 रवळनाथांचे ध्यान विठ्ठलासारखे वाटते. कोकणात एकादशीचा मोठा उत्सव होतो. विठ्ठल मंदिरे फारशी नसतात. वारकरी पंथाचा प्रसार का झाला ? लोक आषाढी कार्तिकी एकादशीस वारी करतात. ते रवळनाथाला विठ्ठल स्वरूप मानत असावेत. कोकणात विठ्ठलाई विठलादेवीची देवता सापडतात. विठ्ठलादेवीचा सहचर विठ्ठलेश विठ्ठलेश्वर संक्षेपाने विठ्ठल तर नव्हे. विठ्ठलाचा उंच टोपीवजा मुकूट हा उत्तर भारतीय कुशाण शैलीचा सूर्यमुर्तीशी साम्य फार जवळचे आहे असे मत प्रा. ग. ह. खरे यांनी व्यक्त केले आहे. हे खरे ठरले तर विठ्ठल ही सूर्यमूर्ती ठरण्याचा संभव आहे. रवळनाथ हे सूर्याचे रूप असावे असे काहीजणांचे मत आहे. त्यामुळे रवळनाथ हे विठ्ठलाचे मूळ स्वरूप असण्याची शक्यता आहे.

        रवळनाथांची तमीळ पार्श्वभूमी आहे. आमचा रवळनाथ तो ‘इरवलनाथ’ आहे. इरवल म्हणजे भिक्षा मागणे. त्याच्या काठीला तरंग म्हणतात. ती तमीळ तरङम् ‘़कुलदैवत’ या ग्रंथात यासंबंधी पुष्कळ माहिती आहे.

        डॉ. आकलेकर म्हणतात, रवळनाथ या नावाचा विचार करताना राऊळ हा शब्द ध्यानात घेतला पाहिजे. देवाचे स्थान जसे देऊळ तसेच रावाचे जे स्थान ते राऊळ. राब ही श्रेष्ठतादर्शक उपाधी आहे. द. कोकणात कर्नाटकात राव उपनाव सर्वत्र प्रचलित आहे. असे दिसून येते की एखाद्या समाज प्रमुखाने नवी वस्ती वसविली की तिला राऊळ असे म्हणतात. तेथील देवाला राऊळनाथ असे म्हणत असावेत. त्याचेच पुढे रवळनाथ स्वरूप झाले.

        ख्रिस्ती सणाच्या आगेमागे दोनतीनशे वर्षे मध्य पूर्वेकडे व्यापारी वस्तीत गेलेले कोळी, पांड्य व पणी लोक दरवर्षी आषाढात काफील्याने भारतात परत येतात. द. कोकणात नवीन वस्त्या आल्या. त्यांनी प्रत्येक वस्तीत एकेक रवळनाथ आपल्याबरोबर स्थापन केला. भारतात येणारे पांड्य यांनी पांडुरंग देव स्थापन केला. पणी यांनी सूर्यनारायण आणला. त्यामुळे पांडुरंग, सूर्यनारायण हा रवळनाथ म्हणून देऊळी स्थापन झाला. रवळनाथ, पांडुरंग, विठोबा हे पर्यायी शब्द राहिले आहेत.

        असा हा शिंदे यांनी सिंधमधून आणलेला ज्योत ज्योती ज्योतिबा जो सिंधी भाषेतून चांगभलं घोषाने कोल्हापूरी आला. कांगडा खोर्‍यातून चव्हाणांचे कुलदैवत ज्वालामुखी ज्योतिरूपाने कोकणात आला.

        पेडणे (गोवा), चंदगढ (बेळगाव) व ओटवणे येथील तीन रवळनाथ प्रमुख मानले जातात. या मूर्तीला जैन तीर्थकर नेमिनाथ, पार्श्वनाथ यांच्या मूर्तीत साम्य दिसले. त्यामुळे रवळनाथ जैन तीर्थकर अवतार असावा असे काहीजण मत व्यक्त करतात. पुरावा नाही… सावंतवाडीतील 53 मंदिरे, वेंगुर्ल्यास 26 मंदिरे, कुडाळातील 31 मंदिरे, कणकवलीतील 16, देवगडातील 11 मंदिरे, मालवणातील 37 मंदिरे याशिवाय राजापूर 6, चिपळूण 7, दापोली 4, खेड 2, गुहागर 4, रत्नागिरी 2, संगमेश्वर 2, लांजा 3, गोव्यात 49 देवळे. प्रत्येकाचा इतिहास, कथा मनाला भारावून टाकतात. अशी द. कोकणातील उल्लेखनीय 211 देवळे आहेत. प्रत्येक गावातील रवळनाथाचे देऊळ हा मोठा इतिहासाचा अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येक मंदिराची देवीची म्हणजे प्रत्येक गावाची कथा आहे.

        अशा या रवळनाथाचे, केदाराचे केदार कवणात सुंदर ध्यान आहे.

        केयुराणि विभुषिते: करयुगै रत्नाकितै: सुंदरै: ।

        नाना हार विचित्र पन्नयुते: रत्नांकितै: सुंदरै: ॥

        हस्ताभ्यां धृत खङ्ग पात्र डमरू शुलं सदा भ्राजितं ।

        वाजी वाहन दैत्य दर्पदलनं केदारमिशं भजे ॥1॥

        परंतु कोकणी मन त्याला कुडाळी, मालवणी बोलीतून हाक मारणारे नारूर गावाहून कुडाळ गावी आलेल्या रवळनाथाला कुडाळेश्वराला तो गार्‍हाणेच घालणार.

        ‘बा देवा म्हाराजा, कुडाळेश्वर म्हाराजा – होय म्हाराजा’

        ‘लक्शमी पाचपुरवी जुगपती देवा तू म्हाराजा – होय म्हाराजा’

        ‘येताळ, पावणात इठलादेवीचो चाळो – होय म्हाराजा’

        तसेच वालावलीच्या रवळनाथाला हाक मारताना ‘बा देवा म्हाराजा समर्था, आज तू देव रवळनाथ, तर म्हाराजा आज तुका सांगणं करतो आसोव, पूर्वसंबंधानं, देसधाम, रोगराय, तू आज एशयेक बांध. त्याला ते पुर्वेच्या गुंड्याच्या गणित पुरा करायला सांगतात. ‘देसधाम दूर करून शेवाचाकरी करून घ्यायला सांगतात.

हे ते देवाकडे बाळहट्टाने सर्व मागत असतात. अनेक ग्रामदेवता, प्रतिष्ठीत देवतांशी एकात्म्य साधत असतात. ग्रामदेवतांना मुळात अवतार नसतात. ग्रामदेवता या ऐहिक पातळीवरील कामना पुरवणार्‍या, नवसाला पावणार्‍या देवता असतात. त्या दृष्टीने त्यांच्या भोवती अनेक लोककथांची गुंफण असते. पूर्वकालीन उन्नत देवांशी मिळतीजुळती कथा असली तर त्या उभय देवतांशी ग्रामदेवतेचे एकात्म्य होते. आणि हीच ग्रामदेवतेची अवतारकथा होते. हीच उन्नयन प्रक्रिया खंडोबा, ज्योतिबा, मैलार, भैरव, रवळनाथ या देवतांशी होते. अशी ही उन्नयन प्रक्रिया गुढ, अद्भूत व तितकीच रंजकही असते. म्हणून रा. चि. ढेरे म्हणतात, देवांचा शोध ही व्यक्तीच्या अंतर्मनाची विकास यात्रा असते. तर देवतांविषयक मानवी बहिर्यात्रा असते.

        असा हा रवळनाथ. या दैवतेचा शोध घेताना त्याच्या विषयीचा श्रद्धा विश्वाच्या गाभ्यात उतरले पाहिजे. या विषयाला शोधदृष्टीच्या कक्षेत आणला पाहिजे. या देवतांशी श्रद्धा असलेला समाज, त्यांची स्थिती, गली यांचा उपासना क्षेत्रातील विधी-विधान यातून निर्माण झालेला दर्शन